आमदार प्रकाश आवाडे यांची पञकार बैठकीत माहिती
इचलकरंजी ; दि.२४ ( प्रतिनिधी) -राज्य शासनाकडे पंचगंगा नदीत गणेश मूर्ती विसर्जन करु नये , याबाबत न्यायालयाचे लेखी आदेश नाहीत.त्यामुळे यंदाच्या वर्षी उत्साहपूर्ण व शांततेत पंचगंगा नदीतच गणेश मूर्तीचे विसर्जन होईल ,याला शासनाबरोबरच महापालिका प्रशासनाची कोणतीही आडकाठी नसेल ,अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी पञकार बैठकीत दिली.तसेच भाविकांसह सार्वजनिक मंडळांनी पुजेचे निर्माल्य कुंडीतच टाकून नदी प्रदूषण मुक्तीच्या कार्याला हातभार लावावा ,असे आवाहन देखील त्यांनी केले.
इचलकरंजी येथे यंदाच्या वर्षी गणेश मूर्तीचे विसर्जन हे पंचगंगा नदीत की शहापूर खणीत या संदर्भात मोठा वादाचा मुद्दा उपस्थित झाला आहे.यामध्ये महापालिका प्रशासनाने घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन शहापूर खणीत करुन पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करावी ,असे आवाहन केले आहे.
तर दुसरीकडे शहरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेबरोबरच सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्तीचे विसर्जन हे पंचगंगा नदीतच करण्याची ठाम भूमिका घेतली आहे.यावरुन प्रशासन व सार्वजनिक मंडळांमध्ये मोठा संघर्ष होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.याच पार्श्वभूमीवर काल आमदार प्रकाश आवाडे , शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्यासह महापालिकेचे प्रशासक सुधाकर देशमुख , प्रांताधिकारी डॉ.विकास खरात ,डिवायएसपी बी.बी.महामुनी यांच्यासह काही सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी गणेश मूर्ती विसर्जन संदर्भातील समस्या जाणून घेतली.तसेच याबाबत सन्मानजनक तोडगा काढू, अशी ग्वाही दिली असल्याचे आमदार प्रकाश आवाडे यांनी आज पत्रकार बैठकीत बोलताना सांगितले.तसेच इतर कारणांमुळे पंचगंगा नदी प्रदूषण होत असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत केवळ गणेश मूर्ती विसर्जनानेच नदी प्रदूषित होत असल्याचे कारण पुढे करत काही जण सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत.हे अत्यंत चुकीचे असून गणेशोत्सव हा शांततेत व उत्साहात साजरा व्हावा ,अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे.त्यामुळेच शहापूर खण प्रदूषित असून त्यामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करणे हे योग्य होणार नाही.
तसेच धार्मिकदृष्ट्या प्रवाहित पाण्यात म्हणजे पंचगंगा नदीमध्ये काही नियमांचे पालन करत गणेश मूर्तीचे विसर्जन कसे योग्य आहे ही भूमिका शासनाला योग्य पध्दतीने पटवून देण्यात यश मिळाल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.याच अनुषंगाने
मंञी महोदयांसोबत काल मुंबई मंञालयात झालेल्या चर्चेदरम्यान पंचगंगा नदीमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन करु नयेत ,असे न्यायालयाचे लेखी आदेश आहेत का , याबाबत विचारणा केली असता शासनाकडून काहीच ठोस उत्तर मिळाले नसल्याचे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगून यंदाच्या वर्षी उत्साहपूर्ण व शांततेत पंचगंगा नदीतच गणेश मूर्तीचे विसर्जन होईल ,याला शासनाबरोबरच महापालिका प्रशासनाची आडकाठी नसेल ,अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी पञकार बैठकीत दिली.तसेच भाविकांसह सार्वजनिक मंडळांनी पुजेचे निर्माल्य कुंडीतच टाकून नदी प्रदूषण मुक्तीच्या कार्याला हातभार लावावा ,असे आवाहन देखील त्यांनी केले.
यावेळी ताराराणी पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश दत्तवाडे , प्रकाश मोरे , स्वप्निल आवाडे ,मोश्मी आवाडे ,दीपक सुर्वे ,राजू बोंद्रे , सर्जेराव पाटील ,अहमद मुजावर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.