एमजीएम’चा ऍबिलिटी अवॉर्ड साई कौस्तूव दासगुप्ता यांना प्रदान
छत्रपती संभाजीनगर, दि. १२ : मी ९० टक्के दिव्यांग असून माझ्या शरीरात ५० पेक्षा जास्त फ्रॅक्चर असूनही आज माझी ओळख ही माझ्यातील डिसऍबिलिटीमुळे नसून माझ्यातील ऍबिलिटीमुळे आहे, असे मत साई कौस्तूव दासगुप्ता यांनी यावेळी व्यक्त केले.
महात्मा गांधी मिशनच्या फिजिओथेरपी महाविद्यालयाकडून दरवर्षी दिला जाणारा ‘महात्मा गांधी मिशन इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी ऍबिलिटी अवॉर्ड’ हा २०२२ या वर्षाचा पुरस्कार साई कौस्तूव दासगुप्ता यांना आज विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि १० हजार रोख रक्कम असे आहे.
श्री. दासगुप्ता म्हणाले, मी गायक आहे, मी ग्राफिक डिझायनर आहे, मी लेखक आहे आणि प्रेरणादायी वक्ता म्हणूनही काम करतो मात्र, मी माझ्या जीवनातील सहा वर्षे एका खोलीमध्ये घालवली आहेत. सहा वर्षे मी चंद्र, सूर्य ,झाडे पाहू शकलो नाही. जीवनात खूप अनिश्चितता असून जीवन हा एक खेळ आहे. या खेळामध्ये आपण कायम आनंदी अथवा कायम दु:खी राहू शकत नाहीत. अडचणी येतील, आव्हाने येतील मात्र आपण या सगळ्यांना सामोरे जात आनंदी राहिले पाहिजे.
लोकांनी मला माझ्या ऍबिलिटीमुळे ओळखले पाहिजे असे स्वप्न मी पाहिले होते आणि आज ते स्वप्न या ‘एमजीएम ऍबिलिटी अवॉर्ड’ मुळे पूर्ण होत आहे, याचा मला मनस्वी आनंद आहे. छत्रपती संभाजीनगर हे योध्यांचे शहर असून या भागातील अनेकांनी देशासाठी आपले योगदान दिलेले आहे. आज या योध्यांच्या शहरात व्हीलचेअर योध्याचा सन्मान होणे हे मी माझे भाग्य समजतो, अशी भावना साई कौस्तूव दासगुप्ता यांनी यावेळी व्यक्त केली.
मी माझ्या आयुष्यात जे अपेक्षित केले होते असे काही घडले नाही पण जे घडले आहे ते माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे. प्रत्येकजण कशात ना कशात चांगला असतो. आपण कशामध्ये चांगले आहोत हे शोधून जीवनाची दिशा ठरवणे आवश्यक आहे, असे श्री. दासगुप्ता यावेळी म्हणाले.
या पुरस्कार सोहळ्यास मिशनचे उपाध्यक्ष डॉ. पी. एम. जाधव, सचिव अंकुशराव कदम, महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बोहरा, प्राचार्य डॉ. सारथ बाबू व्ही, प्रशासकीय प्रमुख प्रेरणा दळवी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डॉश प्रकाश, प्रास्ताविक डॉ. सारथ बाबू व्ही, श्रीलता गिरीश, प्रा. आयूषी जैन तर आभार प्रदर्शन डॉ. संस्कृति तहकीक यांनी केले.
रुक्मिणी सभागृहात दिव्यांग व्यक्तींसाठी कायमस्वरूपी रॅम्प’सुविधा
रुक्मिणी सभागृहतील मंचावर जाण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना सोयीचे व्हावे यासाठी कायमस्वरूपी रॅम्प’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज याचे लोकार्पण साई कौस्तूव दासगुप्ता यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
साई कौस्तूव दासगुप्ता यांच्याबद्दल माहिती : श्री.दासगुप्ता हे ९० टक्के दिव्यांग असून, ते गायक, ग्राफिक डिझायनर, लेखक आणि प्रेरणादायी वक्ते आहेत. ब्रिटल बोन आजाराने ग्रस्त असल्याने हे ९० टक्के अपंग आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ‘My life My love and My dear Swami’ ही त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.