वाढदिवस विशेष
निर्सगत: एखादया नदीचा उगम होतो ती वाहत जाते, पूढे जाऊन प्रवाहाने विस्तारत जाते, काठावरील सर्वांना सुखी आणि समृध्द करते, अंतीमत: समुद्रात मिसळून एकरूप होते. या नदीच्या प्रवाहा सारखाच माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा राजकीय प्रवास आहे. सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरूवात बाभळगावचे सरपंच, शिक्षण संस्थाचे अध्यक्ष, साखर कारखाना चेअरमन, जिल्हा परीषद, लातूरचे अध्यक्ष, विधान परीषद आमदार, अर्थ राज्यमंत्री, क्रीडा व युवक कल्याण मंत्री या माध्यमातून राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात एक मोठ काम त्यांनी उभा केले आहे.
लातूर जिल्हयातील ग्रामीण भागातील शेती आणि शेतकरी ही सावकाराच्या दारात गहाण होती, ती सोडवून सन्मानाने शेतकरी उभा करण्यासाठी घरापर्यंत धनगंगा पोहचवली. मनावर रूढी परंपरेची बेडी होती त्यांच्यापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवली. आज शेतकरी, ग्रामिण भागातील माणूस सन्मानाने उभा आहे. यामध्ये मोठे योगदान आदरणीय माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे आहे, आज त्यांचा वाढदिवस त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा.
आदरणीय दिलीपरावजी देशमुख यांना समजून घेण्यासाठी त्यांची जडणघडण पाहण महत्वाच आहे. मराठवाडयातील बाभळगाव येथील एका शेतकरी कुंटूबात ग्रामीण संस्कृतीची पाश्वभुमी असलेल्या परीवारात त्यांचा जन्म झाला. घरातील वातावरण पुरोगामी विचाराचे आणि शिक्षणाचे महत्व असलेला हा परीवार होता. यामूळे त्या काळात देशमुख परीवारातील सर्वांनी उच्च शिक्षण घेतले. त्या काळात शिक्षणाचे महत्त्व ओळखल यामुळे निरक्षर असलेल्या मराठवाड्यात साक्षर नेतृत्व निर्माण झाल. समाज रूढी, परंपरा, जातीपातीचे भेदाभेदाने भरलेला होता. या परिस्थितीत पुरोगामी विचारांचे संस्कार घेऊन दिलीपराव देशमुख यांचे नेतृत्व पूढे आले.
गावच्या सरपंच पदापासून राज्याचे मंत्री म्हणून काम करतांना दिलीपराव देशमुख यांनी उभारणी केलेले विविध क्षेत्रातील काम पाहता असे दिूसून येते की, त्यांची राजकीय, सार्वजनिक जीवनातली वाटचाल पायरी-पायरीने पुढे गेलेली एक नियोजनबद्ध प्रक्रिया आहे. एखादा पायथ्याला उभा असलेला डोळस माणूस नेहमी नियोजन करत असतो. शिखरावर गेल्यावर काय करायचे,अशी नियोजनबद्ध आखणी करून झालेली वाटचाल म्हणजे दिलीपराव देशमुख यांचा सार्वजनीक जीवनाचा प्रवास होय. विविध क्षेत्रातील कार्य थोडक्यात पाहिल तर आपल्या लक्षात येत पक्ष संघटना, सहकार, साखर उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्था, जलव्यवस्थापन, दुष्काळ, सिंचन क्षेत्र, शिक्षण, क्रीडा, पर्यावरण या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या कामाची उभारणी केली आहे.
एखादी संस्था कशी उभा करावी, तिचा कारभार कसा चालवावा, ती संस्था सर्वाच्या सहकार्यातून कशी वाढवावी या संस्थापक कामाची उभारणीसाठी आदरणीय दिलीपराव देशमुख हे निश्चीतच प्रेरणादायी आहेत. मराठवाडा विशेषत: लातूर जिल्हयात दिलीपरावजी देशमुख यांच्या नेतृत्वाच्या रूपाने एक नवीन कार्यसंस्कृती निर्माण झाल्याचे आपण पाहू शकतो. लातूर सारख्या मागासलेल्या भागाला विकासाकडे नेण्यासाठी लोकांना रचनात्मक कार्यात जोडण्यासाठी जे अडथळे आहेत ते स्व कल्पकतेने त्यांनी दूर करण्याच फार मोठं काम केल आहे. यामुळे
दिलीपरावजी देशमुख यांच्या नेतृत्वाविषयी, कार्याबद्दल कुतूहल, नेतृत्वगूणा बद्दल आकर्षण, कार्यपद्धतीबद्दल एक आदरयुक्त दबदबा आहे.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा कार्यकाळ पाहिला तर एक गोष्ट लक्षात येते काँग्रेस पक्षाची राज्यासह देशभरात सत्ता होती. आदरणीय विलासराव देशमुख यांच्या सारख मातब्बर नेतृत्वाच गारुड जनमानसावर होत. या सगळ्या प्रचंड विकास कामांमध्ये स्वतःच्या शैलीने एका वेगळ्या कामाची उभारणी त्यांनी केली. त्यांची ही वाटचाल पाहता एखाद्या वडाच्या झाडाजवळ आंब्याच झाड असाव आणि त्या वटवृक्षाच्या सावलीत येऊन बसून आजूच्या झाडाची आंबे खूप चांगले आहेत म्हणून लोकांनी चवीने खावीत अस काम दिलीपराव देशमुख यांच्या माध्यमातून उभा राहिले आहे. कारण दिलीपरावजी देशमुख यांनी ज्या संस्थांमध्ये काम केले त्या संस्थांमध्ये लोकहिताची काम करताना कोणत्याही प्रकारच्या अपप्रवृत्तीला थारा दिला नाही. सार्वजनिक जीवनात सहकार क्षेत्रात ज्या संस्थेत चांगलं काम होत तेथे चौखूर उधळणाऱ्यांना वेसन घातली, सभासदांच्या हिताला कुणी आड येत असेल तर त्यांच्यासाठी कुंपण घातल, चुकीच वागू नये म्हणून त्याला नियमाचा कोलदांडा घातला. सहकार क्षेत्रातील अपप्रवृत्ती रोखण्यासाठी दिलीपरावजीनी केलेलं कार्य हे त्यांचा शिस्तप्रिय स्वभाव, नियोजन आणि काटेकोर कारभाराचा प्रत्यय देतो.
दिलीपरावजी देशमुख यांची कार्यपध्दती आगळी वेगळी आहे. त्यांच्या कार्यपध्दतीत सृजनशीलता व सर्जनशीलताही आहे. एखाद्याच्या चांगल्या कामाच कौतुक, गुणगौरव करताना त्यांची कोमलता आणि सृजनशीलता दिसून येते पण अनिष्ट गोष्टींना पायबंद करायचा असेल तर त्यांच्यातला सर्जन जागा होतो. कोणाला थंड दूध दयायच आणि कोणाला गरम हे त्यांना ठाऊक आहे. यामुळे अनेकजण ताक समजून गरम दूध पितात आणि तोंड भाजून घेतात.
उत्कृष्ट वयवस्थापक तो असतो जो नियोजन आणि समर्पक धोरण आखत असतो. भोंगळ आणि काल अपव्यय धोरणापासून तो शेकडो कोस दूर राहत असतो. ‘बर्फवृष्टी काश्मीरमध्ये आणि स्वेटर वाटप मराठवाड्यात’ यापासून दूर राहिलेले हे नेतृत्व आहे. कोणत्याही व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय आजाराचे अचूक निदान करून त्यावर उपचार करण्याचे काम त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आहे. व्यवस्थापन पारदर्शक, धोरण दिशादर्शक, प्रशासन कार्यतत्पर आणि लोकाभिमुख ही त्यांच्या कामाकाजाचे सुत्र आहे.
एखाद्या वृक्षाला लावण्यासाठी ट्री गार्ड खरेदी करायची असेल तर ते सुद्धा कमीत कमी पैशात आणि चांगली कशी मिळेल याकडे त्यांचा कटाक्ष असतो. एवढी चोखंदळ असलेली व्यक्ती जेव्हा सहकार, साखर उद्योग आणि बँकिंग क्षेत्रामध्ये मोठे प्रकल्प आणि लोकाभिमुख निर्णय घेते तेव्हा ते भविष्यवेधीच ठरतात. यामुळे आपण पाहतो ट्री गार्ड खरेदी कमीत कमी खर्चात झाली पाहिजे याकडे पाहणारे दिलीपरावजी जेव्हा क्षमता विस्तार, मशिनरीचे आधुनिकीकरण, सहवीज निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, किंवा स्वतःचा कारखाना उभा करतात त्यावेळेला तो कारखाना सुद्धा तेवढ्याच दक्षपणे त्यांच्या हातून उभारला जातो.
ज्या पदावर त्यांनी काम केले त्या पदाची ओळख त्यांनी स्वताच्या कामातून निर्माण केली त्या संस्थेमध्ये त्या कामात एक नवा आदर्श निर्माण केला. एखाद्या पदावर त्यांची निवड झाली तेव्हा त्या कामासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं पण त्या पदावरून त्या संस्थेमधून गेल्यानंतर परत या कामांमध्ये लुडबूड केली नाही, म्हणून ज्या पदावर काम केल मग ते सरपंचपद, चेअरमन, अध्यक्ष, आमदार, मंत्री पद असो त्या पदावरून गेल्यानंतर सुद्धा लोक त्याच पदावरवरून त्यांना ओळखतात एवढी छाप त्या पदावर त्यांनी सोडलेली आहे.
ज्या क्षेत्रात काम केले तेथे समय सूचक काळ सुसंगत आणि वास्तव कामाची उभारणी केली. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करताना कृषी विकास, जलसंवर्धन, गतीमान प्रशासन, सामाजिक योजना शेवटच्या घटकासाठी राबवणे, त्याचप्रमाणे सहकार, राजकारण, समाजकारण, शिक्षण क्षेत्रात आपल्या कामाची त्यांनी उभारणी केली. दिलीपरावजी देशमुख यांना लातूर जिल्हा विशेषता मराठवाड्याचा अचूक अंदाज होता. येथील दारिद्र्य, बेरोजगारी अज्ञान या दुर्गुणांवर मात करण ही त्या काळाची गरज आहे. लोकांची मानसिकता आळस, व्यसन, खोट्या प्रतिष्ठेसाठी खर्च करणे, कर्ज काढून उधळपट्टी करणे अशा अनेक दुर्गुणांनी जनमानस भरलेल होत. या सर्व आजारावर त्यांना उपचार शोधायचे होते. मराठवाड्यातला माणूस देव भोळा होता. घरामध्ये कुटुंबांची संख्या मोठी होती, येथील माणूस असे म्हणायचा मुले ही देवाघरची चोंच तेथे चारा आणि मग दहाददा लेकरांच बिऱ्हाड प्रत्येक घरात थाटलेले. यासाठी शिक्षणा शिवाय पर्याय नाही म्हणून त्यांनी शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले कुंटूब कल्याणाचा आदर्श घालून दिला. सहकारामध्ये शिस्त आणली, साखर उद्योगांमध्ये अनाठाई खर्च कमी केला, बँकेमध्ये शंभर टक्के कर्ज वसुली झाली पाहिजे, येथील माणूस साक्षर करत असताना अर्थसाक्षर ही बनवला.
एखाद्या फुलाच झाड पाणी आणि प्रकाशामुळे कोमेजून गेल तर त्याचीही ते काळजी घेतात म्हणजे एखाद्या संस्थेचा व्याप सांभाळत असताना त्या संस्थेचे हित किती जोपासत असतील याचा विचार आपण करायला हवा. त्यांच एक उत्साही आणि प्रफुल्ल व्यक्तिमत्व आहे. ज्या ठिकाणी काम करतात तेथे सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण होते. यामुळे त्यांच्या सोबत असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी हे सुखी, समाधानी आणि प्रसन्न मनाने काम करतात.
एखाद्या ठिकाणी काम करीत असताना त्या कामांमध्ये ज्याची मदत घेतली त्यांना श्रेय देण, सहकाऱ्यांचे कौतुक करण हा त्यांचा स्थायीभाव आहे. यामुळे सरपंच, चेअरमन, अध्यक्ष, आमदार, मंत्री, कॅबिनेट मंत्री, या सर्व पदावर काम करत असताना एक वेगळ्या कामाची उभारणी केली. या सर्व कामातून निघून जात असताना सुद्धा ते सहजपणे निघून जातात. हे निघून जाणं सार्वजनिक जीवनामध्ये अपवाद आहे. परंतु अशाप्रकारच काम उभा करून त्या त्या क्षेत्रातील पुढील पिढीकडे ते सोपवून एका नव्या कामाच्या उभारणीसाठी ते पुढे जातात. एखाद्या महाकाव्याला शोभेल अशीच ही वाटचाल आहे.
लातूरच्या सांस्कृतिक क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. लातूर मध्ये क्रीडा संस्कृती निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, यासाठी लातूर जिल्हा क्रीडा संकुलमध्ये सुविधा उभारल्या, खेळाडूंनासाठी विविध स्पर्धा भरवल्या, विधिमंडळातील कामकाज, स्थानिक स्वराज्य संस्थांतील कामकाज, सहकार आणि साखर उद्योगातील कामकाज, राज्याच्या सभागृहातील कामकाज एक लोकप्रतिनिधी म्हणून ते खऱ्या अर्थाने नावारूपाला आले.
दिलीपराव देशमुख यांचे भेदभाव विरहित राजकारण आहे. आज जातीच्या नावावर पक्ष संघटना, नेते काम करतात जाती-पाती मध्ये समाज विभागला गेला आहे. जातीविरहित राजकारण हा अपवाद झालेला आहे. पण अशा काळामध्ये जातीपातीच्या राजकारणाला बगल देऊन समाजातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन ते जातीच नाही तर विकासाच राजकारण करतात.
अस म्हणतात गर्दीला चेहरा नसतो पण गर्दीच्या गजबजाटात एखादा चेहरा उठून दिसतो, तो पुढे येतो असा सार्वजनिक आणि राजकीय जीवनात स्व प्रतिभेने स्व प्रतिमेने पुढे आलेला आश्वासक चेहरा म्हणजे दिलीपरावजी देशमुख. आज १८ एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस या निमीत्ताने त्यांना मनपूर्वक शुभेच्छा…!
लेखक : राहूल हरिभाऊ इंगळे-पाटील