ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र विधान परिषदेवर प्रतिनिधित्व मिळावे
ज्येष्ठांना रेल्वे प्रवाशाची सवलत मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा
आदी ठराव फेस्कॉमच्या लातूर अधिवेशनात संमत
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ज्येष्ठांच्या मागण्या सोडविण्यासाठी दिला शब्द
लातूर ;(माध्यम वृत्तसेवा) ज्येष्ठ नागरिक संघ लातूर द्वारा आयोजित महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या (फेस्कॉम) 34 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे रविवारी सायंकाळी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सूप वाजले. या अधिवेशनामध्ये विविध ठराव संमत करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात सवलत देण्याची सूट देण्यात आली होती ,ती कोरोना काळामध्ये काढून घेण्यात आली ती परत सुरू करावी यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा असा ठराव या अधिवेशनात सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे 34 वे राज्यस्तरीय अधिवेशन लातूर मधील दिवाणजी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. दोन दिवशीय या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये विविध विषयावर मंथन करण्यात आले. ज्येष्ठांना मार्गदर्शन करण्यात आले .तसेच ज्येष्ठांचे आनंदी जीवन ,ज्येष्ठत्व ते श्रेष्ठत्व ,आरोग्यमय जीवन कसे जगावे?, हृदयरोग व घ्यावयाची काळजी , ज्येष्ठांचे आरोग्य, फेस्कॉम कॉल आज आणि उद्या आदी विषयावर चर्चासत्र, व्याख्यान ठेवण्यात आले होते . या चर्चासत्रामध्ये व व्याख्यानामध्ये अनेक मान्यवरांनी सहभाग घेत ज्येष्ठांना मार्गदर्शन केले.
रविवारी सायंकाळी फेस्कॉम चे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ झाला . यावेळी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, फेस्कॉमचे उपाध्यक्ष अशोकराव तेरकर, अरुण रोडे,सचिव चंद्रकांत महामुनी, महिला विभाग प्रमुख डॉ. निर्मलाताई कोरे, संघटक सचिव डॉ. बी आर पाटील ,जगदीश जाजू, आर बी जोशी, प्रकाश घादगिने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या अधिवेशनामध्ये संमत करण्यात आलेले ठराव
केंद्र सरकारने कोरोना काळात जेष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासातील सवलत काढून घेतलेली सवलत परत चालू करण्याबाबत महाराष्ट्र शासन केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करावा, महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक लाभाच्या सर्व योजना या 65 पासून सुरू होतात त्या सर्व योजना या वयाच्या 60 नंतर चालू कराव्यात, बहुतेक सर्व आर्थिक लाभाच्या योजना या दारिद्र्यरेषेखालील जणांसाठी आहेत व दारिद्र्यरेषेची व्याख्या ही कुटुंबाचे वार्षिक एकत्रित उत्पन्न हे 21000 च्या आत असले पाहिजे हा निकट 1995 च्या आर्थिक निकषावरील आहे आता 2025 चालू आहे दारिद्र्यरेषेखालची अट काढून सरसकट 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन चालू करावी, महात्मा फुले जन आरोग्य योजना सर्व ज्येष्ठांना सर्व शासकीय व खाजगी हॉस्पिटलमध्ये सुरू करावी ,जेष्ठ नागरिक संघाने स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या जागेत स्वतःच्या उत्पन्नातून सर्व सुविधा नियुक्त विरंगुळा केंद्र निर्माण करून द्यावी, आई वडील व जेष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याण कायदा २००७ व नियम 2010 प्रमाणे समाज कल्याण विभाग, पोलीस कमिशनर कार्यालयातील कर्मचारी, मेडिकल ऑफिसर यांनी आलेल्या केसेस वर त्वरित कार्यवाही साठी आदेश द्यावे, न्यूक्लिअर फॅमिली मुळे आता वृद्धाश्रम काळाची गरज निर्माण झाली आहे. शासकीय व खाजगी वृद्धाश्रमामध्ये शासकीय अनुदान वाढविण्यात यावे ,जेष्ठ नागरिकांना एकाकीपणा दूर करण्यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत ,जेष्ठ नागरिकांसाठी महामंडळाची निर्मिती करण्यात आली आहे त्यात किमान 50 टक्के ज्येष्ठांचे प्रतिनिधित्व देण्यात यावे, महाराष्ट्रच्या विधान परिषदेवर ज्येष्ठांचे दोन प्रतिनिधी नियुक्त करण्यात यावेत ,ज्येष्ठांसाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्यात यावे ,आदी ठराव या अधिवेशनामध्ये सर्वानूमदते मंजूर करण्यात आले .या ठरावाचे वाचन अरुण रोडे यांनी केले त्याला उपस्थित ज्येष्ठांनी टाळ्यांच्या कडकडाटात अनुमती दिली.

या अधिवेशनामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील समारोप प्रसंगी बोलताना म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक हा या देशाचा अविभाज्य व महत्त्वाचा घटक असून या घटकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्येष्ठांच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडविण्यासाठी शासन दरबारी आपण योग्य तो पाठपुरावा करू असे त्यांनी जेष्ठांना आश्वासित केले.
पूर्वी घरांमध्ये आजी- आजोबा होते त्यामुळे मुला-मुलीवर योग्य ते संस्कार होत असत आता घरामध्ये आजी -आजोबा सर्वांना जड झाले आहेत. त्यामुळे मुले वाईट गोष्टीकडे वळत आहेत ,ही बाब तरुण पिढीने लक्षात घेणे गरजेचे आहे; आणि ज्येष्ठांना योग्य तो सन्मान दिला गेला पाहिजे .जेष्ठ नागरिक हे आपल्या घरातील अडगळ न ठरता त्यांना वृद्धाश्रमामध्ये पाठवणे हे अत्यंत चुकीचे असल्याचे बाबासाहेब पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते विविध ज्येष्ठांना स्मृती प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांनी अध्यक्षीय समारोप करताना ज्येष्ठ नागरिक यांना ज्या सोयी सवलती दिल्या जातात जास्त त्यामध्ये महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य असून, इतर कुठल्याही कुठल्याही प्रांतामध्ये ज्या सोयी सवलती मिळतात त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांना सोयी सवलती दिल्या जातात. ज्येष्ठ नागरिकांच्या जवळपास 80 टक्के मागण्या या मान्य झाल्या असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.