लातूर : लातूरच्या शिक्षण क्षेत्रात आपल्या दैदिप्यमान कार्यपध्दतीने आपले स्वतंत्र स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचा बदल अर्ज तब्बल तीन दशकानंतर मंजूर करण्यात आला आहे. या बदल अर्जानुसार संस्थेच्या अधिकृत कार्यकारिणीचे अध्यक्ष म्हणून , संस्थेचे संस्थापक सदस्य एड. सांबप्पा त्रिंबकप्पा गिरवलकर आणि सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांच्या नियुक्तीस उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर लातूरच्या उप धर्मादाय आयुक्तांनी मान्यता दिली आहे.
तब्बल तीन दशकानंतर या संस्थेचा बदल अर्ज मंजूर झाल्याने संस्थेच्या सर्व युनिटच्या कर्मचाऱ्यांनी नूतन कार्यकारिणीचे जल्लोषात स्वागत केले आहे. लातूरच्या शिक्षण क्षेत्रात महत्तम बसवेश्वर शिक्षण संस्थेची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. मात्र मागच्या काही वर्षात संस्थेच्या कार्यकारी मंडळामध्ये असलेल्या अंतर्गत कलहामुळे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून अधिकृत कार्यकारी मंडळास मान्यता दिली जात नव्हती. त्यामुळे नावारूपाला आलेली ही संस्था अक्षरशः डबघाईला येऊन ठेपली होती. पूर्वीच्या कार्यकारी मंडळातील पदाधिकाऱ्यांनी कोणताही कायदेशीर अधिकार व अनुमती नसताना मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून संस्थेचे नुकसान केल्याच्या तक्रारी पुराव्यासह दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने लातूरच्या उप धर्मादाय आयुक्तांना संस्थेचे विद्यमान सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांनी दाखल केलेल्या बदल अर्ज क्रं . ५९६ / २०२१ ला अधिकृत मान्यता देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या शिक्षण संस्थेवर आता पुढीलप्रमाणे अधिकृत कार्यकारी मंडळ सत्तारूढ झाले आहे .
– अँड. सांबप्पा त्रिंबकप्पा गिरवलकर : अध्यक्ष , आदिनाथ बसवंतराव सांगवे : उपाध्यक्ष , माधवराव हनुमंतराव पाटील ( टाकळीकर ) : सचिव, एड. गंगाधर विठ्ठलराव कोदळे : कोषाध्यक्ष, विजय नागनाथराव रेवडकर : सहसचिव, डॉ. बाबू इराप्पा खडकभावी : कार्यकारी संचालक , संचालक सर्वश्री अशोक शरणाप्पा उपासे , सौ. ललिता हावगीराव पांढरे, बसवराज ( राजू ) गुरुपादप्पा येरटे, बाबुराव विठ्ठलराव तरगुडे , प्रदीप विश्वनाथप्पा दिंडीगावे, शिवशंकर वैजनाथप्पा खानापूरे, माधव त्रिंबकराव पाटील ( चिंचोलीकर ), सुनील सिद्रामप्पा मिटकरी , प्रभूप्पा शिवलिंगअप्पा पटणे. संस्थेच्या नूतन कार्यकारी मंडळाचा सत्कार गुरुवारी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांनी भविष्यात संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हे कार्यकारी मंडळ कार्यरत राहील,अशी ग्वाही दिली. मागच्या काही वर्षात संस्थेच्या अनेक युनिटमधील अधिकारी – कर्मचाऱ्यांना कोणत्याही बंधनाशिवाय काम करण्याची सवय लागल्याचे दिसून येते. त्याचे परिणाम संस्थेच्या कामकाजावर झाले आहेत. भविष्यात कोणत्याही प्रकारची बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही. प्रत्येकाने आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी . दैनंदिन कामकाज करताना कोणाची काही अडचण असेल, कोणाचा काही दबाव असेल तर संबंधितांनी तात्काळ कार्यकारी मंडळाशी संपर्क साधावा,असे आवाहनही टाकळीकर यांनी केले.
यावेळी सनदी लेखापरीक्षक तापडिया, शिवशंकर खानापूरे यांनीही आपले विचार व्यक्त केले. संस्थेच्या विविध युनिटप्रमुखांनी आपल्या युनिटचा संक्षिप्त अहवाल सादर केला. संस्थेवर अधिकृत कार्यकारी मंडळ नियुक्त झाल्याबद्दल संस्थेत जल्लोष साजरा करण्यात आला.