मोठ्या दिलाचा कलाकार

1
523

मोठ्या ‘दिला’चा कलाकार, चित्रकार…
………………………….
महाराष्ट्राच्या अव्वल चित्रकारांमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं ते ज्येष्ठ चित्रकार नयन बाराहाते हे आज एकसष्टीमध्ये पदार्पण करत आहेत. त्यांच्या सगळ्या ऐतिहासिक कारकिर्दीमध्ये त्यांनी घडवलेले देशभरातील चित्रकार आणि आपल्या कामाचा ठसा उमटवून घडवलेला इतिहास नक्कीच नोंद घेण्यासारखा आहे. ज्येष्ठ साहित्यिक दत्ता भगत यांच्यापासून ते अतुल पेठे यांच्यापर्यंत नयन यांनी साहित्य क्षेत्रातल्या प्रत्येक मोठ्या व्यक्तीबरोबर काम केलं. पुस्तकाचं कव्हर करावं तर नयन बाराहाते यांनीच, असं त्यांच्याविषयी आजही सातत्याने बोललं जातं. ज्येष्ठ चित्रकार प्रमोद कांबळे यांच्यापासून ते डॉ. नरेंद्र बोरलेपवार यांच्यापर्यंत महाराष्ट्रातल्या, देशातल्या अनेक चित्रकारांबरोबर नयन बाराहाते यांनी काम केले. अनेक चित्रकार त्यांनी घडवले. आपल्या रंग-रेषांच्या भाषेला सामाजिक वेदनांची झालर लावणारा हा अवलिया कलाकार आपल्या राज्याची आणि समाजाची एक संपत्ती आहे. वेगळेपण जपणाऱ्या नयन बाराहाते यांच्या कार्यावर भावनिक प्रकाश टाकणारा ‘सकाळ’चे संपादक संदीप काळे यांचा हा लेख.
……………………………………………………………
नयन बाराहाते महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राला मिळालेला एक अनमोल हिरा. मला आठवतंय २००८ मध्ये मी नांदेडला आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीमध्ये रुजू झालो होतो. ‘उद्याचा मराठवाडा’चं आमचं एक सर्कल होतं. त्या सर्कलमध्ये नयन बाराहाते हेदेखील होते. सतत नव्याचा शोध घेणं, सातत्याने नवे उपक्रम राबवणे, इतरांच्या मदतीसाठी सातत्याने धडपडत राहणे, असे नयन बाराहाते मी सातत्याने अनुभवले आहेत. नाना संकटं पार करून नयन यांचा एकसष्टीपर्यंतचा प्रवास आज संपूर्णपणे डोळ्याखालून जातो तेव्हा लक्षात येतं- जेवढे या माणसाने निर्माण केलं, तेवढं या माणसाने भोगलंही. खरं तर हे भोग त्यांच्या वाट्याला येण्याचं कारण म्हणजे त्यांच्यामधला चांगुलपणा. मी त्यांच्या नागपूरपासून नांदेडपर्यंतच्या आणि मुंबईपासून ते परत आता नांदेडच्या धोंडे हॉस्पिटलपर्यंतचा सगळा प्रवास अनेकदा ऐकलाय, अनुभवलाय. या प्रवासामध्ये मीही अनेकदा त्यांच्या सोबतीला होतो. अगदी लहान भावासारखा. आज त्यांची एकसष्ठी आहे; पण या एकसष्टीमध्ये त्यांच्यामधला लहान निरागस सहा वर्षांचा बालक कायम आहे. लहान मुलाचं मन किती निरागस असतं, तसंच नयन यांचंही आहे. स्वतःसाठी त्यांनी कधी काही केलं असेल, असं मागच्या अनेक वर्षांमध्ये मी कधीही अनुभवलं नाही. दिलदारपणा आणि मनाचा मोठेपणा हे दोन गुण नयन यांची कवचकुंडले आहेत. माझ्या अनेक पुस्तकांचं कव्हर, अनेक पुस्तकांची सजावट आणि अनेक पुस्तकांमध्ये सातत्याने होणारे बदल यामध्ये नयन यांचा पूर्णपणे वाटा असायचा; किंबहुना तो आजही आहे. आपण म्हणतो ना, की चिरंतन टिकणाऱ्या प्रेमाची आस कुणालाच नसते; पण असं चिरंतन टिकणारं प्रेम फार कमी लोकांच्या वाट्याला येतं. नयन यांच्या वाट्याला असे चिरंतन टिकणारं कुणाचं प्रेम आलंच नाही, पण इतरांवर चिरंतन प्रेम करणारे, अनेकांना आयुष्यात उभं करणारे, अनेकांचे संसार उभे करून अनेकांना प्रेमाखातर मदत करणारे नयन आज एका अशा वळणावर आहेत, त्यांना प्रेमाच्या ओलाव्याची, स्पर्शाच्या आधाराची खूप गरज आहे. ते प्रेम त्यांना मिळत नाही, अशातला भाग नाही; पण मला सदैव भरभरून प्रेम मिळावं, या आशेने आयुष्यभर चातकासारखी वाट पाहणारे नयन आजही तृप्त झाले नाहीत, असं वारंवार दिसते. मागच्या अनेक वर्षांपासून माझं आणि नयन यांचं नातं मित्राचं, भावाचं अशा ऋणानुबंधाचे आहे, ज्याला कुठल्याही नात्याच्या पुढच्या धाग्यामध्ये बांधता येणार नाही. नयन माझ्यासोबत नसतील, तर मला करमत नाही आणि मी त्यांच्यासोबत नसेन, तर त्यांना करमत नाही, अशी आमची अवस्था असते. आम्ही दोघेही परिस्थितीने बांधले गेलो आहोत.
मुंबईच्या कोकिळाबेन अंबानी रुग्णालयातील तो सगळा प्रवास आज डोळ्यासमोर आला, तरी‍ अंगावर काटा येतो. शत्रूवरही वेळ येऊ नये, असं सगळं नयन यांनी अगदी हसत हसत केलं. म्हणजे जिंदा दिल काय असतं, मनाचा मोठेपणा काय असतो, हे नयन यांच्याकडून शिकलं पाहिजे. कोणी नसताना अनेक वेळा आम्ही एकमेकांचे हात हातात घेऊन मनसोक्तपणे रडलेले अनेक प्रसंग मला आठवतात. कधी आईची आठवण, कधी सायली नसताना सायलीची आठवण, नातू साहुलला एकदा तरी आपण गोंजारले पाहिजे, या भावनेतून त्यांच्या डोळ्यातले अश्रू बाहेर पडायचे. सदैव प्रेमाचा भुकेला असलेल्या या माणसाला, आपल्या माणसाला घेऊन कसे प्रेम व्यक्त करावं, असं व्हायचं. त्यातून भावूक होताना आम्ही कित्येक वेळा अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे. माझ्यासारख्या अनेक माणसांना एक ओळख निर्माण करून देण्याचे काम नयन यांनी केलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक चित्रकार, कलाकारांचा पाठीराखा आणि गुरू म्हणून नयन यांची ओळख अवघ्या राज्याला आहे. ते आज एकसष्टीमध्ये पदार्पण करत आहेत. काळाची समीकरणं बदलत आहेत; पण अनेक माणसं अशी असतात, की जे आपल्या विचारावर आपल्या नीतिमूल्यावर ठाम असतात, त्यामध्ये नयन यांचं नाव सर्वात पुढे असेल. नयन यांचा जावई सुरी मला सातत्याने म्हणत असतो की, नयन माझे सासरे नाहीत, ते माझे वडील आहेत. त्यांच्यासाठी मला जे काही करता येईल, ते मी सातत्याने करत राहील. नयन यांच्याविषयी बोलताना सुरी यांच्या डोळ्यात नयन यांच्याविषयी जी चमक होती, त्यात मला सातत्याने आपलेपणा जाणवत होता. सायलीताई म्हणजे नयन यांची मुलगी, अगदी सावलीप्रमाणे आईसारखी नयन यांच्या ती मागे- मागे असते. म्हणजे फार कमी बापांच्या आयुष्यामध्ये असा क्षण येत असेल, जिथे त्यांची मुलगी आई म्हणून त्यांच्या पाठीमागे उभी असते. अडचणीच्या काळात त्यांना साथ देते, त्यांच्या आजारपणाचा या सगळ्या काळामध्ये सायलीचं धडपडेपण मी सातत्याने अनुभवलं आहे. सतत येणाऱ्या अडचणींत साथ सोडून जाणाऱ्या माणसांची नयन यांच्या आयुष्यात कमतरता नाही; पण तेव्हढीच आपलेपण जपणारी मोठी माणसे नयन यांनी जोडली आणि ती टिकवली आहेत.
नयन यांचा हळवा स्वभाव म्हणजे एका लहान मुलासारखा. त्यांच्यातले लहान मूल आणि तत्त्वमूल्ये यांची गोळाबेरीज करून रोज नव्याने आयुष्याची लढाई जिंकताना सायलीसह माझ्यासारख्या अनेकांची पळापळ होते. त्यांचा प्रत्येक निर्णय भविष्याची नांदी ठरतो.

नयन सर यांच्यावर भरभरून प्रेम करणारी मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सापडतील. मनोज बोरगावकर सर, राम शेवडीकर सर, डॉ. वृषाली किन्हाळकर मॅडम, प्राचार्य डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, डॉ. नितीन जोशी सर, पत्रकार यामिनी दळवी, विशेषतः ज्यांचा उल्लेख मला आवर्जून अभिमानाने करावासा वाटतो ते म्हणजे ज्येष्ठ कलावंत अतुल पेठे सर… जीवाला जीव देणारी माणसं काय असतात, ते मी या माणसांकडे पाहतो तेव्हा माझ्या लक्षात येतं. मला नयन यांची थोडी जरी सेवा करता आली, तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन; पण तसे होत नाही. कारण ते नांदेडला नि मी मुंबईत. आपण आयुष्यामध्ये घरदार, संपत्ती खूप काही कमवू; पण अशी निष्ठेने सतत आपल्या सोबत असणारी माणसं कमावणे ज्याला जमते तो खरा श्रीमंत. अशी माणसं नयन यांनी कमावली, त्यांना आयुष्यात उभं केलं, त्यांच्यासाठी वाटेल ते केलं. खरं तर आज या सगळ्या आपल्या माणसांकडून खारीची मदत घेतांना नयन यांना संकोच वाटतो, त्यांना दुःख होतं, की मी सगळ्या माणसांची मदत का घेतोय. कुणाच्या उपकाराचे ओझे माझ्यावर नको, अशी ओरड माझ्याकडे करताना नयन यांची होणारी चिडचिड आम्ही अनुभवलेय. त्यांनी अनेकांना आयुष्यात उभं केलं, एखाद्या तळहातावर असणाऱ्या फोडाप्रमाणे आपल्या लहान मुलाला गोंजारून समजून सांगणाऱ्या आईप्रमाणे मीही नयन यांना अनेक वेळा अनुभवलं. कोकिळाबेन रुग्णालय, अंधेरी, फुनतांबा आणि आता नांदेड या रुग्णालयांच्या अवघड प्रवासात मी नयन यांच्याबरोबर होतो. मला खारीचा वाटा उचलता आला. डॉक्टर मला थेट बोलायचे, अनेकांशी माझा थेट संवाद व्हायचा, त्या संवादानंतर मी कित्येक रात्र जागून काढल्या. नयन यांचे यांचे काय होणार, याचा विचार करून झोप उडून जायची. अनेक वेळा काळजीने आजारी पडून मला माझंच काहीतरी होईल, याची चिंता वाटायला लागली होती. नयन या सगळ्या अडचणींच्या काळात इतके खंबीर होते आणि आजही आहेत, की त्याचं वर्णन मी शब्दात करू शकत नाही. मी या दवाखान्याच्या प्रवासाला कधीही शब्दात उतरविण्याची हिंमत यापुढे करणार नाही. त्याचं कारण प्रत्येक क्षण इतके वाईट आणि अवघड काढलेले आहेत, की आपण त्यावर चर्चा न केलेली बरी. काही क्षण असेच गेले की मी हॉस्पिटलबाहेर बाकावर बसून कित्येक वेळा हमसून हमसून रडून काढले आहेत. खूप त्रास करून, हाती काहीही पडत नव्हते. अशा परिस्थितीत आत्महत्या करावीशी वाटते, असे विचार नयन सतत मनात आणायचे. या सगळ्या परिस्थितीपुढे मी अनेक वेळा हतबल झालो; पण तो त्यांचा विचार हा क्षणिक असायचा. दुसऱ्या क्षणाला कोणी तरी त्यांना भेटायला यायचं, तेव्हा ते सगळं विसरून जाऊन आनंदी राहायचा प्रयत्न करायचे. त्यांचा हा आनंदी राहण्याचा प्रयत्न हा आजारातून बरे होण्याचा मार्ग ठरला आहे.

नांदेडला राहून महाराष्ट्राच्या, देशाच्या अनेक कलाकारांना आपलंसं करणारा हा हिरा कित्येक चित्रकारांच्या गळ्यातलं ताईत आहे. मला आठवते की, मी जेव्हा चित्रकार डॉ. नरेंद्र बोरलेपवार यांना पहिल्यांदा भेटलो तेव्हा ते नयन बाहाराते सरांविषयी जे काही बोलत होते ते मी ऐकून थक्क झालो. डॉ. बोरलेपवार आज देशातल्या दहा टॉप चित्रकारांपैकी एक आहेत. ते मला म्हणाले, संदीप, मी नांदेडमध्ये एमजीएमला शिकत होतो. नयन यांच्याविषयी मी खूप वेळा ऐकले होते. दोन दिवस मी नयन यांच्या ऑफिसच्या अवतीभोवती चकरा मारल्या. त्यांना भेटण्याची माझी हिंमत झाली नाही. आपण त्यांना भेटलो, तर ते आपल्याला काय बोलतील, काय प्रश्न विचारतील, या सगळ्या विचाराने मी भांबावून गेलो होतो. पुढे खूप वर्षांनंतर त्यांच्याशी फोनवरून बोलायचा प्रयत्न केला. त्यानंतर आमची मैत्री झाली. नयन हे जसे चित्रकार आहेत, तसे ते आई मनाचे साथीदार आहेत. अशा बोरलेपवार यांनी माझ्याकडे नयनबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये, आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये नयन यांची असलेली मैत्री सगळ्यांना माहिती कोकिळाबेनला असताना आयपीएस मनोज कुमार शर्मा, आयपीएस संदीप भाजीभाकरे, आयपीएस विश्वास नांगरे पाटील. आयएएस सुमंत भांगे, आयएस डॉ. महेंद्र कल्याणकर हे निर्णय घेऊन सातत्याने माझ्याकडे विचारणा करायचे. अनेक जण दवाखान्यामध्ये पण भेटायला आले. नयन चुकून चित्रकार झाले, ते मोठे जनसंपर्क अधिकारी व्हायला पाहिजे होते. कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा खूप मोठा जनसंपर्क आहे. त्या प्रत्येक लोकांना जपण्याचे वेगळे कसब नयन यांच्यामध्ये आहे. अतुल पेठे यांचा उल्लेख मला या ठिकाणी आवर्जून करावासा वाटतो. अतुल पेठे यांनी नयन यांच्या त्या सगळ्या अडचणींच्या काळामध्ये जे काही योगदान दिले आहे, ते खूप महत्त्वाचे आहे. एक कलाकार एका दुसऱ्या कलाकाराच्या भावना कशा पद्धतीने ओळखू शकतो, त्याच्या अडचणी कशा सोडवू शकतो, यावर अतुल पेठे यांनी केलेले प्रयोग आणि त्यांची काम करण्याची पद्धत मी अनुभवली. अशी माणसं आपल्या आयुष्यात येणं म्हणजे सगळ्यात कमावलेलं धन म्हणावं लागेल.
माझ्या पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नांदेडमध्ये माझे मामा कविवर्य प्रा. फ. मुं. शिंदे यांच्या हस्ते झाला होता. मला आजही आठवते, त्या पुस्तकाचं कव्हर आणि पुस्तकाची एकूण मांडणी नयन यांनी केली होती. कार्यक्रम माझा होता, त्या पुस्तकाचा लेखक मी होतो, पण शिंदे सरांनी त्या कार्यक्रमात आवर्जून उल्लेख केला तो नयन सर यांचा. केवळ उल्लेख न करता नयन बाराहाते यांच्यावर केलेल्या मुखपृष्ठावर छानपणे कविता केली होती. ती कविता अशी होती
कवडसा आला तो
करात घेतला मी
प्रहर कुणाचीही
घरात घेतला मी
छत फाटके तुटके
जन्माचे उघडे
भरपावसाचा
मेघ घरात घेतला मी
होते मोजण्यास की ते शिवार भुकेले
ज्वालामुखी जवळ घरात घेतला मी
नखीतला निरंतर शोध
दुखण्याचा आहे
पदरात सोन्याच्या दरात घेतला मी

नांदेडच्या जिल्हा परिषदेमध्ये असणाऱ्या सभागृहात नयन यांच्या कलाकृतीवर केलेल्या या काव्याने सगळे जण सुखावून गेले होते. एखाद्या पुस्तकाची सजावट करावी तर नयन बारहाते यांनीच, अशी ओळख महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून झालेल्या हा महान कलाकार आज ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. एकसष्टी साजरी होताना नयन यांनी निर्माण केलेल्या त्या प्रत्येक नवकलेची आज पुन्हा आठवण होते. हा चित्रकार, हा दिलदार माणूस आपल्यामध्ये चिरंतर असाच टिकून राहावा आणि त्याचं इतरांवर निरागस प्रेम करण्याचं सातत्य कायम असंच टिकून राहावं, अशी अपेक्षा ठेवून आज इथेच थांबतो.

– संदीप काळे

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here