23.1 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeदिन विशेष*रक्षाबंधन सणाचे महत्त्व*

*रक्षाबंधन सणाचे महत्त्व*

रक्षाबंधन (राखी पौर्णिमा) निमित्त लेख

   श्रावण पौर्णिमेला येणार्‍या रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधते. भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देऊन तिला आशीर्वाद देतो. सहस्रो वर्षांपासून चालत आलेल्या रक्षाबंधन या सणामागील इतिहास, शास्त्र, राखी सिद्ध करण्याची पद्धत आणि या सणाचे महत्त्व सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून विशद केले आहे.

इतिहास – पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले व नारायणाची मुक्तता केली. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता.

‘बारा वर्षे इंद्र आणि दैत्य यांच्यात युद्ध चालले. आपली 12 वर्षे म्हणजे त्यांचे 12 दिवस. इंद्र थकून गेला होता आणि दैत्य वरचढ होत होते. इंद्र त्या युद्धातून स्वतःचे प्राण वाचवून पळून जाण्याच्या सिद्धतेत होता. इंद्राची ही व्यथा ऐकून इंद्राणी गुरूंना शरण गेली. गुरु बृहस्पति ध्यान लावून इंद्राणीला म्हणाले, ‘‘जर तू आपल्या पातिव्रत्य बळाचा उपयोग करून हा संकल्प केलास की, माझे पतीदेव सुरक्षित रहावेत आणि इंद्राच्या उजव्या मनगटावर एक धागा बांधलास, तर इंद्र युद्ध जिंकेल.’’ इंद्र विजयी झाला आणि इंद्राणीचा संकल्प साकार झाला.

भविष्यपुराणात सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन हे मूळचे राजांसाठी होते. राखीची एक नवी पद्धत इतिहासकाळापासून सुरू झाली.

भावनिक महत्त्व – राखी बहिणीने भावाच्या हाताला बांधायची असते आणि त्यामागे भावाचा उत्कर्ष व्हावा व भावाने बहिणीचे संरक्षण करावे, ही भूमिका असते. बहिणीने भावाला राखी बांधण्याहून जास्त महत्त्वाचे आहे, एखाद्या तरुणाने / पुरुषाने एखाद्या तरुणीकडून / स्त्रीकडून राखी बांधून घेणे.त्यामुळे त्यांचा, विशेषतः तरुणांचा व पुरुषांचा तरुणीकडे किंवा स्त्रीकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो.

राखी बांधणे – तांदूळ, सोने आणि पांढर्‍या मोहर्‍या पुरचुंडीत एकत्र बांधल्याने रक्षा अर्थात राखी सिद्ध होते. ती रेशमी दोर्‍याने बांधली जाते.

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः ।
तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ।।

अर्थ : महाबली आणि दानवेन्द्र असा जो बलीराजा जिने बद्ध झाला, त्या रक्षेने मी तुलाही बांधते. हे राखी, तू चलित होऊ नकोस.

तांदुळाच्या कणांचा समुच्चय राखी म्हणून रेशमी धाग्याने बांधण्याची पद्धत का आहे ? – ‘तांदूळ हे सर्वसमावेशकतेचे प्रतीक, म्हणजेच ते सर्वांना आपल्यात सामावून घेणारे, तसेच ते सर्व लहरींचे उत्तम आदान-प्रदान करणारे आहे. तांदुळाचा समुच्चय पांढर्‍या वसनात बांधून तो रेशमाच्या धाग्याने शिवरूपी जिवाच्या उजव्या हातात बांधणे, म्हणजे एक प्रकारे सात्त्विक रेशमी बंधन सिद्ध करणे. रेशमी धागा सात्त्विक लहरींचे गतीमान वहन करण्यात अग्रेसर आहे.

बहीण आणि भाऊ यांच्यातील देवाण-घेवाण हिशोब संपण्यास साहाय्य होणे – बहीण आणि भाऊ यांचा एकमेकांत साधारण 30% देवाण-घेवाण हिशोब असतो. देवाण-घेवाण हिशोब राखी पौर्णिमेसारख्या सणांच्या माध्यमातून कमी होतो, म्हणजे ते स्थुलातून एकमेकांच्या बंधनात अडकतात; पण सूक्ष्म-रूपाने एकमेकांत असणारा देवाण-घेवाण हिशोब संपवत असतात. प्रत्येक वर्षाला बहीण आणि भाऊ यांच्या भावाच्या आधारे त्यांचे देवाण-घेवाण हिशोब कमी होत असल्याचे प्रतीक म्हणून राखी बांधली जाते. बहीण आणि भाऊ यांना स्वतःतील देवाण-घेवाण हिशोब न्यून करण्यासाठी ही एक संधी असल्याने या संधीचा दोन्ही जिवांनी लाभ करून घेतला पाहिजे.

बहिणीने भावाला राखी बांधतांना कसा भाव ठेवावा ? – श्रीकृष्णाच्या बोटातून वाहणार्‍या रक्तप्रवाहाला थांबवण्यासाठी द्रौपदीने तिच्या साडीचा पदर फाडून त्याच्या बोटाला बांधला. बहीण भावाला होणारा त्रास कदापी सहन करू शकत नाही. त्याच्यावर आलेले संकट दूर करण्यासाठी ती काहीही करू शकते. राखी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधतांना हाच भाव ठेवला पाहिजे.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने कोणतीही अपेक्षा न बाळगता राखी बांधण्याचे महत्त्व – रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाकडून वस्तूच्या रूपात कोणतीही अपेक्षा मनात बाळगल्यास ती त्या दिवशी मिळणा‍र्‍या आध्यात्मिक लाभापासून वंचित राहते. हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या देवाण-घेवाण हिशोब न्यून करण्यासाठी असतो. अपेक्षा ठेवून वस्तूची प्राप्ती केल्यास देवाण-घेवाण हिशोब 3 पटीने वाढतात.

भावाने सात्त्विक ओवाळणी देण्याचे महत्त्व – असात्त्विक भेटवस्तू रज-तमप्रधान असते म्हणून भावाने बहिणीला सात्त्विक भेटवस्तू द्यावी. सात्त्विक भेटवस्तू अर्थात कोणताही धार्मिक ग्रंथ, जपमाळ अशा वस्तु ज्यामुळे बहिणीला साधना करण्यात साहाय्यता होईल.

प्रार्थना करणे – बहिणीने भावाच्या कल्याणासाठी व भावाने बहिणीच्या रक्षणासाठी प्रार्थना करण्याबरोबरच दोघांनीही ‘राष्ट्र व धर्म यांच्या रक्षणासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ देत’, अशी ईश्वराला प्रार्थना करावी.

राखीच्या माध्यमातून होणारे देवतांचे विडंबन रोखा ! – हल्ली राखीवर ‘ॐ’ किंवा देवतांची चित्रे असतात. राखीच्या वापरानंतर ती इतस्ततः पडल्यामुळे एकप्रकारे देवता व धर्मप्रतीक यांचे विडंबन होते आणि यामुळे पाप लागते. हे टाळण्यासाठी राखीचे पाण्यात विसर्जन करा !

(संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
संकलक : श्री. हिरालाल तिवारी
संपर्क क्र. : ९९७५५९२८५९
)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]