मुलाखत

0
246

*आनंदी जीवनासाठी आवडीनुसार करिअर निवडावे*

                        *- देवेंद्र भुजबळ* 

जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी , जीवन आनंदाने जगण्यासाठी आपली आवड ,रुची कशात आहे हे लक्षात घेऊन आपले करिअर निवडावे , सामाजिक प्रभावांना बळी पडू नये असे मौलिक विचार महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे निवृत्त संचालक व न्युज स्टोरी टुडे या वेब पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ यांनी व्यक्त केले.

शाळाबाह्य मुलांसाठी आणि शिक्षकांना नवी दिशा देण्याचे काम करणाऱ्या बाल रक्षक प्रतिष्ठाणच्या अध्यक्षा राणी खेडेकर यांनी ‘ करियर की नई दिशाए’ या कार्यक्रमात मंगळवारी भुजबळ यांची फेसबुक लाईव्ह मुलाखत घेतली त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य विज्ञान संस्थेचे संचालक तथा प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे उपसंचालक डॉ. रविंद्र रमतकर हे होते.

श्री भुजबळ पुढे म्हणाले की, करिअर करणे म्हणजे केवळ एखादा अभ्यासक्रम करणे किंवा नोकरी करणे नव्हे तर करिअर म्हणजे प्रगतीशील जीवन निर्माण करणे होय. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला जे करायचे त्या क्षेत्राची निवड केली पाहिजे. मात्र यासाठी आपली क्षमता आणि मर्यादाही लक्षात घेतल्या पाहिजे. पालकांनीही आपल्या मुलाने अमूकच एक क्षेत्र निवडावे असा आग्रह न धरता मुलामुलीची कल, आवड कुणीकडे आहे, हे पाहिले पाहिजे. तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात काम करीत असताना शासनाच्या महान्युज या पोर्टलवरून ‘करिअरनामा ‘ या सदरात २५० लेख लिहिल्याचे सांगून या लेखांना वृत्तपत्रातूनही व्यापक प्रसिद्धी मिळाल्याची माहिती देऊन पुढे त्याचे पुस्तकात रूपांतर झाल्याचे सांगितले.

देशात गेल्या एक वर्षात जवळपास 1 लाख 40 जणांनी आत्महत्या केल्या त्यापैकी 15 ते 35 वयोगटातील 90 हजार युवकांनी आत्महत्या केल्या. यावरून आमचे शिक्षण हे त्यांना जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करते की, त्यांच्यात नैराश्य निर्माण करतेे, याचा विचार करण्याची गरज आहे, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले. ज्यांनी आत्महत्या केली त्यांनी खरोखरच मनाप्रमाणे आपले करिअर निवडले होते काय ? असा प्रश्न उपस्थित होतो. युवकांनी जीवनात कितीही अपयश आले तरी त्यांनी आत्महत्येचा मार्ग न निवडता अपयश जीवनभराचे आहे, असे न मानता त्यास क्षणिक समजून पुढे गेले पाहिजे, असे आवाहनही भुजबळ यांनी या मुलाखतीतून केले.

इयत्ता दहावीमध्ये मलाही अपयश आले होते. पण मी आत्महत्येचा विचार झटकून त्या अपयशाला धीराने तोंड दिले आणि एक दिवस असा आला की त्या दिवशी माझ्याकडे वरिष्ठ पदाच्या सात नोकऱ्या होत्या. त्यामुळे कोणतेही अपयश आले तरी त्यास जीवनभराचे मानू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

आज आपल्या समोर अनेक पर्याय उभे असताना एकाच ठिकाणी आपण गर्दी का करावी? असा प्रश्न उपस्थित करुन कला, वाणिज्य, विज्ञान या अभ्यासक्रमांच्या अनेक शाखा असून आपल्या आवडीनुसार क्षमता आणि मर्यादा लक्षात घेऊन अभ्यासक्रम निवडावा व त्यात यशस्वी झाले पाहिजे. जेथे आपली आवडच नाही, त्या गर्दीत जाणेच थांबवले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. मी माझ्या आवडीनुसार क्षेत्र निवडले आणि त्यात यश मिळवले. मनाच्या आवडीनुसार क्षेत्र निवडल्यामुळे मला माझ्या कामात कोणतीही अडचण आली नाही, वा कंटाळा आला नाही. लोकांशी बोलून, त्यांचे प्रश्न सोडवण्यात मला आनंद मिळत होता. म्हणून आनंदाने जगा आणि दुसऱ्यालाही आनंदाने जगू द्या हे आपल्या जीवनाचे सूत्र असल्याचे देवेंद्र भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता पेठे यांनी केले. स्वाती अहिरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर सूत्रसंचालन रत्ना चौधरी यांनी केले. शेवटी प्रश्नोत्तरे देखील झाली.

हिंदीतून झालेल्या या वेबिनारमध्ये देशाच्या विविध भागातून शिक्षक, पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

-शेषराव वानखेडे

9869484800.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here