मुंबई, दि. ०२: वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील विविध परिचारिकांनी आपल्या विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी आंदोलन सुरु केले आहे.. याबाबत दि.०१/०६/२०२२ रोजी मा.अमितभैय्या देशमुख साहेब,वैद्यकिय शिक्षण मंत्री यांनी वैद्यकीय शिक्षण विभागातील मागण्यांबाबत बैठक घेऊन सर्व मागण्या मान्य केल्या व त्या पुर्ण करण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी निश्चित केला व दि १५ जुलैपर्यंत सर्व मागण्यांची पुर्तता करण्याचे लिखित आश्वासन दिले,तसेच मागण्यांच्या पुर्ततेसाठी, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे मा.अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक केली तसेच याबाबतच्या पाठपुरावा करण्यासाठी संचालक डॉ दिलीप म्हैसकर व मंत्रीमहोदयांचे कक्ष अधिकारी श्री श्रीकांत सोनवणे हे सहकार्य करतील असेही बैठकीत सांगितले, राज्यातील परिचारिकांनी आपले आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी यावेळी केले आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी या आंदोलनाबाबत आणि या संघटनेने केलेल्या मागण्यांबाबत मंत्रालयात चर्चा केली. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच आज दि.०२/०६/२०२२ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री मा.राजेशभैय्या टोपे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचा दालनात सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, डॉ. व्यास,अवर सचिव, अर्चना वालझाडे, आरोग्य संचालीका डॉ. तायडे मॅडम, उपसंचालक सुश्रुषा डॉ. खरात, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.विवेक पाखमोडे, राज्य सुश्रुषा अधीक्षिका, श्रीमती साधना गावंडे उपस्थितीत बैठक पार पडली. राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये परिचारिकांची नियमित भरती होण्याबरोबरच एकूण 12 मागण्या नेमक्या काय आहेत याची यावर चर्चा झाली.
बाह्यस्तोत्राद्वारे परिचारकांची नेमणूक करण्याबाबत चर्चा होऊन त्यावर फक्त नियमित पदभरती होईपर्यंत असे केले जाणार असल्याचे, परिचारिकांच्य प्रशासकीय बदल्या कमी कराव्यात व नर्सिंग भत्त्याबाबत बक्षी समितीमध्ये प्रस्तावित असल्याचे सांगितले, पदनाम बदलीचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्याचे ठरले, विद्यार्थ्याचे विद्यावेतन वाढवणे ग्रामीण रुग्णालयातील परीसेविकेचे पद जिवीत करण्याबाबत प्रस्तावित केले आहे असे सांगितले.
परिचारिकांचे प्रश्न सोडविण्याबाबत शासन सकारात्मक असून व सार्वजनिक आरोग्य संचालनालयाच्या अव्वर सचिव, उपसंचालक व संचालक या सर्व मागण्यांचा अभ्यास करतील असे सांगितले. तसेच काही मागण्यांबाबत इतर विभागाचे अभिप्राय घेणेही आवश्यक असल्याने त्यासाठी प्रस्ताव पाठवण्याबाबत सुचना केल्या व लवकरच याबाबत पूर्तता करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे यावेळी सांगितले.या बैठकीस मा. शिक्षक आमदार विक्रमजी काळे साहेब, खाजगी नर्सिंग स्कुल अशोशिएशनचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार, शंकर आडसुळ, तसेच महाराष्ट्र राज्य परिचारीका संघटना मुख्यालय लातूर संघटनेच्या राज्याध्यक्ष डॉ मनिषा शिंदे, सरचिटणीस सुमित्रा तोटे,राज्यकार्याध्यक्ष श्री अरुण कदम, उपाध्यक्ष अनिकेत पाठक, अनुसया सावरगावे पोलादसिंग गिरासे, शोभा गायकवाड श्रीमती भाठे आणि भोसले इत्यादींची उपस्थिती होती,शेवटी सुमित्रा तोटे यांनी सर्वांचे आभार मानले.