सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते अयोध्येमध्ये भूमिपूजन सोहळा पार पडला
लातूर दि. १५ (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकांपूर्वी म्हणजेच जानेवारी 2024 मध्ये केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारच्या कार्यकाळात गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेले भव्य-दिव्य राम मंदिर उभारल्यानंतर देशभरातून भाविक व राम भक्तांनी अयोध्येत दर्शनासाठी गर्दी केली होती. तर, महाराष्ट्रातूनही भाविक मोठ्या प्रमाणात अयोध्येला रामललाच्या दर्शनासाठी गेले होते.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मंत्र्यांसह रामललाचे दर्शन घेतले होते त्यावेळी अयोध्येत महाराष्ट्र भक्त सदन बांधण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानतंर अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर परिसरात महाराष्ट्र भक्त सदन उभारण्यासाठी राज्य शासनाने जूनमध्ये जमीनही खरेदी केली होती. या जागेवर पर्यावरण पूरक हरित इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारत बांधणीचे भूमिपूजन नुकतेच महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण व उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. महाराष्ट्रातील जनतेसाठी हा अतिशय आनंदाचा क्षण असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यावेळी म्हणाले.
याबाबत अधिक माहिती देताना मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले की जवळपास 9500 चौरस मीटर क्षेत्रफळावर 12 मजली भव्य महाराष्ट्र भक्त सदन उभे राहणार असून त्या ठिकाणी 650 पर्यटक राहू शकतील, असे भव्य भक्त निवास साकारणार आहे. भक्त निवासात एकूण 4 व्हीआयपी कक्ष, 96 खोल्या असून 40 डॉर्मिटरी बांधण्यात येणार आहेत. पुढील तीन वर्षात हे महाराष्ट्र भक्त सदन बांधून पूर्ण करण्यात येणार आहे. हे भक्त सदन अयोध्येतील महत्त्वाच्या सर्व स्थळांपासून जवळ आहे. महर्षी वाल्मिकी विमानतळ पासून 11.5 किमी, श्रीराम जन्मभूमी मंदिर पासून 7.5 किमी तर अयोध्या रेल्वे जंक्शनपासून 4.5 किमी अंतरावर आहे. श्रीरामाचे आणि महाराष्ट्राचे पौराणिक नाते असून श्रीरामाला गोदातीर पाहिल्यावर शरयू नदी तटाची आठवण झाली. त्यातूनच महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यात धार्मिक आणि सांस्कृतिक नाळ जुळली. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र हे समस्त भारतीयांसाठी धार्मिक आणि भावनिक असून महाराष्ट्रातील शेकडो स्वयंसेवक आणि कारसेवक यांनी त्यासाठी प्रखर संघर्ष केला. श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यावर महाराष्ट्रातील भाविकांसाठी जून महिन्यात अयोध्येत महाराष्ट्र भक्त सदन बांधण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात येणारे हे महाराष्ट्र भक्त सदन म्हणजे याच भावनिक नात्याचे पुढचे पाऊल आहे, असे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी म्हणाले.
दरम्यान, या भूमिपूजन सोहळयासाठी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, अयोध्या हनुमान गढीचे महंत राजू दासजी महाराज, अयोध्येचे आमदार वेदप्रकाश गुप्ता, महापौर गिरीशपती त्रिपाठी, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सचिव (इमारती) संजय दशपुते, मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता विवेक बडे, मुख्य अभियंता रणजित हांडे, अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी आदि मान्यवर उपस्थित होते.