महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला थाटात प्रारंभ
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दीड हजार ज्येष्ठ नागरिक सहभागी
भव्य शोभायात्रेने लातूरकरांचे लक्ष वेधले
स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा … मान्यवरांनी दिला ज्येष्ठांना सल्ला!
लातूर ;दि.११(माध्यम वृत्तसेवा )ज्येष्ठ नागरिक संघ लातूर द्वारा आयोजित महाराष्ट्र जेष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम)च्या ३४ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाला लातूर नगरीमध्ये थाटात प्रारंभ झाला. अत्यंत उत्साही वातावरणामध्ये या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. भव्य शोभायात्रेने लातूरकरांचे लक्ष वेधले .महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दीड हजार ज्येष्ठ नागरिक या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. स्वस्थ रहा ,मस्त रहा, आनंदी रहा असा सल्ला मान्यवरांनी ज्येष्ठांना दिला. या अधिवेशनाचा समारोप रविवारी म्हणजे उद्या होणार आहे.
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे ३४ वे राज्यस्तरीय अधिवेशन लातूर मधील दिवाणजी व श्याम मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे .ज्या सभागृहामध्ये हे अधिवेशन होत आहे त्याला कै. गुरुशांतप्पा नागप्पा लातूरे सभागृह असे नाव देण्यात आले आहे .या अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार होते ;परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ते येऊ शकले नाहीत या अधिवेशनाचे उद्घाटन विद्यमान खासदार डॉ. शिवाजीराव काळगे ,तसेच माजी खासदार डॉ.गोपाळराव पाटील, शिक्षक आमदार विक्रम काळे , महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे आदींच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले .
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष डॉ अण्णासाहेब टेकाळे, उपाध्यक्ष अशोकराव तेरकर, जेष्ठ नागरिक महामंडळाचे माजी अध्यक्ष अरुण रोडे ,सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त अविनाश देवशेटवार, फेस्कॉमचे सचिव चंद्रकांत महामुनी, उपाध्यक्ष अंजुमन रशीद खान ,महिला विभाग प्रमुख डॉ.निर्मलाताई कोरे, संघटन संघटक सचिव डॉ. बी. आर. पाटील तसेच प्रभाकर कापसे, जगदीश जाजू, आर. बी जोशी, डॉ. सी. एन. जोशी, डॉ.मायाताई कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. वैशिष्ट्य म्हणजे वार्धक्यामुळे विश्रांती घेत असलेले ममता हॉस्पिटलचे डॉक्टर मधुकरराव कुलकर्णी हे देखील संपूर्ण वेळ आपल्या व्हीलचेअर मध्ये बसून अधिवेशन स्थळी उपस्थित होते.
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या 34व्या राज्यस्तरीय अधिवेशनाची सुरुवात सकाळी शोभायात्रेने झाली. ही शोभायात्रा अत्यंत उत्साही वातावरणामध्ये काढण्यात आली .या शोभायात्रा मध्ये महाराष्ट्रभरातून आलेले ज्येष्ठ नागरिक आपल्या पारंपरिक विषयांमध्ये सहभागी झाले होते .ही शोभायात्रा गांधी पुतळा ते मुख्य रस्त्यावरून फिरून अधिवेशन स्थळी विसर्जित झाली. अधिवेशन स्थळी आल्यानंतर फेस्कॉमचे अध्यक्ष डॉ.अण्णासाहेब टेकाळे तसेच अरुण रोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या अधिवेशनामध्ये फेस्कॉमचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांना महाराष्ट्र भूषण व अरुण रोडे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या दोघांचाही सपत्नीक सत्कार करण्यात आला .स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान करण्यात आला.
या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी प्रारंभी महाराष्ट्र भरातून आलेल्या जेष्ठ नागरिकांचे स्वागत केले. आपल्या स्वागतपर भाषणात डॉ. काळगे यांनी ज्येष्ठांच्या अनेक मागण्यांकडे लक्ष वेधले .ज्येष्ठांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमीच तत्पर राहू असा शब्द देखील त्यांनी यावेळी दिला. ज्येष्ठांना रेल्वे सवलती पासून वंचित ठेवण्यात आले असल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली .दुर्दैवाने ज्येष्ठांचा हा प्रश्न सोडविण्याची मानसिकता सत्ताधाऱ्यांमध्ये नाही अशी टीका देखील त्यांनी केली .परंतु हा प्रश्न धसास लावण्यासाठी आपण आवाज उठवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठांनी आरोग्याच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. ज्येष्ठांनी चांगले राहिले पाहिजे ,आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, आपल्या आरोग्या बाबतीत सजग राहिले पाहिजे अन्यथा त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. लोकप्रतिनिधी म्हणून जी गरज पडेल तेव्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत आपण आवाज द्या आम्ही उभे राहू असेही त्यांनी ज्येष्ठांना सजग केले. ज्येष्ठांनी आपल्या अनुभवाचा फायदा नवीन पिढीला व्हावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे .आपली संस्कृती जोपासण्यासाठी ज्येष्ठांच्या अनुभवाची गरज आहे. बिघडत चाललेल्या पिढीला सुधारण्याची जबाबदारी ज्येष्ठांवर आहे ;त्यामुळे त्यांनी कार्यरत राहिला पाहिजे असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी आपल्या प्रभावी भाषणाने महाराष्ट्रभरातून आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची मने जिंकून आपल्या भाषणाची सुरुवातच त्यांनी माता-पित्यांनो असा उल्लेख करून केली . काळे यांनी ज्येष्ठानप्रति सन्मान व्यक्त केला .ज्येष्ठांना आपण ज्येष्ठ नागरिक म्हणणार नाही तर माता-पिता असा त्यांचा उल्लेख करू असे सांगत त्यांनी आपल्या सर्वांचे दर्शन घेण्याचा योग आला, नतमस्तक होण्याचा योग आला असे सांगितले हा योग फेस्कॉमचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांच्यामुळे आला असेही ते म्हणाले. आपण 21व्या शतकांकडे वाटचाल केली आणि यंत्र युगाकडे वाटचाल करीत असलो तरी, आपण अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे आपण वेगवेगळ्या प्रगत्या करीत असलो तरीही ज्येष्ठांचा सन्मान आपण करण्यामध्ये कमी पडत आहोत त्यामुळे मनाला वेदना होत आहेत. एकत्र कुटुंब व्यवस्था विस्कळीत झाली आहे. पूर्वी घरामध्ये आजी-आजोबा वास्तव्यात असायचे, मामाच्या गावाला जाऊया असे गीत म्हटले जायचे.. परंतु या सगळ्याचे विस्मरण होत आलेले आहे .काळ बदलत आहे आता घरामध्ये आजी-आजोबा दिसत नाहीत मामा-मामी यांचे दर्शन देखील दुर्मिळ होत झालेले आहे. घरामध्ये नवरा बायको मध्ये सुद्धा संवाद राहिलेल्या नाही .आपण स्वतःला मोबाईल मध्ये गुंतवून घेतलेले आहोत. त्यामुळे संवाद हरवत चाललेला आहे, नको त्या गोष्टीमुळे नको त्या गोष्टी घडत आहेत. मुलं आई-वडिलांच्या जीवावर उठले आहेत .त्यामुळे आपण मुलांबद्दल मुला-मुलींवर कसले संसार करीत आहोत ?असा सवालही विक्रम काळे यांनी उपस्थित केला .ज्येष्ठांना वृद्धाश्रमाची वाट धरावी लागते यासाठी तरुणांनी चिंतन केले पाहिजे , आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे हे मुला मुलींनी विसरता कामा नये असेही ते शेवटी म्हणाले.
फेस्कॉनचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी ज्येष्ठांना समस्यांचा सांगत काही मागण्यांकडे देखील सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधले. एका कॅन्टीनमध्ये काम करीत फेस्कॉमचे अध्यक्ष झालेल्या अण्णासाहेबाला आपण ९५ वर्षाच्या डॉक्टर गोपाळराव पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला याबद्दल देखील त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली .गेल्या ४४ वर्षाच्या इतिहासामध्ये असे अधिवेशन झाले नाही लातूरमधील हे अधिवेशन यशस्वी झाले आहे. अधिवेशनाचा हा देखील ‘लातूर पॅटर्न ‘ म्हणून ओळखला जाईल. प्रकाश घादगिने व आ.बी. जोशी व त्यांच्या टीमने ज्येष्ठांना साजेचे काम केले आहे ,त्याबद्दल त्यांनी लातूरच्या टीमचे कौतुक केले.
ज्येष्ठांना रेल्वेची सवलत पुन्हा सुरू करावी यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत. येत्या दिवाळीपर्यंत सरकारने हा निर्णय नाही घेतल्यास देशभरातील हजारो ज्येष्ठ नागरिक जंतर-मंतरवर आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करतील,असा इशाराही त्यांनी दिला.ज्येष्ठांना जंतरमंतरवर येऊ देण्याची वेळ सरकारने येऊ देऊनये. आपल्याला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याबद्दल भाषणामध्ये अण्णासाहेब टेकाळे भावनाविवश झाले .एका कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या मुलाला आपण महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन सन्मान केला, याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. स्वस्थ रहा मस्त रहा आनंदी राहा असा सल्ला देखील त्यांनी ज्येष्ठांना दिला.
लातूर मधील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ तथा माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. पाटील यांनी अभ्यासपूर्ण भाषण करून महाराष्ट्रभरातून आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लक्ष वेधले. नवी पिढीमुळे काही प्रश्न निर्माण होत आहेत ते सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा, त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत असे ते म्हणाले .ज्येष्ठांच्या ९०टक्के मागण्या पूर्ण झाल्या आहेत तुम्ही निश्चित रहा सगळे प्रश्न सुटतील ,असा आशावाद देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठांनी सोशिक बनायला पाहिजे, आपल्या गरजा कमी केल्या पाहिजेत, जेष्ठांचे संपूर्ण जीवन सुखी समाधानी होण्यासाठी ज्येष्ठांनी आपल्यामध्ये काही बदल करून घेतले पाहिजेत, असा सल्ला देखील डॉ. गोपाळराव पाटील यांनी देत समाधानी जीवन पद्धती जगण्यासाठी काही मूलमंत्र देखील दिला.
याप्रसंगी काढण्यात आलेल्या स्मरणिकेचे विमोचन देखील मान्यवरांच्या ते करण्यात आले.
नागपूर येथील उद्धवराव वाटकर या ज्येष्ठांनी शिर्डीचे साईबाबा यांचा वेश परिधान करून अधिवेशनस्थळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले .प्रत्यक्ष शिर्डीचे साईबाबाच अधिवेशनस्थळी अवतरले की काय असा अनुभव यावेळी जेष्ठांनी घेतला .त्यांचे ज्येष्ठांनी जोरदार स्वागत केले.
डॉ. अण्णासाहेब टेकाळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ अर्थात फेस्कॉम या संघटनेचे नूतन अध्यक्ष डॉ अण्णासाहेब टेकाळे हे आमचे जुने मित्र असून आमच्या शेजारच्या उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव जिल्ह्याचे ते रहिवासी आहेत. आमचे स्नेही ठाण्यातील बंधुवर्य ज्येष्ठ पत्रकार राजीव कुळकर्णी यांच्यामुळे आमचा त्यांचा परिचय झाला.आम्ही त्यांना बापू याच नावाने संबोधतो.
प्रदीर्घ काळ त्यांनी मंत्रालयात काम केले. डॉ. माधवराव किन्हाळकर, डॉ.जयप्रकाश मुंदडा, भास्करराव पाटील खतगावकर, विलास काका पाटील या माजी मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम केले. आजही जुने लोकप्रतिनिधी आणि मंत्रालयातील अधिकारी बापूंची आठवण ठेवतात आणि पदावर असताना त्यांनी आमचे काम लक्ष घालून केले याच्या आठवणी आवर्जून सांगतात. असे भाग्य फार कमी अधिकाऱ्यांना मिळते.
टेकाळे साहेबांची सचोटी आणि प्रामाणिकपणा लक्षात घेऊन एमआयटी या विश्व प्रसिद्ध संस्थेचे सर्वेसर्वा डॉक्टर विश्वनाथरावजी कराड यांनी बापूंना एमआयटीमध्ये विशेष जबाबदारी दिली. गेली 16 ते 17 वर्षे बापू म्हणजेच एमआयटी असे समीकरण बनून गेले आहे इतके ते या संस्थेची एकरूप झाले आहेत.
सेवेत असताना आणि सेवानिवृत्तीनंतरही राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सुटावेत अशी बापूंची तळमळ असायची. याच भावनेतून त्यांनी निवृत्तीनंतर फेस्कॉम या संघटनेचे काम सुरू केले. नोकरी संपल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना समाधानाने आणि आनंदाने जगता यावे यासाठी अनेकदा त्यांनी सरकारकडे निवेदने दिली. मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. फेस्कॉमच्या प्रयत्नामुळेच ज्येष्ठ नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले. 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवास, महिलांना बस भाड्यात 50 टक्के सूट, वर्षातून दोन वेळेस जेष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, आरोग्य विभागाच्या विविध सनियंत्रण समित्यांवर ज्येष्ठ नागरिकांना प्रतिनिधित्व मिळणे असे अनेक प्रश्न टेकाळे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मार्गी लावले. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यातील सवलत पूर्ववत चालू करणे यासारखे काही थ प्रश्न सुटायचे बाकी आहेत.आता डॉक्टर टेकाळे हे फेसकॉमचे अध्यक्ष झाल्याने त्यांच्या कारकिर्दीत हे प्रश्नही मार्गी लागतील असा आम्हाला विश्वास वाटतो. आज लातूरच्या अधिवेशनामध्ये बापूंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.फेस्कॉमचे अध्यक्ष झाल्याबद्दल आणि त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याला आम्ही शुभेच्छा देतो.
– संपादक