*रणरागिणी कांचन दोडे*
जिथे जिथे स्त्रियांवर अन्याय,अत्याचार होतो तिथे तिथे ताबडतोब धाऊन जाणाऱ्या धडाडीच्या ,अतिशय निर्भीड,धाडसी व्यक्तिमत्व लाभलेल्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणजेच पुण्याच्या
कांचनताई दोडे होत…….
कांचनताईंचा जन्म पुणे येथे ८ जानेवारी १९७२ ला झाला. त्यांचे सामाजिक कार्य फार मोठे व कौतुकास्पद असे आहे. ” अन्याय करणाऱ्यापेक्षाही अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो ” असे स्पष्ट मत व्यक्त करणाऱ्या कांचनताई समाजातील अत्याचारा विरुद्ध आवाज उठवून महिला व मुलींना न्याय मिळवून देतात. त्यांना स्वरक्षणाचे धडे देऊन महिलांना व्यवसाय प्रशिक्षण ही देतात त्यामुळे महिला आत्मनिर्भर होऊन तिच्यात आत्मविश्वास निर्माण होतो व ती येणाऱ्या कठीण परिस्थितीचा सामना न घाबरत करू शकते . त्यासाठी कराटे वर्ग घेतले जातात व मुलींना प्रशिक्षण दिले जाते.
चांगल्या जगाची निर्मिती करण्यासाठी महिला जागृती परम आवश्यक आहे त्यामुळेच ती स्वावलंबी असणे अतिशय महत्त्वाचे आहे असे त्याचे मत आहे व त्यासाठी त्या विविध शिबिरांद्वारे मुलीं व महिलांनामध्ये जनजागृती करत आहे. हे सामाजिक काम आज गेली १६ वर्ष त्या करत आहेत.पोलिसांना देखील त्या तपास कार्यात मदत करतात.
वन मॅन शो असलेल्या कांचन ताईची कामगिरी उल्लेखनीय आहे.मुलीं अथवा महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विरुद्ध आवाज उठवून त्यांनी अनेकींना न्याय दिला आहे व त्यांना सक्षम करून सामाजिक संस्थेचा आधार दिला आहे. बलात्कार करणाऱ्या एका निलंबित न्यायाधीशाला देखील त्यांनी शिक्षा करून देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे .
कांचन ताईंनी महिलांचे शोषण करणाऱ्या अनेक भोंदू बाबांचाही स्टिंग ऑपरेशन द्वारे पर्दाफाश केला आहे . अशा फसवेगिरीला बळी पडू नये व अंधविश्वासमुळे आपला संसार उध्वस्त करू नये असे त्या आवर्जून सांगतात.
एका विशेष मुलांच्या विद्यालयात असलेल्या विद्यार्थ्यांना शिळे खाद्यपदार्थ जेवणासाठी देऊन अत्यंत अस्वच्छ ठिकाणी त्यांना ठेवले जात असे व धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यांना अमानुष मारहाण ही केली जात असे. अशा मुलांशी संपर्क साधून त्यांना विश्वासात घेऊन ह्या त्यांनी या गोष्टी सर्वांच्या पुढे आणून त्या संस्थाचालक महिलेवर गुन्हा दाखल करून मुलांना नवीन जीवन दिले व त्यांच्या चेहऱ्यावर निरागस हसू पुन्हा आणले.
कांचन ताईंनी आजपर्यंत ११ वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना त्या नरकातून बाहेर काढून नवीन जीवन दिले. एका बार बालाला तिच्या तीन मुलींसहीत विकले गेले होते तिला मुक्त करून संस्थेत दाखल केले त्यामुळे जगण्याची एक नवी दिशा लाभली.
अनेक मुलींना लग्नाचे आमिष दाखवून अथवा महिलांना फसवून त्यांच्या भोळेपणाचा अथवा परिस्थितीचा गैरफायदा घेऊन हा व्यवसाय करायला भाग पाडले जाते, धमकवले जाते .भीतीपोटी त्या हे सर्व सहन करत असतात .मात्र त्यांना ऐकून घेणारे त्यांच्यावर विश्वास ठेवणारे खूप कमी असतात व त्यांना तेथून बाहेर काढणे हे अतिशय जोखमीचे असते.अशा महिलांच्या पाठीशी त्या भक्कमपणे उभ्या राहतात.
कांचन ताईंनी पतीबरोबर भांडून आलेल्या एका गरोदर महिलेला सन्मानाने अवघ्या दोन दिवसात तिच्या कुटूंबाच्या स्वाधीन करण्यात आले.अनेक कुटुंबाला जोडण्याचे मोलाचे काम त्या निस्वार्थीपणे करत आहेत.
बचत गटांच्या मार्फतही त्या अनेक महिलांना स्वरक्षण व स्वावलंबनाचे धडे देऊन त्यांचे भविष्य उज्जवल करण्यात लाख मोलाचा वाटा उचलत आहे.बचत गटातील अनेक गोर गरीब महिलांना त्यांचा खूप मोठा आधार आहे.त्यांचे ऐकणारीं, समजून घेणारी एक मैत्रीण त्यांना कांचन ताईंच्या रूपाने मिळाली आहे.
ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाला आपण ही काही देणे लागतो असा प्रामाणिक हेतू मनात ठेवून तंबाखु विरोधी अभियानांतर्गत येरवडा पोलिसांकांसाठी त्यांनी जनजागृतीचे आयोजन केले. तिथे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ घेतली.आपले आरोग्य आपल्या हाथी असा मोलाचा सल्ला देऊन त्या जनजागृती करत असतात.
एका विवाह सूचक केंद्राच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या संस्थेत आर्थिक फसवणुक होत होती.हजारो रुपये ह्या विवाह संस्थेने उकळले होते. त्यामध्ये प्रौढ विदुरांचाही समावेश असल्याने समाजात आपली बदनामी होऊ नये म्हणून अनेकजण तक्रार करत नव्हते. कांचनताईना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन पोलिसांच्या सहाय्याने त्या संस्थेवर कारवाई करण्यात यश मिळवले .
अशाच एका प्रचंड त्रास व मारहाण करणाऱ्या गतिमंद मुलांच्या बेकायदेशीर संस्थेचा पर्दाफाश करून त्यांनी अनेकांचे जीव वाचविले व त्यांना जीवन दान दिले.
गुड टच व बॅड टच ह्या पलीकडचे शिक्षण शाळेत जाऊन मुलींना दिले जाते.अशा वेळी नक्की काय करावे व कोणाला सांगावे ह्याचे मुलींना मार्गदर्शन करण्यात येते.धक्कादायक गोष्ट म्हणजे हे अत्याचार करणारे अनेक वेळा हे जवळचे मित्र , परिचयाची व्यक्ती अथवा नातेवाईक असतात हे मुलांशी बोलल्यावर लक्षात येते. ह्या निरागस बाल मनावर अतिशय वाईट परिणाम होऊन ते एकटे एकटे राहतात .अबोला धरतात. घाबरतात. ही भीती त्यांचे समुपदेशन करून दूर केली जाते.ही अतिशय नाजूक व घृणास्पद गोष्ट आहे त्यामुळे मुलांना विश्वासात घेऊन प्रेमाने व आपुलकीने ह्यातून बाहेर काढले जाते.अत्याचार करणारा नराधम कोणीही असो त्याला शिक्षा झालीच पाहिजे यासाठी त्या झटत असतात.
कांचन ताई ह्या महाराष्ट्र राज्य महिला सुरक्षा मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्ष आहेत तसेच महात्मा फुले मंडई येथेही त्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.स्वराज न्युज चॅनेलच्या कार्यकारी संपादक म्हणूनही त्या काम करतात.त्यांचा वाढदिवस त्या दिव्यांग मुलं, वृद्धाश्रमात,अनाथ आश्रमात साजरा करतात. मृत्यू पश्चातअवयव दानाचाही अतिशय धाडसी व प्रेरणादायी निर्णय त्यांनी घेतला आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महिला रत्न पुरस्कार, स्वयंसिद्धा पुरस्कार,कासार भूषण पुरस्कार,माँ तुझे सलाम पुरस्कार,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार, जनकल्याण गौरव पुरस्कार,तसेच पाणी ह्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, उत्कृष्ट महिला सक्षमीकरण पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
आपल्याला पुढे अजून काय करण्याची इच्छा आहे ? असे विचारल्यावर त्या म्हणाल्या की सर्व महाराष्ट्रातून महिलांना एकत्र करून त्या सक्षम होतील, स्वतःचा व्यवसाय करू शकतील व आत्मनिर्भर होतील जेणे करून भविष्यात कोणतेही संकट आले तर त्या निर्भयपणे तोंड देऊ शकतील यासाठी कार्य करायचे आहे .
कांचनताई दोडे ह्यांचे सामाजिक कार्य अतिशय उल्लेखनीय,प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे.सामाजीक कार्यकर्ता कसा असावा ह्याच्या त्या एक उत्तम उदाहरण आहेत.नुसती भाषणे देऊन महिला सक्षमीकरण होत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष काम महत्त्वाचे असते. मात्र त्या न घाबरता सर्व परस्थितीचा सामना करतात व योग्य निर्णय घेऊन वाटचाल करतात.
साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेल्या कांचन ताई ह्या आजच्या आधुनिक दुर्गेचे प्रतीक आहेत, रणरागिणी आहेत.सदा उत्साही,महिला व मुलींच्या मदतीला धावून जाणाऱ्या,अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या, प्रसन्न,अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेल्या कांचन ताईंच्या निरपेक्ष कार्याला मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा.
लेखन : रश्मी हेडे.
संपादन : देवेंद्र भुजबळ.9869484800.