भावपूर्ण श्रद्धांजली
1960 च्या दशकाची ‘तरुणांचं दशक’ अशी ओळख आहे. जागतिक पातळीवर, तशीच महाराष्ट्रातही. विज्ञानाचा तो काळ होता. विज्ञानाचं, वैद्यकीय क्षेत्राचं वि-रहस्यीकरण करण्यावर भर होता. ‘विज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांसाठी केला पाहिजे’, असा आग्रह होता. विज्ञानक्षेत्रातील भ्रष्टता उघड करणारी पुस्तकं वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी स्वतः लिहिली. काही पुस्तकांचा उल्लेख उदाहरणादाखल घेता येईल. डॉक्टर रुग्णांची कशी लूट करतात हे स्वतः या क्षेत्रात असणाऱ्या डॉ. अरुण लिमये यांनी ‘क्लोरोफॉर्म’ या पुस्तकातून समोर आणलं. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी ‘वैद्यकसत्ता’ या पुस्तकातून औषध कंपन्यांद्वारा होणारी लूट उघड केली.
साधारण याच काळात उस्मानाबादमधल्या खुदावाडीचे रहिवासी आणि त्या वेळी औरंगाबादेत वैद्यकीय शिक्षण घेणारे शशिकांत हे बाबा आमटे आणि अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या मनात एका वेगळ्या विचाराचं बीज रुजलं. १९८० साली औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधे त्यांनी ‘हेल्थ अँड ऑट़ोलर्निंग ऑर्गनायझेशन- हॅलो’ या संघटनेची स्थापना केली. कित्येक मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना गावाचा तिटकारा असतो. तर गावातून आलेले काही विद्यार्थी वास्तव टाळण्याचा प्रयत्न करत असतात. दोन्हींचा परिणाम एकच- गावापासून दूर! असे तऱ्हतऱ्हेचे विद्यार्थी गावाला भिडू लागले, तर एरवी आजार अंगावर काढणारे गावातच डॉक्टर आल्यामुळे आनंदित झाले. खेड्यात आहार कोणता असतो, पाणी कसं असतं, कोणत्या सोयी-सुविधा असतात, याची विद्यार्थ्यांना प्रचिती येऊ लागली. या भेटीतून भाव़ी डॉक्टरांमधे सामाजिक जाणीव आणि समाजाला वैद्यकीय भान येऊ लागलं. ‘आपण काही उदात्त करतोय’, या भावनेनं विद्यार्थ्यांना स्फूर्ती आली. नवीन कल्पना सुचू लागल्या. रोगांना येऊ नये याकरिता प्रतिबंधक उपाय कोणते करावेत, ते समज़ावून कसे सांगावेत, रोगांबाबतच्या अंधश्रद्धा दूर कशा कराव्यात यावर विचार करू लागले. खेळ, नाटक सादर करून सोप्या भाषेत आरोग्याचं शिक्षण घडवू लागले. विद्यार्थ्यांचा वैद्यकीय ज्ञानाचा पाया भक्कम होऊ लागला. ‘हॅलो’ मध्ये सामील होण्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली. विद्यार्थी आणि प्राध्यापकवर्गात ‘हॅलो’चा दबदबा निर्माण झाला. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत ‘हॅलो’च्या मुशीतून बाहेर पडलेल्या ३०० डॉक्टरांनी त्यांच्या भागात स्वतःचा ठसा उमटवला आहे. क्रांती व माधुरी रायमाने, विजय गायकवाड, संजय गायकवाड, अशोक बेलखोडे, आनंद निकाळजे, शिल्पा दोमकुंडवार, सरिता स्वामी, मिलिंद पोतदार हे ‘हॅलो’चे आघाडीचे शिलेदार! प्रत्येकानं व्यवसायात सात्त्विकता जोपासली. प्रत्येकानं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली; तरीही ‘हॅलो’ च्या उपक्रमांसाठी सवड काढतात. त्यांचे अग्रक्रम कधीही ढळले नाहीत. या सर्वांनी किल्लारीच्या भूकंपानंतर ‘हॅलो’च्या कक्षा रुंदावण्याकरिता १९९३ साली ‘हॅलो मेडिकल फाउंडेशन’ची स्थापना केली.
जिथं डॉक्टर पोहोचू शकत नाही असा खूप मोठा ग्रामीण भाग आहे, तिथं प्राथमिक सेवा देण्यासाठी ‘अनवाणी डॉक्टर्स’ म्हणजे त्या समुदायातीलच प्रशिक्षित व्यक्ती तयार केल्या पाहिजेत, हा विचार त्या वेळी रुजत होता. डेव्हीड वॉर्नर लिखित ‘डॉक्टर नसेल तेथे’ किंवा डॉ. श्याम अष्टेकरांचे ‘भारत वैद्यक’ अशा पुस्तकांनी हा विचार सविस्तरपणे समोर आणला होता. पुस्तकातील हा विचार प्रत्यक्षात उतरवण्याचं महत्त्वाचं काम डॉ. शशिकांत आणि डॉ. शुभांगी अहंकारी यांनी अणदूरमधून सुरू केलं. नंतर जवळपास १०० गावांपर्यंत त्यांनी हे काम नेले. ग्रामीण भागातील एकल महिलांना ‘भारतवैद्य’ करण्यावर त्यांनी सुरुवातीच्या काळात भर दिला. प्राथमिक आरोग्यसेवेचे प्रशिक्षण घेऊन सेवा देणाऱ्या या ‘भारतवैद्य’ महिलांमुळे आरोग्याचे प्रश्न आटोक्यात यायला मोठी मदत झाली. याबरोबरीनेच ‘हॅलो मेडिकल फाउंडेशन’नं समग्र ग्रामीण विकासाचे प्रश्न हाती घ्यायला सुरुवात करून संस्थेच्या कामाला सर्वंकष स्वरूप आणलं आहे.
आज ‘हॅलो’चे डॉक्टर व ‘भारतवैद्य’ हे ठिकठिकाणी कोरोनाची तपासणी व आरोग्यसेवा पुरविण्यात मग्न आहेत. कोरोनामुळे गावोगावी संशयाचा विषाणू शिरल्यामुळे स्थलांतरितांना वा कोरोनाबाधितांना बहिष्कृतता सहन करणाऱ्यांना लागेल ती मदत करतात. आज ‘हॅलो’च्या कार्यक्रमांना ४,००० महिला स्वखर्चाने येतात. एके काळी ‘भारतवैद्य’ महिलांना फटकारणारा गाव आता त्यांचा अनेक बाबतींत सल्ला घेतो. ‘हॅलो’च्या गावांमधून शेतकरी आत्महत्या दिसत नाहीत. उलट एकल महिलांना मोठा आधार मिळतो. कोरोनाकाळात कष्ट करू शकत नसलेल्या निराधार वृद्धांपर्यंत दररोज भोजन पोहोचवलं जातं. अशा ‘हॅलो मेडिकल फाउंडेशन’चे डॉ. शशिकांत व शुभांगी अहंकारी यांच्याशी २०२१ च्या जून महिन्यात केलेली ही बातचीत.
प्रश्न:- डॉक्टर, १९८० मध्ये औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना तुम्ही तिथल्या सहाध्यायींना एक महत्त्वाचं आवाहन केलं होतं, ते नेमकं काय होतं?
डॉ. शशिकांत अहंकारी :- तो काळ विविध स्तरांवरील घडामोडींचा होता. 1978 मधे रशियातील ‘अल्मा माटा’ येथे झालेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीनं २००० सालापर्यंत ‘सर्वांसाठी आरोग्य’ हे ध्येय जाहीर केलं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही या घोषणेला दुजोरा देत भारताच्या वतीनं घोषणापत्रावर स्वीकृतीची स्वाक्षरी केली. ‘सर्वांसाठी आरोग्य’ ही भूमिका गरजेची होती आणि महत्त्वाकांक्षीही होती. परंतु ‘ती प्रत्यक्षात उतरवायची कशी?’, या बाबत अनेक प्रश्न होते.
नेमक्या याच काळामधे विविध सामाजिक-राजकीय भूमिकांमुळे शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी गटातटांत विभागलेले होते. वैद्यकीय विद्यार्थीही त्याला अपवाद नव्हते. ’सर्वांसाठी आरोग्य’ हे ध्येय साध्य करायचे तर डॉक्टर समाजाभिमुख असणे गरजेचे आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हाच आरोग्यसेवेतील सर्वांत महत्त्वपूर्ण घटक असतो. वैद्यकीय शिक्षण घेऊन आरोग्यक्षेत्रात कामाची सुरुवात करणाऱ्या डॉक्टरांपर्यंत ही भूमिका नेण्यासाठी सर्वांना एक आवाहन करण्याचं मी ठरवलं.
त्या वेळी मी माझे शिक्षण पूर्ण करून ‘औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयात’ निवासी डॉक्टर झालो होतो. त्यामुळे मला ओळखणारे विद्यार्थी कमी होते. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी एका मोठ्या कागदावर १४० प्रश्नांची प्रश्नावली तयार केली आणि ती दर्शनी भागात लावली. विद्यार्थ्यांची मानसिकता कशी असते ते लक्षात घ्या. पहिल्या वर्षात वर्गात आजारांविषयी ते शिकतात आणि दुसऱ्या वर्षापासून वॉर्डात जाऊ लागल्यावर त्यांना रुग्णांची प्रत्यक्ष लक्षणे समजू लागतात. जे शिकले ते प्रत्यक्ष अनुभवण्याची ही प्रक्रिया शैक्षणिक समाधान, आनंद देणारी असते. तेव्हा त्यांच्या दृष्टीने रुग्ण हा केवळ शिक्षणाचं माध्यम असतं. त्यांनी रुग्णातील माणसाकडे पाहिलं पाहिजे. समोरचा रुग्ण हा बिनचेहऱ्याचा नाही, याचा त्यांना विसर पडतो. ती ब्रेस्ट कॅन्सरची पेशंट ही तुमची आई असू शकते, टीबीचा पेशंट तुमचा बाप किंवा निकटचा नातेवाईक असू शकतो. वैद्यकीय चिकित्सा करताना माणुसकीच्या संवेदनाही मनात जाग्या असल्या पाहिजेत. त्यालाच साद घालणारे प्रश्न त्या प्रश्नावलीत समाविष्ट होते. उदाहरणार्थ, तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेत आहात, पण तुमच्या कुटुंबातली, गावातली आरोग्याची परिस्थिती कशी आहे? गावातील पाणीपुरवठा कसा आहे? त्या पाण्याचं शुद्धीकरण होतं का? सांडपाण्याची विल्हेवाट कशी होते? तुमच्या कुटुंबातील बालकांचे लसीकरण झाले आहे काय? तुम्ही आईच्या पोटात असताता तिला प्रसूतिपूर्व सेवा मिळाल्या होत्या का? तुमच्या आईचं बाळंतपण कुठं झालं? तुमची नाळ कुठे कापली? इत्यादी. वैद्यकीय ज्ञानापेक्षाही स्वतःच्या वैयक्तिक जीवनात डोकावून बघायला प्रवृत्त करणारे हे प्रश्न होते. आरोग्यसेवेची वानवा असूनही माणसे जगतात, हा केवळ योगायोग वा अपघात असतो. अशाच योगायोगावर आपली सेवा अवलंबून ठेवायची की जगणं चांगलं करण्यासाठी आरोग्यसेवा द्यायची, यावर विचार करायला त्यांना या प्रश्नावलीनं भाग पाडलं.
ज़र हे प्रश्न महत्त्वाचे वाटले तर आपण कॉलेजच्या हॉलमधे भेटू या, असं आवाहनही शेवटी मी केलं होतं. त्याला प्रतिसाद देत जवळपास 150-200 विद्यार्थी चर्चेसाठी जमले. अर्थात प्रश्न माझे असले तरी त्यांची उत्तरं माझ्याकडेही नव्हती. सर्वांच्या चर्चेतून ती शोधायची होती. ती शोधण्यासाठी आणि अनारोग्य, दारिद्र्य याचा प्रत्यक्षानुभव घेण्यासाठी आपण लोकांकडे गेलं पाहिजे, यावर आमचं एकमत झालं. समाजाची चांगली ओळख असणारा आणि समाजाविषयी संवेदनशील असणारा डॉक्टर तयार करणं हे ध्येय आम्ही समोर ठेवलं आणि ‘हॅलो’ची सुरुवात केली.
प्रश्न :- तळमळीनं काम करणाऱ्या डॉक्टरांची मोठी फळी ‘हॅलो’नं निर्माण केली आहे. नांदेडपासून 125 कि.मी.अंतरावरील किनवट ह्या आदिवासी तालुक्यात 25 वर्षांपासून अत्यल्प शुल्कात आरोग्यसेवा देणारे डॉ.अशोक बेलखोडे, औरंगाबाद शहरात अवयवदान ही संकल्पना रुजवणारे व कोरोनाच्या रुग्णांसाठी रात्रंदिवस झटणारे डॉ.आनंद निकाळजे, तसेच डॉ. विजय गायकवाड, पूर्वी आगाखान व आता सिप्ला फाउंडेशनच्या वतीनं सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेस सशक्त करणारे डॉ. क्रांती व माधुरी रायमाने, पुण्याच्या डॉ. सरिता स्वामी, सोलापूरचे डॉ. संजय गायकवाड, लातूरचे डॉ. मिलिंद पोतदार- अशी कितीतरी नावं आहेत जी आज आपापल्या क्षेत्रात समाजाभिमुख काम करत आहेत. १९९३ मधील लातूरचा भूकंप हा ‘हॅलो’च्या दृष्टीने आणखी एक मैलाचा दगड ठरला. त्याविषयी काम सांगाल?
डॉ. शशिकांत :- १९९३ मधे भूकंप झाला त्या वेळी ‘हॅलो’चं काम सुरू होऊन १०-१२ वर्षं झाली होती. महाराष्ट्राच्या विविध भागांत कार्यरत असलेले अनेक डॉक्टर्स संपर्कात होते. ते या आपत्तीच्या वेळी मदतीला धावून आले. तातडीचे मदतकार्य सुरू झालं. सोबतच या आपत्तीचं रूपांतर इष्टापत्तीत कसं करता येईल, कोणता पर्याय निर्माण करता येईल, हा विचारही सुरू झाला. ग्रामीण व शहरी भागांत सक्रिय असलेल्या २०-२५ संवेदनशील डॉक्टरांनी अणदूरला एक प्रदीर्घ बैठक घेऊन चिरस्थायी टिकणारे प्राथमिक आरोग्यसेवेचं पथदर्शी मॉडेल उभं करण्याचं आम्ही ठरवलं. ग्रामीण भागातील आरोग्याच्या प्रश्नांना उत्तरं शोधण्याचे प्रयत्न जगभर होत होते. डेव्हीड वॉर्नरचं ‘डॉक्टर नसेल तेथे’ हे पुस्तक असो की भारतातील डॉ. आरोळेंचे प्रयोग, त्यांचं सार आम्ही समजून घेतलं. गावात राहणाऱ्या, आठवी ते दहावीपर्यंत शिकलेल्या महिलेला प्रशिक्षित करून खात्रीची प्राथमिक आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यायची ‘जनता पक्ष सरकारातील’ आरोग्यमंत्री राजनारायण यांच्या काळात शासनाने ‘अनवाणी (बेअरफूट) डॉक्टर’ वा ‘स्वास्थ्यरक्षक’ योजना तयार केली होती. तिचं पुनरुज्जीवन करून ह्या महिला आरोग्य सेविकांना त्यात सामावून घ्यायचं, अशी ही सर्वसाधारण कल्पना होती. विविध संस्थांच्या सहभागाने आणि शासनाशी समन्वयानं हे काम करायचं आम्ही ठरवलं.
‘हॅलो मेडिकल फाउंडेशन’नं गावागावांत जाऊन महिलांची निवड केली. त्यांच्या प्रशिक्षणासाठी ४२ दिवसांचा अभ्यासक्रम तयार केला. त्याकरिता डॉ. श्याम अष्टेकरांच्या ‘भारतवैद्यक’ या पुस्तकाचा आधार घेतला. प्रशिक्षित आरोग्य सेविकांचे नामकरणही ‘भारत वैद्य’ असं करण्यात आलं. प्रत्यक्ष प्रशिक्षणात डॉ. श्याम अष्टेकर, डॉ. अनंत फडके, डॉ. दीप्ती चिरमुले, डॉ. ध्रुव मंकड, डॉ. वरेरकर असे विविध गावांतले, विविध चळवळींतले जवळपास १०० डॉक्टर्स सहभागी झाले, ही या कार्यक्रमाची मोठी जमेची बाजू होती. सर्व प्रशिक्षणे ‘अणदूर’ येथे झाली. भूकंपानंतरच्या कामाचं ‘अणदूर’ हे केंद्र बनलं.
अतुल देऊळगावकर
( लेखक हे जेष्ठ पत्रकार व पर्यावरण तज्ज्ञ आहेत )
(पूर्व प्रसिद्धी :’ऐकता दाट’ मधील ‘आरोग्याची पायवाट’ Sadhana Saptahik साधना प्रकाशन)