18.3 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeराजकीयराजकारणात परफेक्ट दुवा सांधणारा नेता..दिलीपराव

राजकारणात परफेक्ट दुवा सांधणारा नेता..दिलीपराव

वाढदिवस विशेष

वाढदिवस विशेष

आज महाराष्ट्राचे माजी अर्थराज्यमंत्री,जिल्ह्याचे जाणकार नेते,सहकारातील दिग्गज नेते,स्पष्टवक्ते,शेती विषयाचे गाढे अभ्यासक,चिंतनकार दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस..त्यांना दीर्घायुष्य लाभो या शुभेच्छा देताना त्यांच्यासोबत काही काळ काम केल्याने त्यांच्या विविध पैलूंवर आज लिहिताना काही जुन्या आठवणी आठवत आहेत..दिलीपरावजी यांचा जिल्ह्यातील राजकारणात आलेला प्रवेश त्याकाळातील अनेकांना चिंतेचा विषय ठरला असला तरीही या नेत्याच्या राजकारण प्रवेशामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक,जिल्हापरिषद आणि सहकाराचा चेहरा मोहरा बदलला हे जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वाचे पाऊल ठरले होते..कडक शिस्त, प्रशासनावर पकड आणि अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याचे कौशल्य असल्यामुळे या दोन्ही संस्था नावारूपाला आल्या..आजही जिल्हापरिषदेच्या प्रांगणात गेले की त्यांनी रुजवलेली शिस्त आजही सुरू असल्याचे जाणवते यातच त्यांच्या कामाची पावती आहे..


महाराष्ट्राच्या राजकारणात पदाची चिंता न करता पक्षासाठी कार्यरत राहणारे आणि लातूर काँग्रेस अडचणीत आली की गावपातळीपर्यंत कार्यकर्त्यांना थेट भिडणारे दिलीपराव देशमुख यांच्याबद्दल जितकं लिहिलं तितकं कमी आहे.एकमतला असताना दिलीपरावजी यांच्यासोबत राहण्याचा योग
आला.जिल्हापरिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन असताना त्यांच्यातला प्रशासक जवळून पाहता आला.एखादे काम होत नसेल तर समोरच्याला होत नाही असे स्पष्ट बोलणारा एक सच्चा राजकारणी म्हणून त्यांची ओळख झाली.स्पष्टवक्तेपणा असल्यामुळे भोंदू कार्यकर्त्यांचे दुकान त्यांच्याकडे फारसे चालले नाही.अर्ध्या रात्री कामासाठी मदतीला धावणारे दिलीपरावजी अनुभवता आले.एका कामासाठी मी रात्री 12.30 वाजता त्यांच्याकडे गेलो होतो.जवळच्या नातेवाईकांचे काम होते.आशियाना बंद झाला होता.गेटवरचा माणूस दार उघडतो की नाही याची शंका मनात होती.मी गेट उघडण्याची विनंती केली,निरोप पाठवला आणि दिलीपरावजी खाली आले. इतक्या रात्री आलात काही महत्त्वाचे आहे का?मी हो म्हणालो.तात्काळ अधिकाऱ्याला रात्री फोन लावून सांगण्यात आले.इतक्या रात्री फोन करतोय कारण काम तितकेच महत्वाचे आहे.समोरून ओके आल्यावर म्हणाले,शांतपणे जा आणि सकाळी भेटा. मी खरच आश्चर्यचकित झालो.त्यापूर्वी बोलन्यासाठी आम्ही चारदा विचार करायचो पण तेव्हापासून मला दिलीपरावजी खूप जवळचे वाटायला लागले.एकमत आवडला नाही त्यादिवशी ते स्पष्ट प्रतिक्रिया द्यायचे.कार्यकर्त्यांवर प्रचंड प्रेम करणारे, कसल्याही परिणामाची चिंता न करणारे दिलीपरावजी खरेच ग्रेट आहेत.एकदा माणूस आवडला की गुणदोषासह स्वीकारणारे आणि त्याच्यासाठी कुठेही शब्द टाकणारे नेते विरळाच..एकदा मी लोकपत्रला असताना दिलीप माने आणि दिलीपरावजी याना ऑफिसला बोलावले होते तेव्हा ते अर्थराज्यमंत्री होते.तेव्हा तिथल्या एमडीना ते म्हणाले,स्पष्ट माणूस आहे,धार चांगली आहे व्यवस्थित सांभाळा असे दिलीपरावजी आजही स्मरणात आहेत.मध्यंतरी काही काळ ते आजारी होते.पुण्यात मुद्दाम भेटायला गेलो होतो,खूप थकल्यासारखे वाटले,मी अस्वस्थ झालो.इतका दमदार नेता एका आजाराने इतका हैराण झालेला पहावला नाही.ईश्वराकडे एकच मागणे दिलीपरावजीना दीर्घायुष्य दे..मनाने स्वच्छ असलेला इतका स्पष्ट राजकारणी खरच आमची प्रेरणा आहे..
राजकारणाच्या उंचीसोबत विचारांची उंची सांभाळणारा हा नेता महाराष्ट्राच्या राजकारणाचा हिरा आहे,तो जपला पाहिजे,खूप मोठा झाला पाहिजे…


राजकारणातून सहजपणे बाजूला व्हायचे मात्र आपली छाप कायम सोडून सगळ्यांना एकसंघ बांधून ठेवायचे ही राजकीय परंपरा फक्त आणि फक्त दिलीपराव देशमुख हेच करू शकतात,हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलेले आहे..सध्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सगळ्यांना अपेक्षित असलेल्या मतदारसंघातून दिलीपराव देशमुख यांची उमेदवारी येईल असे अपेक्षित असताना अचानक त्यांनी आपली सगळी धुरा आमदार धीरज देशमुख यांच्यावर सोपवून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत..दिलीपराव देशमुखांनी या अगोदरही विधानपरिषद निवडणुकीत आपण उभारणार नाही असे सांगून त्यांनी सहजपणे हक्काची आमदारकी सोडली होती..हे सगळं सहजपणे राजकारण सोडायलाही मनाचा मोठेपणा लागतो..लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईला आली होती,तेव्हा दिलीपराव देशमुख यांचा नुकताच राजकारणात प्रवेश झाला होता.. स्व.विलासराव देशमुख यांनी त्याकाळी इतका मोठा विश्वास दिलीपरावजी यांच्यावर टाकला होता..पूर्णतः डबघाईला आलेली ही बँक सुधारून महाराष्ट्रातील एक क्रमांकाची बँक बनवण्याची किमया दिलीपरावजी यांनी साधली होती,आज अनेक बॅंका डबघाईला आल्या आहेत,काही बंदही पडल्या आहेत..अश्यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक महाराष्ट्रासाठी आशेचा किरण आहे..ही बँक फायद्यात चालवायची असेल तर एकछत्री अंमल त्यावर असायला हवा,राजकीय जोडे बाहेर ठेवून तिथला कारभार व्हायला हवा..अनेकदा बँकेचा विषय निघाला की,माझे मित्र अभिजित देशमुख म्हणत असतात,ही बँक एक शुद्ध पाण्याची विहीर आहे,लाखो शेतकरी या विहिरीचे पाणी पिऊन समृद्ध आणि विकसित होतात,ही अशीच पवित्र राहायला हवी,दिलीपराव देशमुख यांनी आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सगळ्यांनी त्याचे पावित्र्य जपले आहे..


मला आजही आठवतय दिलीपराव देशमुख यांच्याकडे मी माझ्या गावचा प्रस्ताव घेऊन गेलो होतो,मला बँकेची शाखा हवी होती,माझ्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली,किती सभासद,किती उलाढाल,आजूबाजूच्या गावाची स्थिती,मुख्य पिकांची माहिती,उसाचे उत्पादन,त्याचे सभासद,वाटप कर्ज आदी अनेक विषयांची माहिती घेतली..आणि एका अधिकाऱ्याला भेटण्यास सांगितले..जिथे अडचण असेल तिथे अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यायचा,त्यात कुठेही कमीपणा वाटू द्यायचा नाही ही खासियत दिलीपरावजी यांची आहे..कुठे कडक,कुठे नरम,कुठे हक्काची तर कुठे राजकीय प्रेशर वापरण्याची त्यांची हातोटी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे..जिल्हापरिषदेचे अध्यक्ष असताना अनेकवेळा या गोष्टीचा अनुभव आलेला आहे.आजही जिल्हापरिषद खऱ्या अर्थाने त्यांनी घालून दिलेल्या आचारसंहितेवरच सुरू आहे..या सगळ्या संस्था एका विश्वासावर चालत असतात आणि त्यासाठी हवी असते एका व्यक्तीची विश्वासार्हता..
आज दिलीपराव देशमुख यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून सहजपणे आपला पदभार धीरज देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला आहे..सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की,धीरज यांची निवड का केली?धीरज देशमुख हे एमबीए आहेत,राजकारणाला मिळालेला एक वेगळा चेहरा त्यांच्याकडे आहे,सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांच्याकडे भाषणकला आहे,ते सभा जिंकू शकतात आणि जनतेची मने जिंकू शकतात..फक्त हे सगळं करताना त्यांना दिलीपरावजी यांच्या राजकीय वाटचालीचा अभ्यास करावा लागेल,त्यांच्यात असलेली चिकित्सक वृत्ती,कृषी आणि सहकाराचा असलेला अभ्यास,कधी कडक तर कधी मृदू भूमिका घेऊन सहकार हाताळायची वेगळी भूमिका,सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येकाला वेळ देणे जमायला हवे..दिलीपरावजी यांच्याकडे हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे..प्रत्येकाला ऐकून घेणे,त्यांच्यासाठी हक्काने काम करणे,राजकारण सोडून मदत करणे या सगळ्या गुणांवर अभ्यास करून धीरज देशमुख यांना वाटचाल करावी लागणार आहे..


दिलीपरावजी यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अभ्यासू नेत्याने यापासून दूर जाऊ नये,सन्माननीय सदस्य म्हणून त्यांचे लक्ष या बँकेवर असायला हवे..कारण ज्या ज्या ठिकाणी त्यांचा परिसस्पर्श झाला आहे,त्या त्या ठिकाणी त्या संस्थेचा विकासच झाला आहे..बँकेचे सोने करायचे असेल तर त्यांचे मार्गदर्शन असायलाच हवे..इतक्या सहजपणे राजकारणाचे हस्तांतरण करण्याची किमया असलेल्या किमयागार दिलीपरावजी यांना राजकीय सॅल्युट..
काही काही माणसे राजकारणात आपली उंची संभाळूनच जगत असतात..ही उंची विचाराची असते,शांततेची असते.सत्तेतील कुठलेही पद नाही तरीही आशियाना फुल्ल होते..राजकारणात असे कुठे दिसत नाही..सत्ता गेली की घरावर शुकशुकाट दिसतो..फोन करून कार्यकर्त्यांना गप्पा मारायला बोलवावे लागते..दिलीपराव देशमुख यांचे जिल्ह्याच्या राजकारणात एक वेगळे महत्व आहे. पक्ष अडचणीत असला की नेहमी दिलीपरावजी धावून येतात, पक्ष बळकट करतात.जिथे चुकते त्यांना चुचकारतात,नाराज मंडळींना सोबत ठेवतात,समजूत काढतात..कायम दुवा सांधण्याचे काम त्यांच्याकडे असते..विधानपरिषदेला सहज ते आमदार होऊ शकले असते मात्र त्यांनी पक्षाने खूप दिलेय आता पक्षाचे काम असा पवित्रा घेतला..दिलीपरावजींची गरज आज काँग्रेसला खूप आहे,संपूर्ण जिल्हा त्यांनी पिंजून काढला तर एक वेगळे चित्र दिसू शकते..मी एकमत जॉईन केले तेव्हापासून अनेकवेळा त्यांनी मला मार्गदर्शन केले आहे.ते फारसा हस्तक्षेप कधीच करत नसत,पण त्यांचे लक्ष आमच्यावर होते..मित्रांची,कार्यकर्त्यांची काळजी करणारा खरा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते..मी काहीवेळेस मुद्दामहून त्यांना अजमावून पाहिले आहे.लोक त्यांच्याविषयी जे नकारात्मक बोलायचे तसे ते खरेच आहेत का?याचाही विचार करायला हवा..
एक नाते जपणारा नेता लातूरकरांचे भूषण आहे,किती साधं राहावं,छान आणि परफेक्ट राहावं याकडे त्यांचा कल असतो,गबाळे माणसे त्यांना आवडत नाहीत,स्वछता हा त्यांचा drawback आहे..माणसे साफ़सुतरी असावीत असे त्यांना वाटते..कामात कुठेही विस्कळीतपणा त्यांना आवडत नाही..सहजता हा गुण मला खूप भावणारा वाटला, मला वाटत ,अंतरावर उभा राहून दिलीपराव यांच्याविषयी आपली मते बनवणाऱ्या लोकांनी थोडं अंतर कमी करून एकदा भेटावं,अभ्यासाव,मग ठरवाव..त्यांचे खूप सारे पैलू आयुष्याला आकार देऊ शकतात.त्यांना दीर्घायुष्य लाभो,या शुभेच्छा..

Amit V. Deshmukh Diliprao Deshmukh Vichar Manch

@ संजय जेवरीकर
सरपंच,ज्येष्ठ पत्रकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]