महिला बचत गटाच्या पाठीशी सक्षमपणे
उभे राहून सर्व प्रकारची मदत करणार
रेणापूर येथील महिला बचत गटाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आ. रमेशआप्पा कराड
रेणापूर दि.१३ :- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सर्वसामान्य गोरगरीब तळागाळातील माणसांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी अनेक योजना सुरू केल्या घेतलेल्या कर्जाची परतफेड शंभर टक्के महिला बचत गट करतात. या बचत गटाच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहून सर्व प्रकारची मदत करू शासनाच्या माध्यमातून स्वतंत्रपणे पॅकेज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी दिली.

महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र रेणापूर या संस्थेची अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडली यावेळी आ. रमेशआप्पा कराड प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. सरस्वती पवार या होत्या तर विभागीय नियंत्रण व मूल्यमापन अधिकारी सिद्राम माशाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हानबर, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचे धनंजय पवार, जिल्हा कृषी विभागाचे सहाय्यक तंत्र अधिकारी विकास बालकुंदे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी एम. एस. पटेल, माजी सभापती अनिल भिसे, बायणाबाई साळवे, माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, आरती राठोड तालुकाध्यक्ष अँड. दशरथ सरवदे, संध्या पवार, अनंत चव्हाण, वसंत करमुडे, संस्थेच्या व्यवस्थापक उषा डुमणे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेस व महिला मेळाव्यास तालुक्यातील ३५ गावातून ३७५ बचत गटातील अडीच हजाराहून अधिक महिला उपस्थित होत्या.

गावागावात महिलांनी बचत गटाची स्थापना केली म्हणूनच बाहेरचे जग पाहता आले. आजच्या या कार्यक्रमातून महिलांची असलेली एकजूट पाहता आली असे सांगून आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की प्रत्येक बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी छोटे छोटे उद्योग सुरू करावे. त्यातून निश्चितच आर्थिक आधार मिळू शकतो. बचत गटाच्या माध्यमातून दर्जेदार आणि चांगली उत्पादने झाली तर बाजारपेठ उपलब्ध होण्यास अडचणी येत नाहीत.
बचत गटाच्या महिलांना उद्योग व्यवसायासाठी प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्याची गरज असून महिला बचत गटासाठी मी माझ्या आमदारकीचा उपयोग निश्चितपणे करणार असल्याचे सांगून आपले प्रश्न आणि अडीअडचणी महिलांनी माझ्यापर्यंत दिल्यास त्याची सोडवणूक केली जाईल अशी ही ग्वाही आ. रमेशआप्पा कराड यांनी यावेळी दिली.

यावेळी बोलताना सनियंत्रण व मूल्यमापन विभागीय अधिकारी सिध्दराम माशाळे म्हणाले की, बचत गटाच्या माध्यमातून घेतलेला कर्जाचा उपयोग महिलांनी उद्योग व्यवसायासाठी करावा बचत गटाचे कर्ज म्हणजे बियाणे आहे बियाण्याची चांगल्या पद्धतीने लागवड केल्यास उत्पन्नही चांगले येते त्याप्रमाणे घेतलेल्या कर्जाचा उपयोग योग्य उद्योग उभारणीस झाल्यानंतर त्याचे निश्चित फायदे होतात असे बोलून दाखविले. जिल्हा समन्वय अधिकारी एम. एस. पटेल यांनी प्रास्ताविकातून बचत गटाच्या कामाची सविस्तरपणे माहिती देऊन बँकाकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करावी असे सांगितले.
प्रारंभी संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या उत्कृष्ट बचत गट, उत्कृष्ट महिला उद्योजक, उत्कृष्ट सीआरपी, उत्कृष्ट सहयोगीनी, बचत गटातील महिलांचे गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी, उत्कृष्ट पारस बाग लागवड यांचा आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी शासनाच्या विविध योजना आणि महिला बचत गट कशा पद्धतीने उद्योग व्यवसायात काम करतील याबाबत मौलिक विचार मांडले. संस्थेच्या कामकाजाचे अहवाल वाचन उपाध्यक्ष अनुसया फड यांनी केले. तर उत्कृष्ट महिला उद्योजक रेहना शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले उपस्थित सर्व मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पंकजा पांडुरंग कापसे आणि चंद्रकांत कातळे यांनी केले तर शेवटी तालुका समन्वयक उषा डूमणे यांनी उपस्थित यांचे आभार मानले.

यावेळी राजकुमार आलापुरे उज्वल कांबळे संतोष चव्हाण सुरेश बुड्डे महादेव मुळे यांच्यासह सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र संस्थेच्या कल्पना मस्के, संगीता सातपुते, छाया जोगदंड, बानू चौधरी, रंजना माने, बालिका इंगळे मीना सूर्यवंशी, शारदा पुरी, प्रतिभा सूर्यवंशी पार्वती गायकवाड कविता कांबळे, अलीमुन शेख सविता खताळ रमा चक्रे इंदुबाई चिकटे मीना शिंदे यांच्यासह अडीच हजाराहून अधिक महिलांची उपस्थिती होती.