जानाई परिवाराच्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत
लातूर,ता.३:
हिंदु नववर्षाच्या पूर्वसंध्येला नववर्षाचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्राची प्रसिध्द गायिका,लिटल चॅम्प विजेती मुग्धा वैशंपायन यांच्या गायनाचा कार्यक्रमाला लातूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
श्री गुरूजी पतसंस्था व अर्थवर्धिनी जानाई महिला पतसंस्थेच्या संयुक्त विद्यामाने या कार्यक्रमाचे आयोजन दयानंद सभागृह येथे करण्यात आले होते.
मुग्धा वैशंपायन यांनी आपल्या गायनाची सुरुवात विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेल्या बोलावा विठ्ठल या प्रसिद्ध अभंगाने केली. पहिल्याच अभंगामध्ये मुग्धाने रसिकांवर एक वेगळीच पकड घेतली. पुढे सुखाचे हे सुख चंद्रभागे तटी, अमृताहुनी गोड, विष्णुमय जग वैष्णवांचा संग, नाट्यगीत नारायणा रमा रमणा, भावगीत मी राधिका मी प्रेमिका, पद्मनाभा नारायणा, माझे माहेर पंढरी, शेवटी अवघा रंग एक झाला या प्रसिद्ध भैरवीने मुग्धाने आपल्या गायनाची सांगता केली, या मैफॅमिली मध्ये तबला साथ रूपक वझे, संवादिनी साथ हर्षल काटदरे, पखावज साथ ज्ञानेश्वर दुधाने ,साईड रिदम निलेश पाठक, यांनी अतिशय बहारदार पणे व समर्पक केली या कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापिका प्रीती पोहेकर यांनी आपल्या मधाळ वाणीने केले,
हिंदु नववर्षाचे स्वागत करण्याचा उपक्रम गायिका मुग्धा यांच्या गायनाच्या कार्यक्रमा पासून सुरू करण्यात आला आहे व हा उपक्रम सातत्यांने दरवर्षी राबवला जाणार आहे असे अतुल ठोंबरे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगीतले. यावेळी व्यासपीठावर अर्थवर्धिनी पतसंस्थेच्या अध्यक्षा अभि.गीता ठोंबरे उपाध्यक्षा डाॅ.माधवी निरगुडे, श्री गुरूजी पतसंस्थेचे उपाध्यक्ष भूषण दाते उपस्थित होते .लातूरच्या रसिकांना दहा वर्षाने मला परत जोडण्याचा योग आला व नववर्षाचे स्वागत उपक्रमाची सुरवात माझ्या कार्यक्रमाने झाली या बद्दल मला विशेष आनंद आहे असे मनोगत मुग्धा यांनी व्यक्त केले . या सत्राचे ओघवते सुत्रसंचलन श्रीमती सुनिता पाटील यांनी केले.अर्थवर्धिनीच्या सर्व महिला संचालक मंडळाने पारंपारीक साडी वेशभूषेत सर्व उपस्थिताचे स्वागत केले व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरव्यवस्थापक संजय कुलकर्णी, व्यवस्थापक महेश पोतदार ,अमृता देशपांडे तसेच पतसंस्थेच्या सर्व कर्मच्या-यांनी विशेष परिश्रर घेतले. पद्मभूषण डाॅ अशोक कुकडे, डाॅ.ज्योत्सना कुकडे, कुमुदिनी भार्गव, डाॅ.विश्वास कुलकर्णी, डाॅ.अनुजा कुलकर्णी, डाॅ.अरूणा देवधर, डाॅ.रामदास बोकील, दादा बिलोलीकर, अनिल अंधोरीकर, मनोहर कबाडे यांची विशेष उपस्थिती होती.