*कवयित्री डॉ मंजूषा कुलकर्णी यांचा जागतिक काव्य विक्रम केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते सत्कार*
*‘साहित्यिक व संतांनी देश एकसूत्रात बांधला‘: राज्यपाल*
मुंबई…राजकारण समाजात दुफळी निर्माण करते तर संस्कृत आणि संस्कृती जोडण्याचे काम करते असे सांगताना शेतकरी, सैनिक, साहित्यिक व तत्ववेत्त्या संतांनी भारताची एकात्मता टिकवली आणि देश एकसूत्राने बांधला असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
प्रसिद्ध साहित्यिक आणि कवयित्री डॉ.मंजूषा कुलकर्णी यांनी कमी काळात अधिकाधिक काव्यरचना केल्याबद्दल ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ तर्फे त्यांच्या काव्यविक्रमाची नोंद घेण्यात आली आहे. त्यानिमित्त राज्यपालांच्या हस्ते कुलकर्णी यांचा शुक्रवारी (दि. २३) राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला मुख्य माहिती आयुक्त सुमित मलिक, पं. अतुल शास्त्री भगरे गुरुजी, अभिनेते व नाट्यनिर्माते प्रशांत दामले, संगीतकार कौशल इनामदार प्रामुख्याने उपस्थित होते.
आद्य शंकराचार्य यांनी अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात अनेक भाष्य व काव्यरचना केल्या. संपूर्ण भारत भ्रमण करून त्यांनी रामेश्वरम, बद्रीनाथ, जगन्नाथपुरी व द्वारका येथे धर्मपिठाची स्थापना करून देश जोडण्याचे कार्य केले. हेच कार्य तिरुवल्लुवर व इतर संतांनी केले. महाराष्ट्रात आल्यावर व येथील साहित्य वाचल्यावर मराठी साहित्य किती श्रेष्ठ आणि अतुलनीय आहे याची खात्री पटली. प्रत्येकाने इंग्रजी भाषा अवश्य शिकावी. परंतु मातृभाषेला विसरू नये व सर्व मातृभाषांची जननी असलेल्या संस्कृतला समजण्याचा अवश्य प्रयत्न केला पाहिजे असे राज्यपाल यावेळी म्हणाले. मंजूषा कुलकर्णी यांचे अभिनंदन करताना त्यांचेकडून भावी पिढ्यांसाठी नवसृजन होईल, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी डॉ.मंजूषा कुलकर्णी यांनी स्वरचित विविध काव्य प्रकार सादर केले. पं. अतुल शास्त्री भगरे गुरुजी व सुमित मल्लिक यांनी यावेळी आपापले मनोगत व्यक्त केले. समीरा गुजर यांनी कार्यक्रमाचे संचालन केल.