18.3 C
Pune
Tuesday, December 24, 2024
Homeराजकीयमाजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचा ठाकरे सरकारवर घणाघात

माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचा ठाकरे सरकारवर घणाघात

सस्ती दारू, महंगा तेल: ठाकरे सरकारमुळे पेट्रोल-डिझेलच्या महागाईचा महाराष्ट्रात उच्चांक!

लातूर/प्रतिनिधी ः- जनतेच्या हिताची कोणतीच योजना आखण्यात आणि अमलात आणण्यात महाराष्ट्रातील आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले असून पेट्रोल-डिझेलवरील करात कपात केल्याचा गवगवा करून फसवणुकीचा नवा पायंडा पाडणारे ठाकरे सरकार कराद्वारे लूट करणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे सरकार ठरले आहे, अशी घणाघातील टीका भाजपाचे माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. देशात सर्वाधिक महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात असल्याने पेट्रोल डिझेलवरील करामध्ये 50 टक्के कपात करून दारूचा न्याय पेट्रोल डिझेललाही लावलाच पाहिजे, या मागणीचा पुनरुच्चारही आ. निलंगेकर यांनी केला.
जनतेच्या खिशातून हजारो कोटींची लूट केल्यानंतर आता पेट्रोल, डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये (व्हॅट) अनुक्रमे 2.08 रुपये व 1.44 रुपय कपातीचा पोकळ गाजावाजा करून ठाकरे सरकारने पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली आहे. महागाईने त्रासलेल्या जनतेस दिलासा देण्याऐवजी केंद्राविरुद्धच्या राजकारणात जनतेला वेठीस धरण्याचा ठाकरे सरकारचा डाव उघड झाला असून राज्याच्या करामध्ये 50 टक्के कपात करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे.

केंद्र सरकारचा इंधनावरील कर केवळ 19 रुपये असताना ठाकरे सरकार मात्र 30 रुपये कर आकारून जनतेचे खिसे ओरबाडत तिजोरी भरत आहे, त्यामुळे राज्यातील पेट्रोल डिझेल दरवाढीस राज्य सरकारच जबाबदार आहे, असे आ. निलंगेकर म्हणाले.
केंद्र सरकारने गेल्या सहा महिन्यांत दुसर्‍यांदा पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात कपात केली. राज्य सरकारने मात्र एका पैशाचीही कपात न करता केंद्र सरकारने केलेल्या कर कपातीचे श्रेय घेण्याचा फसवा प्रयत्न करून जनतेची दिशाभूल केली. आता राज्य सरकारचे पितळ उघडे पडले आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात पेट्रोलवर लिटरमागे 32.55 रुपये तर डिझेलवर लिटरमागे 22.37 रुपये एवढा कर राज्य सरकार आकारते. केंद्र सरकारने कर कपात करून राज्याचा कर कमी करण्याचे आवाहन केल्यानंतरही ठाकरे सरकारने कर कमी केले नाहीत, उलट अनावश्यक वाद घालून राजकारण सुरू ठेवले. एकीकडे महागाईच्या नावाने सत्ताधार्‍यांनीच निदर्शने करायची आणि दुसरीकरे कर कपात न करता जनतेची लूट सुरूच ठेवायची असा दुटप्पी डाव महाविकास आघाडी खेळत असून केंद्राशी संघर्ष करण्याच्या खुमखुमीतून जनतेला महागाईच्या खाईत भरडण्याचा कपटी खेळ उघड झाला आहे, असे ते म्हणाले. इंधनावरील करात एक रुपयादेखील कपात न करता ठाकरे सरकार महागाईच्या नावाने शिमगा कसे करते, असा सवालही आ. निलंगेकर यांनी उपस्थित केला.
ठाकरे सरकारने दारुवरील करात तब्बल 50 टक्क्यांची कपात करून दारू उत्पादकांना मोठा मलिदा मिळवून दिला. मात्र इंधनाच्या किंमती कमी झाल्यास महागाई कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळेल हे ठाऊक असूनही पेट्रोलवर जेमतेम दोन रुपयांची कपात करून जनतेला दिलासा नाकारला, असा आरोपही आ. निलंगेकर यांनी केला. विदेशी मद्याला दिलेल्या सवलतीप्रमाणेच पेट्रोल डिझेलवरील राज्याच्या व्हॅट आकारणीतही 50 टक्के कपात झाली पाहिजे, अशी मागणी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]