🔹संघाच्या कार्यालयासाठी मोतीबाग घेण्यापासून ते अगदी आतापर्यंतच्या म्हणजे गेल्या सत्तर वर्षांतील अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. मोतीबागेच्या आधीपासून त्या भागात संघाच्या अनेक शाखा होत्या आणि प्रत्येक शाखेचं स्वरूपही मोठं होतं. कार्यालय लागतं, ते छोटया-मोठया बैठका, कार्यक्रम, अधिकाऱ्यांना थांबण्यासाठी जागा आदी गोष्टींसाठी. मोतीबागेच्या परिसरात तेव्हा संघाचा व्यापक संपर्क होता आणि शाखांचं जाळं होतं. कार्यालय असं नव्हतं, पण काही गोष्टी मला चांगल्या आठवत आहेत. मी तरुण होतो. त्यामुळे जागाखरेदीचे पूर्ण तपशील माहिती नाहीत. मात्र, कार्यालय म्हणून ही जागा घ्यायची, यासंबंधी सुरू असलेल्या वाटाघाटीच्या गोष्टी आमच्या कानावर येत होत्या. सरदार बिवलकर यांनी संघासाठी हा विषय खूपच सहानुभूतीनं आणि सहकार्यानं घेतला होता. त्यामुळे तो व्यवहार पुढच्या चार-पाच वर्षात खूपच सुकरतेनं पार पडला. तिथे आपलं कार्यालय होणार आहे हे कळल्यानंतर आम्ही कुतूहलानं जाऊन ती जागा बघितल्याचंही आठवतं.

🔹मोतीबागेत त्यावेळी मोटार गॅरेजची शेड आणि गाड्या धुण्यासाठीचा चढाव होता. दोन-चार खोल्या होत्या. हळूहळू त्याचं रूपांतर कार्यालय या स्वरूपात झालं. मोतीबागेत भरणाऱ्या प्रल्हाद शाखेवर १९५६ साली माझी मुख्य शिक्षक म्हणून नियुक्ती झाली. पुढे साडेचार वर्ष मी त्या शाखेवर होतो. माझी वैद्यकीय महाविद्यालयाची सगळी वर्ष मी त्या शाखेवर होतो. शिक्षक, मुख्य शिक्षक आणि दोन वर्ष कार्यवाह. या सगळ्याच्या आठवणी खूप आहेत आणि ताज्या आहेत.
🔹महाराष्ट्र प्रांताचं शिबिर १९५६ साली अरण्येश्वर येथे झालं. त्याच्या माझ्या आठवणी पक्क्या, भक्कम, जणूकाही काल घडलं असं वाटावं इतक्या ताज्या आहेत. प्रल्हाद शाखेवर मी तेव्हा मुख्य शिक्षक होतो. सर्व मोकळा भाग होता. मैदान, तेथेच मांडव. मग शिबिर उभारणीसाठी खड्डे खणणं असेल, मंडप घालणं सर्व कामं स्वयंसेवकांनीच केली होती. त्या शिबिरात चौतीसशे संख्या होती सबंध प्रांताची. त्याला अधिवेशन म्हटलं होतं. संघकामाला गती देण्यासाठी आमविश्वास जागृत होण्याच्या दृष्टीनं ते शिबिर उपयोगी ठरलं.
🔹पुण्याच्या घोषानं त्यावेळी आपला गुणात्मक ठसा उमटवला होता. काका ताम्हनकर, बापूराव दात्ये, बाळासाहेब करंदीकर या घोषातल्या दिग्गज कार्यकत्यांमुळे हे घडलं. घोषपथकांची रचना त्यांनी केली, घोष पथकं उभी केली. घोषातलं संघजीवन फार खडतर होतं. राबवणं हा शब्द बरोबर नाही. पण तेव्हाच्या भाषेतला शब्द म्हणजे अगदी पिदाडून घेत असत. दसऱ्याच्या आधी किमान दीड महिना कसून मेहनत चालत असे. रविवारी तर सकाळी कमीतकमी चार तास सराव व्हायचा. रोज दीड-दोन तास व्हायचा. सगळ्या वाद्यांची उत्तमरीतीनं तयारी करून घेणं, वाद्य स्वच्छ करणं, शृंग पथकातील वाद्यांना पॉलीश हे महिना-दीड महिना चालत असे. त्यामुळे पुण्याच्या घोषाचं एक अतिशय उत्तम रूप उभं राहिलं. फारच सुंदर घोष होता. वादकांची संख्याही किमान साठ ते शंभरपर्यंत पोहोचली असावी. आनक, शृंग, वंशी आणि शंख अशी दलं होती. नागूपरचा आणि पुण्याचा घोष यात स्पर्धा असे. ती चर्चा नेहमी गाजायची. निश्चितपणे स्पर्धा होतीच; पण पुण्याचा घोष फार श्रेष्ठ होता. शृंग घोष होता आणि मध्यल्या काळात पाच-सहा वर्ष कुक्कुट घोषही होता. साधारण १९५८ चा तो काळ होता, तेव्हा घोषाचं पूर्णतः भारतीयीकरण झालं. संपूर्ण घोषाचं केंद्र हे त्यावेळी मोतीबागच होतं. तिथेच घोषासंबंधीच्या सगळ्या घटना घडत. रचना चाले. माहिती दिली जात असे. झालेले बदल हे प्रत्यक्षात येत असत.

🔹मोतीबागेतील विविध विभाग हे देखील वैशिष्ट्यपूर्ण होते. भांडार विभागात श्रीपादराव सरदेशपांडे होते. कार्यालय व्यवस्था म्हणून सर्वप्रथम राजाभाऊ कुलकर्णी होते. ते पाचएक वर्ष होते. पण कार्यालयावर जास्तीतजास्त छाप ही आबा अभ्यंकरांची राहिलेली आहे. ते दीर्घकाळ या व्यवस्थेमध्ये राहिले. सगळ्या अधिकाऱ्यांचं येणं-जाणं, प्रवास व्यवस्था, खानपान व्यवस्था, मोतीबागेत येणाऱ्याची दखल घेणं या सगळ्या गोष्टी होत असत. ध्वनिव्यवस्थेत बाळासाहेब आपटे काम करत. प्रांताचे प्रचारकही तेथे थांबत असत. त्यांचाही तेथे सहवास असे. तेही व्यवस्थेत लक्ष घालत.
🔹बाळासाहेब साठे जेव्हा शहर प्रचारक म्हणून आले, तेव्हा मोतीबाग हे कार्याचं केंद्र झालं. व्यक्तिगत संपर्क, काही कार्यक्रमांची रचना, योजना यात बाळासाहेबांचा सहभाग असे. श्रीगुरुजींच्या अनेक बैठका तिथल्या मला आठवत आहेत. मा. दादाराव परमार्थ, यादवराव जोशी, एकनाथजी रानडे यांचीही बैठक आठवते. मा. यादवराव, एकनाथजी यांचे बौद्धिक वर्गही झाल्याचं मला आठवतं. मा. बाबाराव भिडे यांचे अनेक बौद्धिक वर्ग तेथे झाले होते. संस्कृतपंडित श्री. भा. वर्णेकर यांचा संस्कृतमध्ये झालेला बौद्धिक वर्गही मला आठवतो. शहराचे कार्यक्रम, उपक्रम, शहराची मासिक बैठक मोतीबागेतच होत असे. एक चळवळीचं चांगलं केंद्र, जिथे स्वयंसेवक सारखे येत आहेत, संवाद होत आहे, गप्पा-गोष्टी होत आहेत, असं ते केंद्र बनलं होतं. अप्पासाहेब सोहनी आणि चिं. ना. उर्फ बंडोपंत परचुरे हे दोघे मंडल प्रमुख ज्यांनी या सबंध कामाला फार मोठी गती दिली, त्यांचा मी जरूर उल्लेख करीन. तरुण स्वयंसेवकांशी संपर्क, संवाद, त्यांना कार्यक्रमात सहभागी करून घेणं हे ते करत असत.

🔹मी प्रल्हाद शाखेवर म्हणजे मोतीबागेतील शाखेवर मुख्यशिक्षक असतानाच मा. अटलबिहारी शाखेवर स्वयंसेवक म्हणून आले होते. अगदी शाखावेषात आले होते. मला वाटतं जनसंघाची काही बैठक होती. त्या सगळ्यांचा मुक्काम नातू मंगल कार्यालयात होता. कन्याशाळेच्या समोर ते कार्यालय होतं. त्यामुळे सगळे संध्याकाळी शाखेवर आले होते. रघुनाथराव देशपांडे त्यावेळी शहर कार्यवाह होते. ते मला म्हणाले, तूच शाखा घ्यायची आहेस. म्हटलं, हे सगळे मोठेमोठे लोक आलेत…, तर म्हणाले येऊ दे की, ऐकतील सगळं. ते सगळे आले शाखेवर. शाखा संपल्यानंतर मंडलात उभं राहून सगळ्यांनी परिचय करून दिला. अटलजींनी स्वतःचा परिचय करून दिलेला माझ्या अगदी पक्क्या स्मरणात आहे. डोळ्यापुढे आहे आजही. पं. प्रेमनाथ डोगराही आमच्या शाखेवर आले होते.
🔹प्रांतिक बैठका बहुशः मोतीबागेतच व्हायच्या. अशा अनेक बैठका मला आठवतायंत. मा. बाबा भिडे यांच्या उपस्थितीतील बैठका, मा. अखिल भारतीय कार्यकत्यांचे प्रवास, बैठका हेही माझ्या स्मरणात आहे. बाबांच्या बैठकीत प्रत्येक कार्यकर्त्याची दखल किंबहुना मी हा शब्द वापरला तर अयोग्य होणार नाही, म्हणजे कार्यकर्त्याची उलटतपासणी घेतली जायची. ते स्वरूप कधीकधी तिखट तर कधीकधी रंजक असंही होत असे. बाबा तपशीलवार सगळ्या गोष्टींची माहिती घेत असत आणि त्या माध्यमातूनच अनेक गोष्टी सगळ्यांच्यासमोर मांडायचा प्रयत्न करत असत.
🔹मोतीबागेचा इतिहास हा तिथल्या वास्तूचा दगडामातीचा इतिहास नाही. हा इतिहास तिथे जे काही काम उभं राहिलं, त्या माध्यमातून कार्यकर्ते निर्माण कसे झाले, तिथे वास्तूमध्ये राहणारे किंवा येणारे ज्येष्ठ कार्यकर्ते त्यांचा प्रभाव कशा पद्धतीनं इतरांवर पडत गेला, त्यांच्याकडून वेगवेगळे विषय कसे विकसित झाले, असा तो सगळा विषय आहे, असं मला वाटतं.
🔹मा. दामुअण्णा दाते, मुकुंदराव पणशीकर यांचं वास्तव्य मोतीबागेत खूप दीर्घकाळ होतं. या दोघांनी महाराष्ट्राच्या संघकामावर आणि अन्य क्षेत्रातील विविध कामांवर विलक्षण छाप पाडलेली आहे. काही काही नवीन विषयांचं उगमस्थान मोतीबागेत आहे, असं निश्चितपणे म्हणता येईल. आज जो विषय सर्वदूर झालेला आहे तो म्हणजे समरसता मंच. पूर्णपणे काही कल्पना संघानं समाजात कशा रुजवल्या, प्रस्थापित केल्या त्याचं हे उदाहरण. हा विषय पूर्णपणे नव्यानं विकसित केला गेला आणि याचं फार मोठं श्रेय हे दामुअण्णांचं आहे. एखादी संज्ञा निर्माण करणं, प्रस्थापित करणं, रूढ करणं, रुजवणं असं हे उदाहरण आहे. दुसरा असाच एक विषय आहे. महिलांचं स्थान काय संघात, असं विचारलं जायचं. त्यातून पुढे भारतीय स्त्री शक्ती हे संघटन उभं राहिलं. महिलांचे वेगवेगळे विषय घेऊन संघविचाराच्या आधारावर त्या क्षेत्रात काम उभं केलं गेलं. भारतीय स्त्री शक्ती या संघटनेच्या उभारणीमध्ये नाना ढोबळे, दादासाहेब बेंद्रे यांचं मोठं योगदान होतं. आज ते अखिल भारतीय स्वरूपाचं संघटन आहे. हे दोन्ही विषय पूर्णपणे मोतीबागेत जन्माला आले. अशाप्रकारे अखिल भारतीय विषयांना जन्म देणं ही प्रक्रिया मोतीबागेत झालेली आहे.
🔹नित्य संघकामाखेरीज इतरही काही विषय मोतीबागेतून विकसित झाले. पहिला म्हणजे हिंदुस्थान साहित्य. जो पूर्णपणे नव्यानं विकसित झालेला विषय होता. बापूराव दात्ये यांनी तो सुरू केला. वेगवेगळी प्रकाशनं सुरू झाली आणि पूर्णपणे नवीन दालन संघकामाचं उघडलं गेलं. दुसरं म्हणजे जनकल्याण समितीचं पहिलं कार्यालयही मोतीबागेतच झालं. मा. प्रल्हादजी अभ्यंकर अध्यक्ष होते, नंतर अप्पासाहेब सोहनी अध्यक्ष झाले. जनकल्याण समितीचं पंजीकरण झालं ती बैठक मला आठवते. त्याला मा. मोरोपंत पिंगळे आले होते. अगदी छोटं असलेलं काम, एका छोट्या खोलीत सुरू झालेलं हे काम आता प्रांतभर झालेलं आहे.
🔹मा. बाळासाहेब देवरस, रज्जूभव्या, सुदर्शनजी या परमपूजनीय सरसंघचालकांचं वास्तव्य मोतीबागेत झालेलं आहे. त्या दृष्टीनं म्हणता येईल की, सरसंघचालकांच्या वास्तव्यानं पुनीत झालेलं असं ते ठिकाण आहे. ती एक स्मृती आणि त्यांच्याबरोबर झालेल्या बैठकी, संवाद हेही निश्चितपणे त्या वास्तूनं पाहिलेले आहेत.
🔹मोतीबाग हे संघाचं प्रमुख केंद्र म्हणून विकसित होण्यात अनेक पिढ्या खपलेल्या असल्या पाहिजेत. कार्यालय हे व्यवस्थेचं स्थान नसून संघटनासूत्र राबविणारं किंवा रुजविणारं स्थान आहे, असं विधान मी आता करू शकतो. तेव्हा काय होतं, ते समजत नव्हतं; पण कार्यालय म्हणजे तिथे सारखं काही ना काही तरी घडतंय. विचार मिळतोय, संघटनासूत्र बांधलं जातंय. माणसं निर्माण होतायंत, असं सतत होत असतं. आता तर म्हणता येईल नां, सत्तर वर्षं झाली. सत्तर वर्षांत किती पिढ्या गेल्या असतील. बारा वर्षांची एक पिढी म्हटली तर सहा पिढ्या गेल्या. आणि तो प्रवाह जो मला जाणवतोय, तो आजही अखंड चालूच आहे. किंबहुना तो विस्तारतोय, वेगवेगळ्या प्रकारांनी. वेगवेगळ्या कामांनी.
🔹वास्तू हे निमित्त. पण तिथे चालणाऱ्या गतिविधी, संवाद, विचारप्रसार, संघटन बांधणं, अनौपचारिक चालणारी एकत्रिकरणं, गप्पागोष्टी… या सगळ्यातून जे आपण म्हणतो की, संघकामामध्ये स्वयंसेवकाची जडणघडण होत राहते, ते मुख्यतः जाणवतं. कार्यालय ही नितांत आवश्यक गोष्ट आहे. अनेक स्मृती त्याच्याशी जोडल्या जातात. अनेक घटनांची साक्ष मिळते. त्यामुळे ते एक नुसतं स्मरणरंजन न होता तो एक संस्काराचा भाग होतो. संघाच्या प्रत्येक टप्प्यावरील विकासाची साक्ष या वास्तूतून मिळते ती अशी.
♦️(राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. अशोकराव कुकडे यांनी सांगितलेल्या आठवणींचे शब्दांकन.)♦️