आई-वडिलांचे प्रेम बाजारात विकत मिळत नाही
या प्रेमाचे मोलही होऊ शकत नाही – आ. कराड
लातूर दि. ०७– आई-वडील कष्ट करून मुलांना लहानाचं मोठं करतात मात्र त्यांच्या कष्टाचं मोल काहीजण करत नाहीत. आई-वडीलांचे प्रेम बाजारात विकत मिळत नाही त्यांच्या प्रेमाचे मोल कशातही तोलू शकत नाही. आई-वडील गेल्यावर जीवन जगताना निश्चितच त्यांची उणीव भासते, जाणीव होते, आई-वडील वृध्दाश्रमाकडे जाणार नाहीत अशा संस्काराची मुलांना आणि नातवांना गरज आहे असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी केले.
लातूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील आजी आजोबा यांच्यासह वृद्धाश्रमाचे हितचिंतक यांच्या समवेत दीपावली कार्यक्रम रविवारी सायंकाळी झाला. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड, जेष्ठ पत्रकार प्रदीप नणंदकर, सौ. संजीवनीताई कराड, मातोश्री वृद्धाश्रमाचे अध्यक्ष डॉ. महेश देवधर यांची प्रमुख उपस्थिती होती, या मंगलमय कार्यक्रमास पद्मभूषण डॉ. अशोककाका कुकडे, डॉ. जोत्सनाताई कुकडे, नितीन शेटे, अनिल अंधोरीकर यांच्यासह विवेकानंद प्रतिष्ठान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे पदाधिकारी, लातूर शहरातील विविध क्षेत्रातील वृद्धाश्रमाचे हितचिंतक महिला पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, गेल्या २५-३० वर्षापुर्वी राज्यात वृध्दाश्रम सुरू झाली. काळाची गरज म्हणून आपण ती स्वीकारली मात्र आई-वडील, आजी-आजोबांना वृद्धाश्रमात येण्याची वेळ का आली ? मुलांना, नातवांना संस्कार करण्यात आपण कमी पडलो का ? असा प्रश्न उपस्थित करून एकत्र कुटूंब पध्दत लोप पावत चालली आहे. कुटूंब जर एकत्र राहिले तर कुटूंबातील प्रत्येकाशी आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम कायम राहते. तेव्हा अशा परिस्थितीत पुढच्या पीढीतील मुलांवर आणि नातवांवर कांही चांगले संस्कार करता येतील का यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. माझा जन्म सांप्रदायीक कुटूंबात झाला असून आमचे संपूर्ण कुटूंब आजही एकत्रीत आहे. सण, उत्सव, कार्यक्रम आम्ही सर्वजण एकत्रीत करतो, माझ्यावर आध्यात्मीक, सामाजिक संस्कार आहेत.
ज्या ज्या वेळी मी मातोश्री वृध्दाश्रमात आलो तेव्हा मनाला वेदना झाल्या. जेव्हा आपण दुःखी असतो, अडचणीत सापडतो तेव्हा मंदिरात जातो आणि मनःशांती करून घेतो. त्या प्रमाणे या वृध्दाश्रमात इथल्या आजी आजोबाचे प्रेम, आनंददायी वातावरण पाहून मंदिरात गेल्याप्रमाणे आत्मिक समाधान लाभते मातोश्री वृद्धाश्रम ऐवजी विवेकानंद आनंदश्रम असे नामकरण करावे अशी सूचना करून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, मला मिळालेल्या आमदारकीचा उपयोग गोर गरीब सर्वसामान्य कुटूंबाचे अश्रू पुसण्यासाठी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मातोश्री वृध्दाश्रमा करीता आपण जे सांगाल ती जबाबदारी स्वीकारून पुर्ण करेन हे मी उपकार करत नाही तर माझं कर्तव्य म्हणून करीन असेही त्यांनी बोलून दाखविले.
मोबाईल युगात एकमेकांशी असलेला संवाद कमी झाला, नवरा-बायको, मुलं, आजी-आजोबा एकमेकांना बोलण्यास वेळ नाही कुटूंबातील संवाद हरवला आहे याचे आत्मपरिक्षण करण्याची आज प्रत्येकावर वेळ आली आहे असे सांगून पत्रकार प्रदिप नणंदकर म्हणाले की, शिक्षण घेवून आज मुल सुसक्षित झाली, मोठया पदावर काम करत आहेत परंतू संस्कार नसल्याने आई-वडीलांना सांभाळणे त्यांना नकोशे वाटते आहे. दुर्दैवाने आज आई-वडील, आजी-आजोबांना वृध्दाश्रमाचा आधार घ्यावा लागत आहे. आनंददायी वातावरण, आपुलकी, जिव्हाळा, सर्व सोयी सुविधा असलेल्या राज्यातील पहिल्या पाच मध्ये लातूरचे मातोश्री वृध्दाश्रम आहे असे बोलून दाखविले.
प्रारंभी डॉ. महेश देवधर यांनी वृद्धाश्रमाच्या उभारणी पासून आत्तापर्यंतच्या प्रवासाची सविस्तर माहिती दिली तर पत्रकार प्रदीप नणंदकर यांनी आपले विचार व्यक्त करून प्रत्येकानी वृद्धाश्रमातील आजी आजोबा साठी वेळ द्यावा अशी विनंती केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जितेंद्र जोशी यांनी केले नाट्यस्पंदन प्रतिष्ठान लातूर यांच्या वतीने कार्यक्रमाच्या सुरूवातीस संगीताचा कार्यक्रम झाला शेवटी कार्यवाह गंगाधर खेडकर यांनी आभार मानले.