सिनेमा सिनेमा
वसंतरावांसारख्या मुरब्बी कलावंताला दिलेली मानवंदना असणारा हा चित्रपट खरोखर त्यांच्या शास्त्रीय गायनक्षेत्राची गाथा सांगणाऱ्या एखाद्या साजेशा मैफलीसारखा वाटला.
मंद, शांत स्वरावलींतून मंद्र आणि मग तार सप्तकापर्यंत बेमालूमपणे नेणाऱ्या द्रुतगतीच्या शेवटी चटका लावूनही मनाला तृप्ती-अतृप्तीच्या स्वरहिंदोळ्यांवर मंत्रमुग्ध करून झुलवत नेणारा अनुभव होता. त्याची नशा, त्याचा कैफ, त्याचा गोडवा आणि त्याची हुरहूर न संपणारी, अवीट आहे. खूप काही बारीकसारीक तपशील नोंदवूनही, सारांशातच सांगणे श्रेयस्कर ! तरीही एका अचाट! अथांग स्वरभास्कराच्या साध्यासुध्या कुटुंबवत्सल जीवनाचा आणि कलाध्यास व कलासाधनेच्या तळपत्या तेजोनिधीचा समतोल सांभाळताना दिलेली हाताळणी (ट्रीटमेंट) अत्यंत संयत आणि सुखद आहे. शिवाय, कौतुक ह्याचं, की आत्तापर्यंत आलेल्या चरित्रपटांशी तुलना होण्याची शक्याता असूनही तो धोका लीलया पेलून, आधीच्या समधर्मी (‘कट्यार…’, ‘भाई’, ‘बालगंधर्व’ इ.) चित्रपटांपेक्षा काकणभर सरसच अनुभव देणाऱ्या दिग्दर्शकाचे विलक्षण कौतुक – नव्हे, आभारच !
त्याबरोबरच, अभिनय (अगदी लहानसहान भूमिकांपासून ते मुख्य व्यक्तिरेखेसह), संगीत, गीतलेखन, छायाचित्रण, संहिता, संदर्भ, संशोधन अशा सर्वच बाबतीत एक अत्यंत मोलाची कलाकृती दिल्याबद्दल अक्षरशः मन कृतज्ञतेनं भरून आलं.
अजून एका समाधानाची नोंद करणे क्रमप्राप्त आहे – ती म्हणजे काळाच्या कसोटीवरही कणखरपणे व खंबीरपणे उभ्या असलेल्या ह्या कलावंतांच्या तत्कालीन संघर्ष आणि कलानिष्ठेची जाण, समज, ज्ञान आणि भान नव्या पिढ्यांना अवगत करणाऱ्या ह्या कलाकृतीचा आनंद घेताना तरुण पिढीचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि अक्षरशः टाचणीचाही आवाज जाणवेल इतक्या शांततेत चित्रपट पहात होते.
चित्रपटात मा. दीनानाथांच्या तोंडी असलेल्या ‘आपल्या गाण्यानं रसिक स्तब्ध, शांत, अवाक् व्हावा’ अशा आशयाच्या आकांक्षेला न्याय मिळाल्याचा अनुभव घेता आला. ही जादू जेवढी शास्त्रीय संगीताची, वसंतरावांसारख्या दैवी कलावंताच्या महानतेची – तेवढीच हा अनुभव साकारणाऱ्या चित्रपटकलेचीही. (आमच्या बापजाद्या पिढीने आमच्या पिढीवर, ह्या कलावंतांशी ‘परिचय’ करून देणाऱ्या, केलेल्या संस्कारांचीही असेलच.)
धन्य वसंतराव ! धन्य ‘मी, वसंतराव…’ !
कुठल्याही क्षेत्रातल्या प्रत्येक कलावंताने व प्रत्येक रसिकाने पहावाच असा चित्रपट !
(क्रमशः – समाधान झाले नाही. सविस्तर तपशीलवार यथावकाश.)
डॉ. संतोष कुलकर्णी