❤️ बहती हवासा था वो….
उडती पतंगसा था वो….❤️
, मनाच्या एका मखमली कोपर्यात कधी निवांत चुकार क्षणी डोकावून पाहीलंय?? असंख्य चित्रविचित्र गोष्टींचा खजिना सापडेल… लहान वयांतील निरागस लाघवी कट्टीबट्टी, पेन्सीलच्या तुकड्यांच्या मोबदल्यात घेतलेले वासाचे विविध रंगी विविध ढंगी खोडरबर्स, स्टिकर्स, चकाकत्या गोट्या, रंगीत तेली खडूचे तुकडे, मोरपिसे, चिंचोके… कधी गोड गुपीते एकमेकांसोबत चाखलेली चिंचबोरांच्या चवीने… मग हळूहळू वासाची गुलाबी कागदावरची झुळझुळती वळणदार अक्षरे… हव्याहव्याशा भावनेने ओथंबलेली… मग चिठ्ठ्या आठवणींत झुरणार्या… स्वप्ने… चांदणं लगडलेली… मैत्रीच्या वाटा कधी एकरूप होतात, कधी दुरावतात… कधीतरी कुठल्यातरी वळणावर भेटूच…नक्की!! अशा लोभस भाबड्या विश्वासावर विसंबून!🥰
सोशल मिडीयाने एक केलेयं… असे दुरावलेले मैत्र जीवांचे पुन्हा भेटताहेत… मनाच्या त्या मखमली कोपर्यातील जपलेल्या असंख्य गोष्टी हळूहळू बाहेर येताहेत… आठवणी पुन्हा उजळताहेत… सोडावॉटरच्या फसफसत्या उत्साहाने… किंचीत ओलावलेल्या पापण्यांनी … कुठे दोन अनोळखी जीव असेच भरकटत्या क्लिक्स वर फेस टू फेस येतात… आणि मग सुरू होतात न संपणार्या गप्पा… अविरत!! विचारांचे आदान प्रदान, माहीतीचे आदान प्रदान, पुढे पुढे मग फोटोंचे आणि कधी तरी मनांचे, भावनांचे, हृदयांचेही!! ^_^
मैत्री… असे एकमेव नाते जे तुमच्यावर लादलेले नसते. तुम्ही तुमच्या मर्जीने त्यातल्या गुणदोषांसहीत ते स्विकारलेले असते. हल्ली परीस्थिती परिणामकारक रित्या बदलतेय… अहो बाबांचा ए बाबा होऊन आईबरोबरचे शेअर केले जाणारे निरागस सिक्रेट्स बाबालाही उमजू लागलेत. धाकाच्या भीतीने शिवलेल्या ओठांची कळी हळूहळू मित्रत्वाच्या भावनेने उमलू लागलेय. पती पत्नींमधील अधिकारवाणीची जागा मैत्रीयुक्त हक्काने घ्यायला सुरूवात केलेय. निखळ मैत्री फुलायला जोपासायला साधना लागते. गैरसमज कसोशीने दूर ठेवण्याची, एकमेकांवर विश्वास ठेवण्याची, एकमेकांच्या चांगल्या सोबत वाईट पदरालाही नकळत आपलंसं करण्याची, यशावर कौतुकाची थाप आणि चूकीवर न चुकता कानउघाडणी करण्याची…. प्रांजळ आणि परिपक्व साधना!!! ती जमली की आपण एकटं आहोत असं वाटायची भीती नाहीच उरत.🌹
वयाचे, नात्याचे, अंतराचे, प्रांताचे, जातीधर्माचे, लिंगाचे कसलेच बंधन नाही मैत्रीला… बस्स विचारांची सहजसुंदर गुंफण झाली की झालं!! नेहमीच्या लोकलला नेहमीच्या डब्यात सहज एका हास्यातून साधले जाणारे संपर्क असोत मग नाव गाव ही माहीत नसताना रोज जागा राखून ठेवण्यापासून देशांतर्गत महत्वाच्या घडामोडींवर समस्यांवर तावातावाने केलेली चर्चा असो, मोबाईलवरचे ढकललेले आचरट जोक्स आणि त्यावर पिकणारी खसखस किंवा फुटणारा हास्याचा गडगडाटी फवारा असो… आपल्या दु:खात हळूवार पाठीवर फिरणारा सांत्वनाचा हात असो की खचलेल्या मनाला उभारी देणारे उबदार शब्द असोत… सगळंच लोभस, हवंहवंसं मैत्रीच्या हळूवार मखमली पोताने लपेटलेलं!! सोबत महत्वाची!!! मग ती कोणाचीही असो… आईवडीलांच्या उबदार सुरक्षित पंखांची, आयुष्याच्या वाटेवर ठायी ठायी भेटणार्या समवैचारिक दोस्तांची, आयुष्यभराच्या साथीदाराची, निसर्गाची, पुस्तकांची, पशुपक्ष्यांची, स्वतःच्या विचारांची…!!!❣️
कधी काळी कुठे भेटलो आणि आयुष्याच्या प्रवासात अखंड भेटत राहीलो, दुरावलो तरी आपुलकी, जिव्हाळा, भावना त्याच राहील्या… पुन्हा परतून भेटल्यावर काळाचे अंतरही सहज पुसले जावे अलगद हाताने तसे भेटलो, त्याच उत्साहाने, त्याच आपुलकीने… जीवाभावाचे मैत्र कधी कुठे कसे जुळले हे ही आठवत नसेल आता… आठवतात फक्त ते क्षण तुमच्या सोबत व्यतीत केलेले… तुमच्यापाशी मन मोकळे केलेले… आठवते तुम्ही संयमाने सारे सारे ऐकून घेतलेले, कधी गप्प राहून केलेले सांत्वन, कधी उमेदीचे आपुलकीचे शब्द, कधी दुखर्या जखमांवर घातलेली फुंकर… हसत हसवत…, कधी गैरसमजाने दुरावलो तर मोकळेपणाने अहंकाराच्या गाठी अलवार हातांनी सोडवत पुन्हा घातलेली उत्कट साद… कसलीही अपेक्षा न करता… दिलेली उत्कट साथ!!! उजळलेल्या आनंदाच्या क्षणांनी भरून टाकलेली आयुष्याची ओंजळ तुमच्या साथीत अशीच कायम भरभरून ओसंडून वाहत राहो… आणि तेवढेच उत्कट दान तुमच्या ओंजळीत पडो… हिच ईश्वरचरणी प्रार्थना!!🙏
आयुष्याच्या वाटेवर निरनिराळ्या वळणांवर भेटलेल्या माझ्या सर्व मित्र मैत्रीणींना समर्पित!!! तुमच्या मुळे मी घडले-बिघडले… 😉 😀 आणि आज जे काही आहे ते तुमच्या मुळे!!! 🙂 तुम्ही फक्त सोबत राहा… मी दुसरे काही मागत नाही… 🙂 हॅप्पीवाला फ्रेंडशीप डे!! आज, उद्या, परवा, रोज…!!❤️
जयंंती देशमुख