इचलकरंजीत यंञमागधारकांच्या बैठकीत निर्णय
इचलकरंजी ; दि. २३ ( प्रतिनिधी ) –– गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत मलमल कापडाला घटलेली मागणी तसेच व्यवसायातील इतर समस्या लक्षात घेऊन मलमल कापडाचे उत्पादन २२ जुलै ते ५ ऑगस्टपर्यंत असे १५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय इचलकरंजी येथे नुकताच झालेल्यायंञमागधारकांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
केंद्राबरोबरच राज्यातील सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे
यंञमाग उद्योग विविध समस्यांच्या गर्तेत सापडला आहे.त्यात कापड उत्पादनाचा वाढता खर्च , कापडाला कमी भाव ,कुशल कामगारांचा तुटवडा ,सूत दराचे वाढते भाव अशा कारणांमुळे यंञमाग उद्योग मेटाकुटीला आला आहे.असे असतानाच बाजारपेठेत मलमल कापडाची मागणी कमालीची घटली आहे.त्यामुळे मलमल कापड उत्पादन करणाऱ्या यंञमागधारकांना हा उद्योग टिकवण्याची चिंता लागून राहिली आहे.त्याच अनुषंगाने
यंत्रमाग उद्योगातील विविध अडचणी संदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मलमल उत्पादक यंञमागधारकांची आज बैठक घेण्यात आली.या बैठकीत विविध यंत्रमागधारकांनी आपले मत व्यक्त करताना आर्थिक नुकसान सहन करुन उद्योग करणे जोखमीचे असून याबाबत सर्वांनी सकारात्मक निर्णय घ्यावा ,असे सुचवले.
या बैठकीतीलचर्चेअंती सध्या मलमल कापडाला घटलेली कमालीची मागणी व इतर अडचणी लक्षात घेवून शहरातील सर्व मलमल कापडाचे उत्पादन १५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच या १५ दिवसामध्ये बाजारपेठेतील परिस्थिती सुधारली नाही तर अनिश्चित काळासाठी कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला सर्व उपस्थित यंञमागधारकांनी एकमताने पाठिंबा दिला
सदर बैठकीला बाळकृष्ण पोवळे, प्रदिप धोतरे, जितेंद्र बुगड, विजय नाकील, पंढरीनाथ कांबळे, उदय पाटील, सर्जेराव नलवडे. सचिन कवडे यांच्यासह मलमल कापड उत्पादक यंञमागधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.