सुमारे ४०० विद्यार्थ्याद्वारे साकारण्यात येणारे हैदराबाद मुक्ति संग्रामावरील महानाट्य
दि. 4.8.2023: भारतीय स्वातंत्र्य संग्राम तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम यास 75 वर्ष पूर्ण होत असल्याकारणाने त्याचा अमृत महोत्सव केंद्र शासन तसेच राज्य शासनाकडून साजरा केला जात आहे. त्याच अनुषंगाने एक शैक्षणिक संस्थेने समाजासाठी दीपस्तंभ सारखे कार्य करणे अपेक्षित असते, ही भूमिका लक्षात घेऊन श्यामलाल स्मारक शिक्षण संस्था, उदगीर जिल्हा लातूर यांच्या श्यामलाल कला अकॅडमीच्या माध्यमातून हैदराबाद मुक्ति संग्राम वरील एक ऐतिहासिक महानाट्य सादर केले जाणार आहे, त्यानिमित्ताने हा लेख प्रपंच. -संपादक
दीडशे वर्ष राज्य करणारे इंग्रजांकडून मुक्ती जेव्हा मिळाली तो भारताचा स्वातंत्र्याचा इतिहास म्हणून म्हणवला जातो. परंतु जवळपास साडेसहाशे वर्ष निजामाच्या जोखडात आपण होतो. पूर्ण हैदराबाद स्टेट त्यात मराठवाडा देखील होता. जुलूम, अत्याचार, पीड़ा, अपमान सहन करीत भारत देशाच्या पिढ्यान पिढ्या या गुलामगिरीत राहत होता. त्यातून मिळवलेली मुक्ती ही स्वातंत्र्याच्या लढाईचा इतिहास म्हणून इतिहासाच्या पुस्तकांमध्ये का नाही हा प्रश्न स्वतः स्वतःस विचारून पहावे, तेव्हा या घटनेचे गांभीर्य लक्षात येईल असे वाटते. जालियनवाला बागेच्या हत्याकांड हे सर्वांना ठाऊक आहे, पण गोरटा येथे झालेले हत्याकांड तसेच कल्लाळी येथे झालेले हत्याकांड व अशी अनेक हत्याकांडे कुणालाच ठाऊक नाहीत. ज्या ठिकाणी, एकाच ठिकाणी वाड्यात अनेक तरुण क्रांतिकारकांना जिवंत जाळण्यात आले, मारण्यात आले, कत्तल करण्यात आली, बांधून पेटवून देण्यात आले ह्या सगळ्या बाबी अंगावर शहारे आणण्यासारख्या आहेत, जर ते आपण पाहिलं, वाचलं किंवा अनुभवलं तरच. उदगीर जवळील हत्तीबेट येथे झालेली किसान दलाचे लढाई हा देखील विषय अतिशय महत्त्वाचा आणि समाजाभिमुख होणे त्याहून यादीत महत्वाचे आणि हीच भूमिका किंवा सत्य, आपल्या पूर्वजांकडून केलेल्या ह्या थोर कार्याचे स्मरण राहावे म्हणून, तो इतिहास पुन्हा जिवंत करण्याचा आणि तीही बालवाडी ते बारावीच्या सुमारे 400 विद्यार्थी यांच्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून जगासमोर आणावे या संकल्पनेने हे महानाट्य सादर होत आहे.
इतिहास फक्त वार्षिक परीक्षेच्या निमित्ताने प्रश्नाचे उत्तरे देण्यापुरताच विषय आहे किंवा आपल्या पूर्वजांकडून किंवा आपली जी पाळेमुळे आहेत त्यातून काही शिकून, काही मिळवून आयुष्याला उभारी देण्याच्या अनुषंगाने इतिहासाचे महत्त्व आहे हे लक्षात घेणं किंवा अधोरेखित होणं फार महत्त्वाचे आहे. जगामधल्या अनेक राज्यक्रांती किंवा इतर क्रांत्या आपण इतिहासाच्या पुस्तकांमध्ये पाहतो पण आपल्याच मागच्या पिढ्यांकडून केले गेलेल्या क्रांत्या, उठाव, बंड किंवा सत्यासाठीची लढाई, जूलमाविरुध्द युद्ध ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदल करू शकतात आणि त्यामुळेच इतिहासाला वेगळं महत्त्व प्राप्त असायला पाहिजे, परंतु तसे होताना दिसत नाही. आज शिवजयंतीच्या निमित्तानं नसानसांमध्ये वाहतं उकळतं रक्त आपण तरुणांच्या मनामनामध्ये पाहतो, त्याच अनुषंगाने आपल्या जीवनामध्ये स्वाभिमान बाळगून अन्यायाविरुद्ध बंड करणे या गोष्टी देखील आवश्यक आहेत किंबहुना ते आपल्याला पुढील आयुष्यासाठी दिशादर्शक ठरतील हे नक्कीच.
सदरील सत्य घटनांबाबत कुठेही अधिकृतपणे पाठ्यपुस्तकांमध्ये, इतिहासाच्या पुस्तकांमध्ये माहिती नसताना हे महानाट्य करण्याचा विडा उचलला गेला आणि मग त्याच्यासाठी अनेक पुस्तकांची शोधाशोध केली गेली. अनेक गुरूजण त्याच्या लेखन आणि संवाद लेखन यासाठी आपला वेळ खर्च करायला लागतात. व्यवसायिक कोणीही कलावंत नसताना शाळकरी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या भावना रुजून त्यांच्या चेहऱ्यावरती भाव आणून ती अभिव्यक्ती व्यावसायिक मंचा सदृश्य मंचावर आणणे ही एक मोठी सर्कसच म्हणावी लागेल. दिग्दर्शन असेल, नेपथ्य असेल, मंच व्यवस्था असेल ह्या सगळ्या गोष्टी वेबसाईट धर्तीवर करणे तेही अव्यवसायिक आणि शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून करणे यातील नावीन्य आणि महत्त्व आपण लक्षात घेऊ शकता. शाळेचे अध्ययन, परीक्षा, शाळेतले दिलेले कार्य या सगळ्या गोष्टींना न्याय देऊन त्यासोबतच आपल्या स्वातंत्र्याच्या इतिहासास जागे करण्याचे कार्य करताना गुरुजन वर्गाने आपला अधिकचा दिलेला वेळ ही बाब अतिशय महत्त्वाची आणि त्याची नोंद घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे असे वाटते.
नुसतेच मनोरंजनासाठी एक नाट्य साकारणं इथंपर्यंत उद्देश न ठेवता खरोखर या स्वातंत्र्यासाठी झटलेल्या लोकांना आदरांजली वाहण्याकरिता त्यांच्या वारसांचा देखील स्वाभिमानाने सत्कार करून त्यांना त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या स्वाभिमानी कार्याचे पुनश्च आठवण करून देण्याचे कार्य देखील संस्थेच्या माध्यमातून केले गेलेले आहे. आतापर्यंत गूंजोटी येथील आर्य समाजाचा पहिला हुतात्मा वेदप्रकाश जिथे झाला त्या ठिकाणी, अप्पासाहेब नाईक यांच्या कंधार कल्लाळी येथे, भाई श्यामलाल जी, बन्सीलालजी यांच्या वारसांचे हैदराबाद येथे तसेच धारुर, औरंगाबाद व इतर ठिकाणी सन्मान पत्र देऊन हुतात्म्यांचे वारसांचा संस्थेकडून सत्कार करण्यात आला. उस्मानिया युनिव्हर्सिटी मध्ये ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम के स्वतन्त्रता सेनानी एवं भारतीय भाषाएँ’ या अनुषंगाने एक आंतरराष्ट्रीय संगोष्ठीचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी देखील आलेले स्वातंत्र्य सैनिकांचे किंवा हुतात्म्यांचे जे वारसदार होते त्यांचा देखील तिथे सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय संगोष्ठीच्या निमित्ताने आमच्या संस्थेतील तीन सहशिक्षकांनी श्री प्रविण भोळे सर, श्रीमती वनमाला मुक्कावार मॅडम तसेच श्रीमती संगीता खादीवाले मॅडम यांच्यासह प्रत्यक्ष संस्थेचे अध्यक्ष सुपोषपाणि आर्य यांनी म्हणजे मी स्वतः देखील प्रबंध सादर केला आणि अशा प्रकारच्या उस्मानिया युनिव्हर्सिटी मधे ज्याची स्थापना खुद्द निजामाने केली, त्या युनिव्हर्सिटी मध्ये निजामाच्याच राजवटीतील क्रूरक्रत्यांबद्दल बोलून त्यांच्याकडून स्वातंत्र्य हिसकावून घेतल्याची कहाणी त्याच मंचावरून विशद करण्याचे सौभाग्य लाभले. आम्हा सर्वांचे पहिले वहिले हे प्रबंध आणि त्याचे वाचन ही होते. याचाही आस्वाद अनेकांनी घेतला आणि टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये या कार्याबद्दल आणि या महानाट्य बद्दल देखील सर्वांनी कौतुक करून त्याचा लाभ घेण्याचे आम्हास आश्वस्त केले.
एवढेच नव्हे तर या महानाट्याच्या निमित्ताने निमंत्रणे देण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गावांमध्ये जाण्याचा योग आला म्हणजेच नागपूर असेल, औरंगाबाद असेल, तिरुका असेल कल्लाळी असेल, नांदेड असेल या सर्व ठिकाणी उपलब्ध असलेले हुतात्म्यांचे स्मारक यांना भेटी, हुतात्म्यांचे याद्या त्यांचे छायाचित्र या सगळ्यांचे संकलन करून त्या त्या ठिकाणी असलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. फक्त एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी हा इतिहास घडला आहे त्या दऱ्याखोऱ्यांमध्ये जाऊन, जे विद्यार्थी या महानाट्यामध्ये अभिव्यक्त होत आहेत त्यांना त्यातलं वास्तव जाणून घेऊन अधिक ताकदीची अभिव्यक्ती व्हावी यासाठी नियोजन केले जात आहे. हा इतिहास कुठल्या किल्ल्यांमधला नसून समाजामध्ये, वेगवेगळ्या गावांमध्ये, दऱ्यांमध्ये, खोऱ्यामध्ये, वाड्यांमध्ये झालेला आहे आणि म्हणून त्याची अभिव्यक्ती करण्यात तितकंच कठीण कार्य आहे. तो विषय मनामध्ये विद्यार्थ्यांच्या रुजून ते अभिव्यक्त व्हावे ही भूमिका त्यामागे आहे. त्यावर लेखन कार्य करणाऱ्यांच्या मनामध्ये त्याविषयीची खरोखरीची भावना जाणून घेण्याकरिता त्या त्या हुतात्म्यांच्या वारसांच्या मुखातून त्या अनुभवाबद्दल, घटनांबद्दल जमा माहिती पुढ्यात पडते तेव्हा त्यातलं गांभीर्य लक्षात येते. ह्या सगळ्या बाबी करून विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये, समाजामध्ये आणि पूर्ण मराठवाडा परिसरामध्ये, हैदराबाद स्टेट मध्ये याची जाणीव जागृती निर्माण करण्याचे महत्कार्य आम्ही हातात घेतलेले आहे. किंबहुना हे आपले कर्तव्यच आहे की आपल्या पूर्वजांचा स्वाभिमानी इतिहास जगासमोर आणावा आणि ते कर्तव्य पूर्ण करण्याचा मानस आम्ही केला आहे. माध्यमिक शाळेचे आमचे विद्यार्थ्यांचे मार्फत एकेक क्रांतिकारकांबद्दल प्रोजेक्ट तयार करून घेतले गेले आणि हैदराबाद येथील कार्यक्रमादरम्यान या सर्व प्रोजेक्ट मधील माहितीचे पुस्तकामध्ये रूपांतर किंवा मुद्रण करण्यात येईल अशी आश्वस्ति देखील आम्हास दिली गेली आहे. याच धर्तीवर या कार्याचे किंवा या स्वतंत्रता संग्रामाची दखल महाराष्ट्र व केंद्र शासन तसेच आंध्र, तेलंगणा व कर्नाटक शासनाने घ्यावी आणि अशा प्रकारचे आयोजन अनेक ठिकाणी व्हावे आणि हा इतिहास जिवंत व्हावा ही इच्छा रास्तच आहे नाही का!
या कार्यासाठी अनेक जण जुड़त आहेत. कोणी त्यावर पुस्तक लिहिले आहे तर कोणी त्यावर पी एच डी केली आहे तर कोणी यावर नाट्य लेखन करीत आहेत. ज्याना ज्यांना या विषयी माहिती मिळाली ते स्वतः या कार्यात आपले योगदान देत आहेत. ज्या ज्या राजकिय नेत्याना या विषयी निमंत्रणे गेली त्या सर्वांनी याचे कौतुक करून येण्यासाठी स्वीकृती दर्शविली. परवाच क्षेत्र भेटीसाठी जेथून ऑपरेशन पोलो ची सुरुवात झाली त्या नळदुर्ग किल्ल्यास विद्यार्थ्यांसह भेट दिली गेली. उमरगा येथे जवळपास 12 हुतात्म्यांच्या वारसांच्या स्मृति जाग्या करून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या मुखातून त्या काळातील अनुभव कथन अतिशय मोलाचे वाटले. त्या किल्ल्यामध्ये चालू असलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांची, गुरुजनांची टीम तेथे पोहोचली तेव्हा त्या कार्यक्रमाला उपस्थित देखील माजी मंत्री मधुकर चव्हाण तसेच तेथील कलेक्टर साहेब इत्यादी लोकांनी जेव्हा या महानाट्य बद्दल ऐकले तेव्हा त्यांच्याकडून देखील अतिशय कौतुक करून प्रत्यक्ष पाहण्यासाठी आम्ही जरूर येणार या अनुषंगाने स्वीकृती दिली गेली व आमच्या समोरच शिवरायांचा पुतळा देऊन आमचे स्वागत करण्यात आले.
एकूणच हा लपलेला ज्वलंत इतिहास समाजापुढे, पूर्ण हैदराबाद स्टेट पुढे व देशापुढे आणावा आणि त्याच्यासाठी अनेक राजकीय नेते, इतिहासकार, शोधनिबंधकार, शैक्षणिक संस्थांचे मान्यवर गुरुजन वर्ग तसेच विद्यार्थी यांना देशभरात निमंत्रणे दिली जात आहेत आणि इतिहासाच्या पुस्तकांमध्ये याची नोंद किंवा इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये याविषयी आपल्या पूर्वजांनी केलेल्या या स्वातंत्र्यसंग्रामाबद्दलचे धडे यावेत याच्यासाठी एकूणच ही मोहीम म्हणावी लागेल. येत्या काही दिवसांमध्ये दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी उदगीर येथील श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलामध्ये हे महानाट्य प्रदर्शित होईल. पहिलं वहिले महानाट्य जे की 400 ते 500 विद्यार्थ्यांच्या माध्यमातून साकारले जात आहे आणि आपल्याच मागच्या पिढीचा इतिहास उलगडून जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आपल्या सर्वांच्या सकारात्मक प्रयासाने आपल्या पुढच्या पिढीस आपण समृद्ध ऐतिहासिक वारशाचे बाळकडू नक्कीच देऊ शकू हा विश्वास इथे व्यक्त करतो.
लेखन :सुपोषपाणि आर्य
अध्यक्ष तथा संकल्पक
शामलाल स्मारक शिक्षण संस्था, उदगीर
जिल्हा: लातूर मोबा: 9823271697
अप्रतिम महानाट्य..
या ऐतिहासिक महानाट्याच्या कार्यात सहभागी होण्याची संधी मिळाली,उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद येथेही लेख सादर करण्याची संधी मिळाली .. यानिमित्ताने भरपूर वाचन, लेखन झाले..
खरोखर विद्यार्थीच नाही तर आम्हा शिक्षकांनाही खरा इतिहास सखोलपणे जाणून घेता आला.
महानाट्याचे मुख्य संकल्पक मा.आर्य सरांचे आभार.