औसा ,(वृत्तसेवा):- उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. महायुती सरकारचा महा कल्याणकारी अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे आर्थिक नुकसान सहन करावं लागलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी ५००० रु. नुकसानभरपाई देण्याचा, ४४ लाख कृषी पंप धारक शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करण्याचा, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील माता भगिनींना प्रति महिना १५०० रुपये अर्थसहाय्य देण्याचा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ५२ लाख कुटुंबांना प्रति वर्ष ३ गॅस सिलिंडर मोफत उपलब्ध करून देण्याचा, १ जुलै, २०२४ पासून गाय दूध उत्पादकांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही स्वागतार्ह आहे, असेही आमदार अभिमन्यू पवार म्हणाले.
शेतकरी आणि महिला वर्गाचे हित डोळ्यांसमोर ठेवून सादर करण्यात आलेल्या जनकल्याणकारी अर्थसंकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजित पवार यांचे आमदार पवार यांनी अभिनंदन केले आहे.