विशेष लेख:
देश आणि वीरांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच आगामी काळात देशाची वाटचाल कशी असावी, यावर मंथन व्हावे, भविष्याचा वेध घेताना या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचेही स्मरण व्हावे आणि 2047 पर्यंत आपला देश विकसित देश म्हणून नावारुपाला यावा, यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज आहे. आपल्या देशाच्या मातृभूमीविषयीची कायम कृतज्ञता आणि या वीरांना योगदानाचे स्मरण व्हावे म्हणून देशात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियान दिनांक 09 ऑगस्ट, 2023 पासून सुरु होत आहे. त्यानिमित्त आपल्या राज्यातही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात अधिकाधिक लोकसहभाग असावा यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा दिनांक 09 ऑगस्ट पासून सुरु होत आहे. या सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर आयोजित ‘मेरी माटी – मेरा देश’ अर्थात ‘माझी माती – माझा देश’ या अभियानाची सुरुवात होत आहे. राज्यात ग्रामपंचायत, तालुकास्तर, जिल्हास्तर असे विविध उपक्रम त्यानिमित्त आयोजित केले जात आहेत. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन, लोकसहभाग अशा सर्वांचा सहभाग यामध्ये राहणार आहे. पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत.
दिनांक 9 ते 30 ऑगस्ट, 2023 दरम्यान, ‘मेरी माटी – मेरा देश’ मोहिमेत गाव आणि गट स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्यस्तरावरील कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. दिल्लीत ‘अमृत वाटिका’ तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून 7500 कलशांमध्ये माती घेऊन ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येणार असून ही ‘अमृत वाटिका’ ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या वचनबद्धतेचे प्रतीक असणार आहे. जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी https://merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून, माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी नागरिक या संकेतस्थळावर अपलोड करू शकणार आहेत. या उपक्रमात सर्वांचा सक्रीय सहभाग आणि आपल्या देशाच्या वीरांप्रतीची कृतज्ञता प्रत्येकाने व्यक्त करावयाची आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या अमृतमहोत्सवी काळात देशाने अनेक बाबतीत उत्तुंग झेप घेतली आहे. आता विकसित देश बनण्याच्या दृष्टीने प्रत्येकाचे या देशासाठी योगदान, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, समृद्ध वारशाचा अभिमान, एकता आणि बंधुता टिकवणे, नागरिकाची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्यां प्रति आदर व्यक्त करणे यावर आधारित पंचप्रण प्रतिज्ञा या उपक्रमात घेण्यात येणार आहे.
केवळ एखादा कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता गाव ते शहरांपर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी याबाबत अभियान स्वरुपात कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या अभियानात ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी तसेच, नागरी भागात नगरपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका यांनी त्यांच्या स्तरावर अधिकाधिक लोकसहभागातून उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.
तीन टप्प्यात हा उपक्रम राज्यात सर्वत्र राबविण्यात येणार आहे. राज्यस्तरावरील कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे सकाळी 9-30 वाजता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री. सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. त्याचबरोबर, याच दिवशी सकाळी 10 वाजता मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे मंत्रालयातील सर्व अधिकारी –कर्मचारी हे या मान्यवरांच्या उपस्थितीत पंचप्रण प्रतिज्ञा घेणार आहेत.
ग्रामपंचायत स्तर- दिनांक 09 ते 14 ऑगस्ट 2023 या दरम्यान त्या त्या जिल्ह्यांच्या नियोजनाप्रमाणे कोणत्याही एका दिवशी खालील पाच उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये शिलाफलक, वीरांचा सन्मान, वसुधा वंदन (अमृत वाटिका), पंचप्रण शपथ, आणि ध्वजारोहण व राषट्रगीत यांचा समावेश आहे.
शिलाफलक: गावातील संस्मरणीय एका ठिकाणी (अमृत सरोवर / शाळा / ग्रामपंचायत इ.) शिलाफलकाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा लोगो, मा. प्रधानमंत्री यांचा व्हिजन 2047 संदेश, स्थानिक शहीद वीराची नावे, ग्रामपंचायत/शहराचे नाव दिनांक याबाबी नमुद केल्या जाणार आहेत.
स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन – यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार, हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांच्या कुटुंबांचा सत्कार, संरक्षण, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य पोलीस दलातील सेवानिवृत्त व्यक्तींचा सत्कार या उपक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे.
वसुधा वंदन: यामध्ये गावातील योग्य जागा निवडून वसुधा वंदन म्हणून 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे. वन विभागाच्या समन्वयातूीन स्थानिक पातळीवर ही रोपे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
पंचप्रण (शपथ) घेणे: देशाला विकसित बनवण्याचे स्वप्नं साकार करण्यासाठी ही प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. ‘भारताला विकसित देश बनवायचे आहे. तसेच 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे. नागरिकांचे कर्तव्य बजावयाचे आहे. तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे’, ही पंचप्रण (शपथ) यावेळी घेतली जाणार आहे. यामध्ये सर्व शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, स्वयं सहाय्यता महिला बचत गट, सर्व अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविदयालयातील विदयार्थी, विदयार्थिनी व शिक्षक वृंद, अशासकीय संस्था, नेहरू युवा केंद्र, विदयार्थी सैनिक दल, राष्ट्रीय सेवा योजनेतील विदयार्थी ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. हातात दिवे लावून पंचप्रण शपथ घेण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून तयार केलेल्या मातीच्या दिवे वापरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमा दरम्यान ग्रामपंचायतीच्या हददीतील 1-2 मूठ माती घेवून सन्मानपूर्वक पंचायत समिती स्तरावरील समन्ययक अधिकारी यांच्याकडे ती सोपविण्यात येईल. स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे झेंडावंदन करण्यात येईल.
तालुका स्तर- दिनांक 16 ते 20 ऑगस्ट 2023 या कालावधीत पुढील उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. विविध गावागावांतून वसुधा वंदन कार्यक्रमातून जमा केलेली एक मूठ माती कलशामध्ये गोळा केली जाणार आहे. या कलशावर तालुका, जिल्हा व राज्याचे नाव लिहून हा मातीचा कलश दिनांक 27 ते 30 ऑगस्ट 2023 या दरम्यान प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे नेला जाणार आहे. त्यासाठी नेहरु युवा केंद्रातील युवकाची निवड करण्यात येणार आहे. दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कर्तव्य पथ, नवी दिल्ली येथे अभियानाचा समारोप समारंभ होणार आहे.
याशिवाय, मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा उपक्रम राबविला जाणार आहे. सर्व नागरिकांनी या कालावधीत आपल्या घरांवर या दिवशी तिरंगा फडकावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
—- दीपक चव्हाण, विभागीय संपर्क अधिकारी