लातूर – दि (प्रतिनिधी );भारतीय स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगामध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे .वेळीच निदान उपचार झाले तर यावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य आहे. महिलांनी कुठली काळजी घ्यावी ? काय करणे गरजेचे आहे ? आदीबाबत वुमन्स डॉक्टर्स विंगआणि स्त्री रोग तज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिला आरोग्य जनजागृती ‘ हा उपक्रम राबविण्यात आला .याला चांगला प्रतिसाद मिळाला.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . यात गर्भाशय आणि स्तन रोग कॅन्सर तपासणी शिबिर व जनजागृती अभियान , व्याख्यान , जागर स्त्री आरोग्याचा ही नाटिका आदींचा समावेश होता.
यावेळी सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सुचित्रा भालचंद्र व वुमन्स डॉक्टर्स विंगच्या जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनुजा कुलकर्णी यांनी ‘महिलांच्या आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी ‘ या विषयावर मार्गदर्शन केले . यावेळी बोलताना डॉक्टर सुचित्रा भालचंद्र म्हणाल्या की , ” पाश्चात्य देशात दरवर्षी सर्वंकष आरोग्य तपासणी करण्याची व्यवस्था व सवय तेथील लोकांना आहे. भारतीय लोकांमध्ये मात्र असे दिसून येत नाही. दरवर्षी सर्वंकष आरोग्य तपासणी करून घ्यावयाची सवय आपण लावून घ्यायला हवी . दरवर्षी भारतातील 200 पैकी एका स्त्रीला स्तनाचा कर्करोग होतो . भारतीय स्त्रियांना होणार्या कर्करोगामध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान उशिरा म्हणजे तिसऱ्या किंवा चौथ्या अवस्थेत होते.दुर्देवाने साठ टक्क्यांहून अधिक स्त्रियांच्या बाबतीत स्तनांच्या कर्करोगाचे निदान उशिरा म्हणजे भारतात कर्करोगामुळे होणाऱ्या स्त्रियांच्या मृत्यू पैकी 20 टक्के मृत्यू स्तनांच्या कर्करोगाचे मुळे होतात कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास महिलांचे जीवन आणि स्तन देखील वाचू शकतात.
डॉक्टर अनुजा कुलकर्णी यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने उपस्थित महिलांना ‘ गर्भाशय मुख कर्करोग ‘ याबाबत माहिती दिली. सर्वप्रथम हा रोग होऊ नये म्हणून काय केले पाहिजे ? कारण काय ? लक्षणे ? निदान पद्धती व उपचार पद्धती याचीही सविस्तर माहिती त्यांनी आपल्या भाषणात दिली .लहान वयात मुलींची लग्न लावू नका , महिलांनी आपली प्रतिकार शक्ती वाढवली पाहिजे , यासाठी योग्य तो आहार घ्या , आहारात पालेभाज्यासह सर्व घटक आले पाहिजेत .गर्भाशयमुख कर्करोगावर निदान कसे करता येईल याबाबत त्यांनी काही टिप्सही दिल्या. लक्षण दिसल्यास घाबरून जाऊ नका , पांढरा पदर , जास्त रक्तस्त्राव , ओटीपोटात वेदना , जास्त लघवी ही लक्षणे दिसली म्हणजे घाबरून जाऊ नका . तपास करून घ्या असे त्या म्हणाल्या.
यानंतर डॉक्टर अनघा राजपूत , डॉक्टर रामेश्वरी अलाहाबादे , डॉक्टर राजश्री सावंत , डॉक्टर कांचन जाधव यांनी उत्तम पद्धतीने ‘ जागर स्त्री आरोग्याचा ‘ही छोटीशी नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली .या महिला डॉक्टरांनी आपल्या अभिनयातून महिलांनी आपल्या आरोग्याची कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी हे सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी ममता हॉस्पिटलच्या सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर माया कुलकर्णी यांनी लिहिलेल्या माहिती पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संतोष टोपे , स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉक्टर मंगला शिंदे , स्त्रीरोग विभागातील प्राध्यापक डॉक्टर भाऊराव यादव, वुमन्स डॉक्टर लिंगाच्या अध्यक्ष डॉक्टर अनुजा कुलकर्णी ,सचिव डॉक्टर रचना जाजू , स्री रोग संघटनेच्या सचिव डॉक्टर रेखा सारडा , सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सुचित्रा भालचंद्र , डॉ. ज्योती सूळ , डॉ. अपुर्वा चेपुरे , डॉ. केतकी चवंडा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाल रोग तज्ञ डॉक्टर अर्चना कोंबडे यांनी केले.