राजकीय नेता म्हणून नव्हे, तर दोन मुलींचा पिता म्हणून आधार देण्यासाठी मोर्चात सहभागी
-अजित पाटील कव्हेकर
लातूर/(वृत्तसेवा) : कोलकत्ता किंवा बदलापूर या ठिकाणी घडलेल्या घटना अत्यंत संतापजनक असून तळपायाची आग मस्तकापर्यंत पोहोचवणाऱ्या आहेत.या घटनेने दोन मुलींचा पिता म्हणून मी अत्यंत अस्वस्थ झालो.ज्या मुलींच्या बाबतीत अशा अमानुष घटना घडल्या तशा कोणाच्याही बाबतीत घडू नयेत.म्हणुनच विद्यार्थ्यांनी काढलेल्या मूक मोर्चात मी सहभागी झालो,असे मत भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी व्यक्त केले.अत्यंत संवेदनशील असलेल्या अशा गोष्टींमध्ये कुणीही राजकारण न करता सामूहिकरीत्या अशा प्रवृत्तींना ठेचले पाहिजे,अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
कोलकत्ता व बदलापूर येथील अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.२३) लातूर येथे विविध महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी दयानंद महाविद्यालयातील गेट पासून मूक मोर्चा काढण्यात आला होता.या मुक मोर्चातील विद्यार्थिनींना आधार देण्यासाठी मी उपस्थित राहिलो,असे कव्हेकर यांनी सांगितले. सरकार या घटनेबाबत अत्यंत गंभीर असून कडक कारवाई कारण्यासाठी जलद कायदेशीर प्रक्रिया करत आहे.दुर्दैवी घटनेबाबत चिंतन होणे गरजेचे आहे.
लातूर शहर शैक्षणिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर असून महाराष्ट्रातून मुली शिक्षणासाठी येथे येतात.काही मुली एकट्या राहतात.कोचिंगला एकट्या सायकलवर जातात.त्यांच्या मनात कुठलीही भीती राहू नये,असे वातावरण येथे आहे.अशा घटनांबाबत फक्त मुलीच नाही तर इथली मुलेही गंभीर आहेत.त्यामुळेच या मोर्चाला मुलांचीही उपस्थिती लक्षणीय असल्याचे ते म्हणाले.
आपल्या भगिनीवर अन्याय होत असताना लातूरची मुलं अत्यंत संवेदनशील आहेत.अशा घटनेचे राजकीय भांडवल न करता मूळ घटनेवर चिंतन होणे गरजेचे आहे. आजच्या पिढीचे आदर्श टिक टॉक स्टार,रील स्टार असल्याचे म्हणत त्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले असे महापुरुष आपले आदर्श होणार नाहीत तोपर्यंत अशा घटना रोखणे कठीण आहे.अशा विकृत भावना मनात न येण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातही अध्यात्मिक स्वरूपाचे काम झाले पाहिजे,अशी भावना त्यांनी यावेळी बोलून दाखविली. अध्यात्मिक शिक्षणाने विद्यार्थ्यांची भावना निश्चितपणे बदलेल. त्यांच्यावर चांगले विचार बिंबवणे शक्य होईल असेही ते म्हणाले.