उदगीर/प्रतिनिधी: माणसाचे मोठेपण जातीवर नाही तर कर्मावर अलंबून असते.ज्याचे कर्म श्रेष्ठ तो मोठा.रामचंद्र तिरुके हे देखील कर्माने मोठे असणारे आणि रुग्णांची नि:स्पृह सेवा करणारे कर्मयोगी आहेत,असे मत डॉ.राजकुमार मस्के यांनी व्यक्त केले. रामचंद्र तिरुके यांना इंडियन स्टुडंट कौन्सिल कोल्हापूरच्या वतीने राज्य पातळीवरील मानाचा राजर्षि शाहू महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला.याबद्दल सताळा येथे गावकऱ्यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात डॉ.मस्के बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शिवलिंग आप्पा जळकोटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच अरुणा देशपांडे यांच्यासह बाबुराव मद्दे, काशिनाथ पाटील, पंढरीनाथ तिरुके, गिरजप्पा तिरकुळे , सच्चिदानंद पुट्टेवाड उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ.मस्के म्हणाले की, कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता हृदय,कॅन्सर,मेंदू,किडनी या असाध्य रोगाच्या तीन हजार रूग्णांना त्यांनी मदत केली.पुणे, मुंबई व इतर ठिकाणच्या वैद्यांकडून रूग्णांच्या शस्त्रक्रिया करून आणल्या.शासकीय योजनेचा लाभ मिळवून देत असताना प्रसंगी स्वत:च्या खिशातील पैसा खर्च करून आजारी माणसाला आधार देण्याचे अजोड काम त्यांनी केले आहे.मंदिरात देव न शोधता अनाथांच्या सेवेत देव शोधणारा कर्मयोगी म्हणून रामचंद्र तिरुके यांनी लोकांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आसून सामाजिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, राजकीय,साहित्यिक या क्षेत्रातही तिरुके यांनी उत्तम कामगिरी केली.मराठवाडा व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेत त्यांचा मोलाचा वाटा होता. रामचंद्र तिरूके यांनी केलेल्या नि:स्वार्थ सेवेची दखल घेऊनच त्यांना मानाचा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार देण्यात आला आहे.आपल्या ओजस्वी वाणीने रामचंद्र तिरूके यांच्या कार्यावर मस्के यांनी प्रकाश टाकला.श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे विचार त्यांनी प्रभावीपणे मांडले. या कार्यक्रमास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.