28.3 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeठळक बातम्यामहिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे

महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे

स्त्रीने जबाबदाऱ्यांबरोबर स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यावे

महिला तज्ज्ञांचे आवाहन; माईर्स एमआयटीत महिला दिनानिमित्त कार्यक्रम

लातूर, दि. 12 –

स्त्रीचे जीवन हे बाल्यावस्था, तारुण्य, वैवाहिक जीवन आणि रजोनिवृत्ती नंतरचा काळ या चार टप्प्यात गुंफलेले आहे. स्त्रीचे आयुष्य संघर्षाने भरलेले असून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या ती नेटाने पार पाडीत असते. मात्र आयुष्यातील जबाबदाऱ्यांचे ओझे सांभाळत असताना तीचे स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे हे सर्व करीत असताना स्त्रीने स्वताच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला तज्ज्ञांनी केले आहे.

    येथील माईर्स एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात महिला दिनानिमीत्त ‘केअर फॉर हर’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ महिलांनी मार्गदर्शन करताना वरील आवाहन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. संजीवनी रमेशअप्पा कराड या होत्या. या वेळी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक तथा महिला आरोग्य आणि कुटूंब कल्याण समन्वयक डॉ. वर्षा सौरभ कराड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख वक्ते म्हणून संधिवात तज्ज्ञ डॉ. मोहिनी गानू, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अमृता पाटील, ॲड. तेजस्विनी जाधव उपस्थित होत्या. या वेळी अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार, प्रशासकीय व शैक्षणिक संचालीका डॉ. सरिता मंत्री, उप अधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, प्राचार्य डॉ. सुरेश कांबळे, डॉ. पल्लवी जाधव, सर्वनन सेना यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी बोलताना डॉ. वर्षा कराड म्हणाल्या की, 8 मार्च 1908 रोजी अमेरीकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या  ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ व स्त्री शक्तीचा सन्मान करण्यासाठी 8 मार्च हा दिवस जगभरात महिला दिन म्हणून साजरा केला जातो. स्त्री – पुरुष ही संसाराची दोन चाके आहेत. पण भारतीय समाजात स्त्रीयांना पुरुषांच्या सावलीत उभे राहावे लागते. स्त्रीचा गौरव केला जातो हे खरे असले तरी सत्य वेगळेच आहे. 21 व्या शतकात आधुनिकतेचा गाजावाजा होत असताना देखील स्त्रीवर अन्याय, अत्याचार होत आहे. स्त्रीला अनेक क्षेत्रात योग्य अधिकार व मान दिला जात नाही. मात्र समाजात महिलांना समान अधिकार आहेत, हे ही अनेकांना माहित नाही. तरी ही अनेक अडचणींवर मात करीत आजची भारतीय स्त्री ही प्रगतीकडे वाटचाल करीत असून पुरुषांप्रमाणे ती सर्वच क्षेत्रात प्रगती करीत आहे, असे डॉ. कराड यांनी सांगितले.

    या वेळी ‘करिअर आणि आरोग्य’ या विषयावर बोलताना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अमृता पाटील म्हणाल्या की, शिक्षण हा जीवनात समृध्द होण्याचा पाया असून करिअर हे आत्मनिर्भर होण्याचे माध्यम आहे. स्त्री जीवनात अनेक अडचणींवर मात करीत वाटचाल करीत असते. कुटूंबाची जबाबदारी सांभाळताना अनेक गोष्टीत तडजोडी करुन नातेसबंध टिकविण्याचे काम ती समर्थपणे करते. 18 ते 25 या काळात शिक्षण घेत असताना मुलींना आर्थिक अडचणी, संतुलीत आहाराचा अभाव या मुळे अनेक पौष्टीक तत्त्वांची कमतरता भासते. या मुळे रक्तक्षय, जीवनसत्त्वांचा अभाव अशा समस्यांना सामोरे जावे लागते. बदलती जीवनशैली, जंकफुडचे सेवन ही यास कारणीभूत आहे. आरोग्यात बिघाड झाल्याने चेहऱ्यावरती फोड, केसांची वाढ, वंध्यत्व अशा समस्यांना सामना करावा लागते. त्यासाठी तारुण्यापासूनच आहाराच्या वेळा, विश्रांती, व्यायाम यांचे नियोजन करुन स्वतासाठी वेळ काढावा. रोजचा दिनक्रम ठरवून घेवून विद्यार्थी अवस्थेपासून अपयश पचवण्याची सवय करावी. अपयश आल्यास खचून न जाता अडी – अडचणी बाबत पालक, मित्र यांच्याशी बोलावे. शिक्षण मिळवण्या इतकाच संघर्ष जीवनात स्थिर होण्यासाठी करावा लागतो. त्यासाठी गरजा मर्यादित ठेवून आर्थिक नियोजन करावे. आपल्याला मिळणारा जोडीदारात समजूतदारपणाचा अभाव असू शकतो. त्यासाठी विवाहापुर्वीच जीवनात तडजोडीची तयारी ठेवावी. वयाच्या 30 नंतर वंध्यत्वाच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे 30 शी नंतरची गर्भधारणा ही अती जोखमीची असून अशा बाळात जन्मजात दोष होऊ शकतात. या गोष्ठी टाळण्याचा प्रयत्न करावा, असे डॉ. पाटील यांनी सांगीतले.

    या वेळी ‘कुटूंब आणि नातेसबंध’ या विषयावर बोलताना ॲड. तेजस्विनी जाधव म्हणाल्या की, गेल्या 10 वर्षापुर्वी घटस्फोटाचे प्रमाण कमी होते. पती – पत्नीत वाद झाल्यास विषय घटस्फोटापर्यंत जात असे मात्र तडजोडीअंती घटस्फोट टळत होता. मात्र सध्या स्थितीतील जोडण्यांचे शिक्षण समान असल्याने एकमेकात तुलना करणे, समजूतदारपणाचा अभाव यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले असून आमचे जमत नाही यावर आजच्या जोडप्यांचा भर आहे. नातेसबंधात संवाद महत्त्वाचा असून संवाद तुटला की नाते तुटते. त्यासाठी संवाद सुरु ठेवून इगो पासून दूर राहावे. सध्या समाजात आत्मियता असलेली माणसे कमी झाली आहेत. त्यामुळे घटस्फोटापुर्वी समुपदेशन घ्यावे. रिलेशनशिप, प्रेम सबंध याव्दारे होणारे विवाह जुळण्यात, टिकण्यात अडचणी येवू शकतात. मात्र दोन्ही कुटूंबांची समंती असल्यास प्रेम सबंधातील लग्णही टिकते, असे ॲड. जाधव यांनी सांगीतले.

    यावेळी ‘महिला आरोग्य’ या विषयावर बोलताना डॉ. मोहिनी गानू म्हणाल्या की, महिलेचे आरोग्य चांगले असेल तर कुटूंबाचे आरोग्य चांगले राहते. पती, मुले, कुटूंबातील सदस्य यांचा सांभाळ स्त्री करते. मात्र कुटूंबाची जबाबदारी सांभाळत असताना ती स्वताच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. घरात राहून महिलांचा आत्मविश्वास कमी झालेला असतो. त्यामुळे त्या स्वताचे निर्णय घेवू शकत नाहीत. कौटूंबीक जबाबदारी, असंतूलीत आहार, आरोग्याकडे दुर्लक्ष, मानसिक तान – तनाव यामुळे महिलेला अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे इतर जबाबदाऱ्यांप्रमाणे स्त्रीने स्वतासाठी वेळ काढून आरोग्याकडे लक्ष द्यावे व आनंदी जीवन जगावे, असे डॉ. गानू यांनी सांगीतले.

    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सरिता मंत्री यांनी केले. या वेळी डॉ. एन. पी. जमादार यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी घेण्यात आलेल्या पॅनल चर्चासत्रात उपस्थितांच्या प्रश्नांची डॉ. मोहिनी गानू, डॉ. अमृता पाटील, ॲड. तेजस्विनी जाधव या तज्ज्ञांनी उत्तरे दिली. या चर्चासत्राचे समन्वयक म्हणून डॉ. गौरी उगले यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नेहा मेश्राम, डॉ. रिषा कांबळे यांनी केले. तर आभार डॉ. शैला बांगड यांनी मानले. 

या कार्यक्रमासाठी महिला समितीच्या डॉ. शैला बांगड, डॉ. विद्या कांदे, डॉ. स्मिता माळी, डॉ. गौरी उगले, डॉ. वर्षा सांगळे, डॉ. पल्लवी जाधव, प्रा. पद्मावती यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमास एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय, एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, एमआयपी फिजीओथेरपी महाविद्यालय, एमआयएनएस नर्सिंग महाविद्यालय, एमआयओ ऑप्टोमेट्री महाविद्यालयातील महिला विभाग प्रमुख, डॉक्टर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येंनी उपस्थित होत्या.

————————————————- 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]