माध्यमांची एकाधिकारशाही धोकेदायक असून
मालकांचे कान उपटण्याची हिम्मत दाखवावी
मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे वाचकांना आवाहन
मुंबई-
माध्यमांनी कायम विरोधी पक्षाची भूमिका बजवावी असं पुर्वी म्हटलं जायचं आज माध्यमं सरकारचे मित्र आणि सरकारधार्जिणी झाल्याने तेथे सामान्यांचा आवाज व्यक्त होत नाही.. जनसामांन्यांपासून माध्यमं दूर गेलीत म्हणून जनसामान्य वाचकांची चिडचिड असते.. त्याचा राग मग ते पडद्यावर दिसणाऱ्या संपादकांवर किंवा पत्रकारांवर काढतात.. हे थांबावं, माध्यमांची एकाधिकारशाही धोकादायक असून माध्यमांचा चेहरा मोहराच बदलून टाकणाऱ्या माध्यम समुहाच्या मालकांचे कान उपटण्याची हिंमत वाचकांनी दाखवावी असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी वाचकांना केले आहे.

एस. एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, माध्यमांवर सध्या जे दाखविलं जातं त्याचं खापर संपादक, पत्रकारांच्या माथी फोडलं जातं.. जी मंडळी ऊठ सूठ पत्रकारांच्या नावे ठणाणा करीत असते त्यांना मिडिया बद्दल काही माहिती नसते.. माध्यमात आज संपादक आणि पत्रकारांच्या हाती काहीही उरलं नाही… धोरण मालक ठरवितात, सीइओ त्यावर नजर ठेवतात.. वरती जाहिरात विभागाचं आक्रमण असतं.. या सर्व कचाट्यातून संपादक चॅनल किंवा वृत्तपत्र चालवतो.. मालक कायम संपादकांच्या मानगुटीवर बसलेला असतो.. प्रत्येक बातमी चालवताना संपादकाला वाचकाचा नव्हे तर मालकाचा विचार करावा लागतो.. परिणामतः संपादकांना वाचकांच्या शिव्या खाव्या लागतात.. खरं तर शिव्या द्यायच्याच असतील तर त्या मालकांना दिल्या पाहिजेत.. पण वाचकांची तेवढी पोच नसते, हिंमतही नसते.. त्यामुळे वाचक सारा राग संपादकांवर काढून मोकळे होतात..संपादकांना शिव्या घालण्याची आणखी एक संधी वाचकांना मिळणार आहे.. माध्यम क्षेत्रात रिलायन्सचा दबदबा आहे.. ३५ पेक्षा जास्त रिलायन्सचे चॅनल्स आहेत असं सांगितलं जातं.. आता अदानी देखील या क्षेत्रात पदार्पण करीत आहेत.. म्हणजे रिलायन्स आणि अदानी मिळून माध्यमांवर कब्जा मिळविणार आहेत.. अदानीचे माध्यम धोरण जनहिताचे थोडेच असेल? असणारच नाही.. त्यामुळे ते दाखवतील ते आपण संपादकांना शिव्या देत देत पाहणार. असे नमुद करीत देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रातला 90 टक्के वाचक हा राज्यातील सहा मोठ्या वृत्तपत्र समुहाच्या ताब्यात आहे.. राहिलेल्या जवळपास ३०० जिल्हा आणि विभागीय वर्तमानपत्राकडे केवळ दहा टक्के वाचक आहे.. त्यामुळे सरकार या सहा माध्यमांना धरून असते.. तीच गोष्ट केंद्रात रिलायन्स आणि अदानी समुहाबाबत असले.. माध्यमांची ही एकाधिकारशाही चौथ्या स्तंभासाठीच नव्हे तर लोकशाहीसाठी देखील मारक आहे.. दिवाणखान्यात बसून संपादकांना शिव्या घालणारे वाचक देशातील २५ माध्यम समुहाच्या ताब्यात कशी एकवटली आहेत आणि त्यातून कसे वैचारिक प्रदूषण निर्माण केले जात आहे यावर बोलत नाही.. पुढारीही बोलत नाहीत.. कारण हे भांडवलदार मालक पुढाऱ्यांचे आणि सत्ताधारी मंडळीचे मित्र आहेत.. त्यामुळे वर्तमानपत्रात Exclusive बातम्या दिसत नाहीत.. त्याची जागा ‘ब्रेकींग न्युज’ ने घेतली आहे.. एखाद्या नटीला तिसरे मुल झाले तरी ती ब्रेकिंग न्युज न्यूज ठरते.. म्हणजे माध्यम मालकांनी सारे प्राधान्यक्रम बदलून टाकले आहेत.