शिक्षक दिन विशेष
आयुष्याच्या वाटेवरून चालताना अनेक अडचणी, जबाबदाऱ्यांना सामोरे जावे लागते. स्वप्न उराशी बाळगून यशाचे शिखर गाठताना अनेकांच्या वाट्याला संघर्ष येतो. या संघर्षातून मार्ग काढावा लागतो. अडचणींचा आणि संघर्षाचा सामना करण्याचं बळ, जबाबदाऱ्या पेलण्याचे सामर्थ्य जर मनगटामध्ये असेल तर जगातील कोणतीही शक्ती आपल्याला आपल्या यशापसून रोखू शकत नाही. म्हणून माणसाला संकटांना धैर्याने सामोरे जाता आले पाहिजे. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून अवकाशामध्ये झेप घेता आली पाहिजे. हे जगण्याचं बळ आणि सामर्थ्य आपल्याला जर कोठून मिळत असेल तर ते फक्त आपल्या शिक्षकांकडून मिळतं. ज्यांनी जन्म देऊन या धर्तीवर आणले बोबड्या शब्दांना वळण दिले आणि सुंदर जग दाखवले ते आई-वडील, त्यांच्या नंतर आपल्या जीवनात गुरूला महत्त्वाचे स्थान आहे. ज्यांनी हातात हात धरून अक्षर गिरवायला शिकवले ज्यांच्यामुळे ध्येयाचे मार्ग कळले ते शिक्षक म्हणजे माझे गुरु. गुरु म्हणजे आयुष्याच्या वाटेवरचे दीपस्तंभ, तिमिराकडून तेजाकडे दिशा दाखवणारे. आपले गुरु म्हणजे शिक्षक. शालेय व महाविद्यालयीन जीवनातील शिक्षकांमुळे माझ्या जीवनाला आकार मिळाला.
बालवाडी ते बारावी पर्यंतचे माझे शिक्षण महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सुळ गल्ली, लातूर येथे झाले. नंतर पदवी व पदव्युत्तरचे शिक्षण महात्मा बसेश्वर महाविद्यालय व दयानंद कला महाविद्यालयातून पूर्ण केले. आज मी जगाच्या पाठीवर कोठेही गेलो तर मला माझ्या सुंदर शाळेची आठवण येते. आज शाळेच्या समोरून जाताना मला माझ्या अनेक शिक्षकांची आठवण येते. ‘नीट वागलास तर मोठा बनशील, आई-वडिलांचे नाव करशील.’ या आमच्या सरांच्या वाक्याची मला नेहमी आठवण येते विद्यार्थी असताना केलेल्या काही चुकांमुळे अनेकदा बोलणी खावी लागली आणि त्यातून आमच्या शिक्षकांनी दिलेली समज सदैव मनात सलते. बोटाला धरून शिकवणारे गुरु जर मिळाले नसते तर आपलं भवितव्य काय असतं याचा विचारही करू शकत नाही. प्रत्येक शिक्षकांनी आपापल्या विषयांमध्ये आमची अभ्यासामध्ये गोडी निर्माण केली आणि जीवन जगण्याचा मार्ग दाखवला. एम ए इंग्रजी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महात्मा बसेश्वर महाविद्यालयामध्ये सहा वर्ष अध्यापन करण्याची संधी मिळाली. नंतर राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापन करत आहे. यासोबतच नामांकित लोकमत टाईम्स व राष्ट्रीय पातळीवरील प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया सारख्या माध्यमांमध्ये अनेक वर्षापासून काम करत आहे. इंग्रजी सारख्या विषयात काम करताना मला नेहमी दहावी व बारावी वर्गाला शिकवणारे राजेंद्र कोकरे सरांची आठवण येते. सरांनी इंग्रजीमध्ये रुची निर्माण केली.
इंग्रजीचा तास कधी झाला नाही की शाळेत मन रमायचे नाही. आम्ही सरांची नेहमी वाट बघायचो, एवढी आवड सरांनी निर्माण केली होती. कधी-कधी रात्री दहा वाजेपर्यंत आमचे त्याकाळी नाईट क्लास चालायचे. काळाच्या ओघात नाईट क्लास घेण्याची पद्धत बंद झाली. अवघड समजल्या जाणाऱ्या इंग्रजी सारख्या विषयांमुळे मला मिळालेले यश, पत्रकारितेच्या क्षेत्रातील पुरस्कार, प्राध्यापक होण्यासाठीची कठीण समजली जाणारी सेट परीक्षा मी उत्तीर्ण झालो आणि इंग्रजी विषयांमध्ये माझे पीएचडी साठी सुरू असलेले संशोधन हे आमच्या कोकरे सरांना भेटून मनोमन सांगण्याची इच्छा होते. परंतु हे ऐकण्यासाठी सर आमच्यात नाहीत हे मान्य करायला मन देखील तयार होत नाही. सर आज असते तर माझ्यासारख्या विद्यार्थ्यांचे यश पाहून सरांना गगनात न मावणारा आनंद झाला असता. कारण विद्यार्थ्यांना मिळालेले यश यामध्येच आमच्या सरांचा आनंद होता. त्याकाळी सरांनी शिकवलेले धडे, कविता, सोप्या भाषेतील व्याकरण याची आठवण आजही येते. स्त्री-पुरुष समानतेवर आधारित इंग्रजी मधील ‘तूच तुझा शत्रू’ हा तत्कालीन काँग्रेसच्या नेत्या मार्गारेट अल्वा यांचा बारावी वर्गात असतानाचा धडा सरांनी आम्हाला शिकवल्यामुळे समाजामध्ये जगण्याची एक नवी दिशा देऊन गेला.
मराठीचे शिक्षक शिवाजी बोराळे सरांनी डॉ. जनार्दन वाघमारे लिखित महापुरुषांचा पराभव, अण्णाभाऊ साठे यांचे स्मशानातील सोनं, भास्कर चंदन शिवे यांचे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा लाल चिखल, फ.मु. शिंदे यांची सुप्रसिद्ध आई कविता आणि यातून मिळालेले जगण्याचं बळ याची आठवण आजही होते. इतिहासाच्या पाऊलखाना धुंडाळताना सध्याचे शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ सुळ सर यांनी 1857 चा उठाव, चले जाव चळवळ, नवे पर्व, भारतीय स्वातंत्र्याचा लढा या इतिहासातील प्रकरणातून भारतीय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारक व महापुरुषांनी केलेला त्याग व बलिदानाची आठवण आजही होते. आज ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन माहिती करून घेण्याची माझी आवड हे सुळ सरांनी शिकवलेल्या इतिहासामुळेच आहे.
मला सर्व विषयांमध्ये चांगले गुण असायचे परंतु गणित हा माझ्यासाठी सर्वात अवघड विषय ! मला तो दिवस आजही आठवतो दहावी बोर्डाची परीक्षा जवळ आली तरीही गणितात पास होण्याएवढी समाधानकारक प्रगती होत नव्हती. दहावी बोर्ड परीक्षे अगोदर शाळेतील शेवटची बोर्ड सराव परीक्षा झालेली सर्व विषयात चांगले गुण परंतु गणितात न सांगण्यासारखे गुण आणि दहावी बोर्ड परीक्षा 15 दिवसावर येऊन ठेपलेली. गणपत सोलंकर सर जीव लावून गणित शिकवायचे. मुळात गणित विषयाची आवड नसल्याने गणित कच्चे. सराव परीक्षेतील मार्क पाहून सरांनी मला शेवटी प्रेमाने जवळ बोलवून अतिशय आपुलकीने गणित विषयात पास होण्याचा कानमंत्र दिला. भूमितीचे सर्व प्रमेय आणि दोन आणि तीन मार्कासाठी असणारे प्रश्न याची व्यवस्थित तयारी करण्यासाठी सांगितले आणि बोर्डाच्या परीक्षेपर्यंत मला जवळ घेऊन समजावून सांगितले. सरांचं ते मार्गदर्शन जर मला मिळालं नसतं तर गणित विषय हा माझा आयुष्यामध्ये कधी निघाला नसता आणि मी पुढे शैक्षणिक प्रगती करू शकलो नसतो हेही तितकंच खरं आहे. रमेश चौनिपूर्गे सरांनी विज्ञानातून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जाणिवा प्रगल्भ केल्या. दत्तात्रय धुळशेट्टे सरांनी चित्रकलेच्या माध्यमातून आमच्या कलेला वाव दिला. पुढे तानाजी भोसले व दिलीप केंद्रे सरांनी राज्यशास्त्राला इतिहासाची जोड देत राजकारण, प्रशासन समजावून राजकारणाविषयी आवड निर्माण केली. याचा परिणाम म्हणजे, त्यांनी दिलेल्या ज्ञानातून आज माझी राजकारण व समाजकारणातील अनेक नेत्यांशी संबंध प्रस्थापित झाले. तानाजी भोसले सर आम्हाला बारावीला हिंदी पण शिकवायचे त्यांनी सुप्रसिद्ध गझलकार दुष्यंतकुमार यांची शिकवलेली गझल ‘ दुकानदार तो मेले मे लूट गये यारो तमाशबीन दुकाने लगाकर बैठ गये है ‘ या ओळी हदयाला स्पर्श करून जातात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर या गझलेची मला आठवण येते.
काचकुरे सर, देवकते सर, पाटील सर, केले सर, तत्कालीन मुख्याध्यापक कंबळे अशा अनेक शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षकांप्रती आमच्या मनामध्ये आदरयुक्त भीती होती. केलेल्या काही चुकांमुळे शिक्षकांकडून शिक्षा मिळायची, मार खावा लागायचा परंतु शिक्षकांची तक्रार घरी करण्याचे कधी धाडस आणि तो विचारही आमच्या मनामध्ये कधी आला नाही. परंतु आजचा बदलता काळ आणि परिस्थिती आणि शिक्षण क्षेत्रामध्ये होत असलेले बदल बघून मनाला वेदना होतात. आजही आमचे शिक्षक आमच्या समोर आले की बोलण्याचे धाडस होत नाही. असे शिक्षक आम्हाला लाभले नसते तर मी आज यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकलो नसतो हे मात्र खरे.
आज मला सदैव वाटते पुन्हा एकदा आपल्या शाळेत जावे. आपल्या वर्गात बसावे, आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे. पत्र्याच्या वर्ग खोल्या, शाळेला मैदान नाही, बसण्यासाठी साधे बेंच, अनेक सुविधांचा अभाव तरीही अशा परिस्थिती मध्ये आपली वाटणारी शाळा, सामाजिक बांधिलकी जपण्याचा दृष्टिकोन, राष्ट्रीय एकात्मतेचे धडे, देश सेवेसाठी आपल्या पूर्वजांनी व महापुरुषांनी केलेला त्याग व बलिदानाची आठवण या सगळ्या गोष्टी आम्हाला आमच्या शाळेतून मिळाल्या. परंतु निसर्गाचा नियम अटळ आहे एकदा गेलेली वेळ आयुष्यात कधीही येत नाही. आज शाळेच्या सौंदर्यात भर पडली आहे. शाळेचा परिसर पूर्ण बदलून गेला. आज समाजामध्ये कितीही अत्याधुनिक शाळा दिसत असल्या तरी जुन्या सुंदर शाळेची आठवण मात्र येत राहते. शाळा भरण्यापूर्वी होणाऱ्या प्रार्थनेमध्ये साने गुरुजींचे ‘बल सागर भारत होवो’ हे गीत आणि संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचे बोल आजही कानी पडतात.
शाळेच्या गेट समोरून जाताना आजही सर मला तुमची आठवण येते. ‘नीट वागलास तर मोठा माणूस बनशील, आई-वडिलांचे नाव करशील’ यातून मला बरच काही शिकायला मिळाले.
आपल्या देशाचे सुपरिचित दिवंगत राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम साहेब यांनी भारताला महासत्ता बनविण्याचे जे स्वप्न पाहिले होते ते फक्त या देशातील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या जिवावरच. ते नेहमी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद साधत असत. आजची वास्तव परिस्थिती पाहता आणि आज शिक्षक दिन साजरा करत असताना किमान शिक्षकांनी कलाम साहेबा सारख्या लोकाभिमुख राष्ट्रपतींनी व्यक्त केलेल्या भावनांचा सकारात्मक विचार करून अंमलबजावणी करण्याचा संकल्प करावा. कारण देश विकासाचा खराखुरा मार्ग शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक हाच एकमेव पर्याय आहे. अशी एक शिक्षक म्हणून यादिवशी भावना व्यक्त करतो.
आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. माझ्या आयुष्याला आकार देणाऱ्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून या लेखाच्या माध्यमातून शिक्षक दिनानिमित्त ज्यांनी मला घडवलं त्या माझ्या सर्व गुरुवर्यांना शिक्षक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
लेखन -विनोद चव्हाण
लातूर ९१७५९८००२७