माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या ७९ व्या जयंतीनिमीत्त विलासबाग, बाभळगाव येथे आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन
लातूर (प्रतिनिधी ):महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख यांच्या ७९ जयंतीनिमित्त रवीवार दि. २६, मे २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता , बाभळगाव येथील विलासबागेत सार्वजनिक आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री म्हणून आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी असंख्य कल्याणकारी निर्णय घेतले. आपल्या राजकीय कार्यकाळात लोकहित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी घेतलेले निर्णय ऐतिहासीक ठरले आहेत.
राजकारणातले आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची ओळख आहे. सन 1980 च्या विधानसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघातून विलासराव देशमुख साहेब निवडून आले आणि राज्यमंत्री, मुख्यमंत्री अशी विलासराव देशमुख साहेब यांची वाटचाल महाराष्ट्राला वाखाणण्याजोगी अशीच होती.महाराष्ट्रातले काँग्रेस पक्षामधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणून विलासराव देशमुख यांचेच नाव घ्यावे लागेल. सामान्य जनतेसाठी व कार्यकर्त्यासाठी साहेब आदर्श लोकप्रतिनिधी आहेत. राज्याच्या विकासाला गती देण्यात मोलाची भूमिका त्यांनी बजावली आहे.
राजकारणातले आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचीओळख राहिली आहे. लोकाभिमुख नेतृत्व आणि प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणून ते सर्व परिचित होते. अशा लोकविलक्षण अष्टपैलू नेतृत्वाच्या जयंतीनिमित्त दरवर्षी राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
यावर्षी त्यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त रविवार दि. २६, मे २०२४ बाभळगाव येथील विलासबाग येथे आयोजित सार्वजनिक जयंती सभेतून त्यांच्या कार्याला स्मरणपूर्वक आदरांजली वाहण्यात येणार आहे. या सभेसाठी सकाळी सर्वांनी ८.४५ वाजता विलासबाग येथे स्थानापन्न व्हावे अशी अपेक्षा आहे. सकाळी ९.००वाजता सुप्रसिद्ध सिने पार्श्वगायक गायक मंगेश बोरगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून “भावस्वरांजली” हा
कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर उपस्थित सर्वांनी
पुष्पांजली अर्पण केल्यानंतर १०.०० वाजता आदरांजली सभेचा समारोप होईल.
या सभेचे सुत्रसंचालन बाळकृ्ष्ण धायगुडे व सचिन सुर्यवंशी करणार आहेत.या आदरांजली कार्यक्रमास विलासबाग, बाभळगाव येथे जनतेने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन देशमुख कुटूंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
———–