भाजपा येणाऱ्या सर्व निवडणुका
ताकदीने लढणार- आ. निलंगेकर
लातूर दि.२८ – येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सर्व निवडणूका कार्यकर्त्यांच्या आहेत या सर्व निवडणूका भारतीय जनता पक्ष ताकतीने लढणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे नेते माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलगेकर यांनी केले.
लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पक्ष पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक प्रणवश्री मंगल कार्यालयात माजी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर आणि भाजपाचे मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीस खा. सुधाकर शृंगारे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, सभापती रोहिदास वाघमारे, गोविंद चिंलकुरे, जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, रामचंद्र तिरुके, अशोक केंद्रे, त्र्यंबकआबा गुटे, जयश्रीताई पाटील, बापूराव राठोड, बालाजी गवारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत संघटन मंत्री संजय कौडगे यांनी जिल्ह्यातील भाजपाच्या बुथ रचना निवडणुकीची पूर्वतयारी व इतर कामाचा आढावा घेऊन अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
या बैठकीत बोलताना आ. निलंगेकर म्हणाले की, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार किती दिवसाचे आहे हे सरकार मध्ये बसलेल्यांनाही माहित नाही. केव्हाही पायउतार होऊ शकतो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणूका कधीही जाहीर होऊ शकतात कदाचित त्यापूर्वी विधानसभाही होऊ शकतात त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी सज्ज असावे असे बोलून दाखविले.

नगरपंचायत निवडणुकीत भाजपाला मिळालेली मते विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतापेक्षा अधिक आहेत मात्र झालेल्या मताच्या विभाजनाचा विचार करावा लागेल असे सांगून आमदार निलंगेकर म्हणाले की जे कार्यकर्ते पक्षाच्या कामात आहेत त्यांची निश्चितचपणे दखल घेतली जाईल.
भाजपाच्या राज्य आणि केंद्र सरकारने जिल्हा परिषदेला, दवाखाना, शाळा यासह विविध विकास कामाकरिता कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून दिला. या कामाच्या इमारती आज तयार आहेत तेव्हा त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींनी विकास कामे लोकार्पण करावीत असे सांगून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने विकास कामासाठी एक रुपया दिला नाही जे पैसे मिळाले ते केवळ केंद्र शासनाचे आहेत याची माहिती सर्व सामान्य जनते पर्यंत पोहोचवावी असेही आव्हान आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.
या बैठकीत खा. सुधाकर शृंगारे, गणेशदादा हाके, सुधाकर भालेराव, दिलीपराव देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मन की बात याबाबतचा रामचंद्र तिरुके यांनी तर बुथ रचना कामाचा आढावा तुकाराम गोरे यांनी दिला. प्रारंभी संजय दोरवे यांनी प्रास्ताविक केले तर बैठकीचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले या बैठकीस जिल्हाभरातील भाजपाचे पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.