मराठी साहित्य परिषद हैदराबाद तर्फे भव्य प्रकाशन समारंभ
” ताई ” या इंग्रजीत अनुवादित केलेल्या पुस्तकाचे विमोचन .
पंचधारा ग्रंथालय विशेषांक प्रकाशित.
पद्मभूषण सुमित्राताई महाजन, लोकसभेच्या अध्यक्ष असतांना , त्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी मेधा किरीट यांनी तीन वर्षांपुर्वी ” ताई ” हे पुस्तक मराठीत लिहिले होते. या पुस्तकाची सततची वाढती मागणी बघता, जगभरातील सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या पुस्तकाचा शर्मिला भागवत यांनी इंग्रजीत अनुवाद केला. या इंग्रजी पुस्तकाचा विमोचन सोहळा, माजी उपराष्ट्रपती श्री. व्यंकय्याजी नायडू यांच्या हस्ते, पद्मभूषण सुमित्राताई महाजन यांंच्या विशेष उपस्थितीत व लेखिका मेधा किरीट या हजर असतांना, मराठी साहित्य परिषद तेलंगणा यांनी ९ एप्रिल २०२३ रोजी केशव मेमोरियल शिक्षण संस्था, हैदराबाद मधे आयोजित केला होता.
कार्यक्रमाची सुरवात अर्चना अचलेरकर यांच्या सुरेल सरस्वती वंदनेने झाली.डॉ.विद्या देवधर, अध्यक्ष मराठी साहित्य परिषद तेलंगणा यांनी आपल्या भाषणात प्रथम पाहुण्यांचे स्वागत करून, मराठी साहित्य परिषदेचा, 1958 मधील स्थापने पासूनचा सविस्तर इतिहास विदीत केला. परिषदेच्या कार्याची माहिती देतांना त्यांनी पंचधारा या त्रैमासिकाचा विशेषत्वाने उल्लेख केला व म्हणाल्या भारतीय भाषांतील उत्तम साहित्याचा परिचय मराठी वाचकांना करून देण्याचे इच्छेने पंचधारा ने आतापर्यंत विविध विषयांवरील 75 विशेषांक प्रकाशित केले आहेत. गझल विशेषांक व शंकर रामाणी विशेषांकाचा त्यांनी उल्लेख केला.
त्या आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या , मराठी ग्रंथ संग्रहालय हैदराबाद ही संस्था तिच्या स्थापनेचे शतक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत त्या निमित्ताने ग्रंथ संग्रहालयाचा , साहित्य परिषदेला वाटणारा आदर व्यक्त करण्यासाठी म्हणून हा ग्रंथालय विशेषांक (ऑक्टबर 22-मार्च2023) आम्ही प्रसिद्ध करीत आहोत. या ग्रंथालय विशेषांकतील २८ लेखातून इ.स. पुर्वी पासुन ते आजतागायतच्या भारतातील अनेक शहरातील सर्व मोठ्या ग्रंथालयां विषयीची माहिती आपल्याला मिळेल तसेच परदेशातील काही ग्रंथालयांची सुद्धा माहिती मिळेल.ग्रंथालय शास्त्र, डॉ.रंगराजन यासंबंधी लेख आहेत. परिषदेने प्रकाशित केलेले विविध,मराठी व अन्य ५५ ग्रंथ, समग्र सेतुमाधवराव पगडी प्रकल्प आदी माहिती दिली.
मराठी साहित्य परिषद, स्थापने पासुन मराठी महाविद्यालय चालवत होते असे नमुद करून पण सद्य परिस्थितीत, सरकारने या महा विद्यालयाचे अनुदान बंद केल्याने हे महाविद्यालय बंद करावे लागणार याची डॉ.देवधर यांनी खंत व्यक्त केली.
विद्याताई देवधर यांनी सुमित्राताई यांचा यथोचित सन्मान केला. सुमित्राताई यांनी व्यंकय्याजी तसेच मेधाजी यांचा यथोचित सन्मान केला.
याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षे ज्यांनी निस्वार्थ पणे कार्य केले अशा डॉ.न.गो. राजुरकर, डाॅ.गौरीशंकर पळनीटकर, ॲडव्होकेट नारायणराव देशपांडे व सुशिलाताई महाजन यांचा सत्कार, माननीय व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आला.
” ताई ” या इंग्रजीत भाषांतर केलेल्या पुस्तक, तसेच पंचधारा ग्रंथालय विशेषांक यांचे विमोचन, व्यंकय्याजी यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी मराठी साहित्य परिषदेच्या लोगो चे अनावरण करण्यात आले व हा लोगो ज्यांनी डिझाईन केला त्या प्रकाश धर्म यांचा सत्कार करण्यात आला.
मराठी ग्रंथ संग्रहालय हैदराबाद या संस्थेच्या वतीने , विवेक देशपांडे यांनी व्यंकय्याजी, सुमित्राताई व मेधाजी यांचा सन्मान केला.
मेधाजी आपल्या भाषणात म्हणाल्या ” ताई ” हे पुस्तक सुमित्राताई यांचे चरित्र नसून त्या लोकसभा अध्यक्ष म्हणून काम करीत असतानाच्या, त्यांची आदर्श कार्य पध्दत विदित करणारे पुस्तक आहे. त्यांच्या कार्य काळात त्यांना आलेल्या अडचणी व त्या त्यांनी समर्थपणे कशा हाताळल्या व सोडवल्या यांची सविस्तर माहिती या पुस्तकात आहे व म्हणून हे पुस्तक आपण सर्व जरूर वाचा.
सुमित्राताई यांनी आपल्या भाषणात, त्या लोकसभेच्या अध्यक्ष असतांना व्यंकय्यांजी राज्यसभेचे अध्यक्ष होते हे सांगितले. आम्ही दोघांनी अनेक विषय लोकसभेत व राज्यसभेत कसे हाताळले व सोडवले हे विदीत केले.
त्या म्हणाल्या मला “ताई” इंग्रजीत भाषांतर केलेल्या पुस्तकाचे विमोचन फक्त आणी फक्त व्यंकय्याजी यांच्याच हस्ते करायचे हे पक्के होते , हा योग मराठी साहित्य परिषद तेलंगणाच्या डॉ. विद्याताई व कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी जुळवून आणला म्हणून मी त्या सर्वांची , अत्यंत आभारी आहे.
व्यंकयाजी यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात पहिली दोन वाक्ये मराठीत बोलुन केली. ते म्हणाले, सुमित्राताई व माझा संबंध भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून गेल्या तीस वर्षाहून ही अधिकचा आहे. त्यांची कार्य पध्दत ही अतिशय आदर्शवत आहे व म्हणून प्रत्येकानी ती स्वीकारायला हवी.
सुमित्राताई या राष्ट्र सेविका समितीच्या मुशीतून घडलेल्या आहेत. समितीची त्रिसूत्री आहे मातृत्व, कर्तृत्व व नेतृत्व. ही त्रिसूत्री सुमित्राताई सदैव आचरणात आणणात हे त्यांचे वैशिष्ट्य.
आजच्या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकाची लेखिका मेधा व अनुवादक शर्मिला हया महिला , ज्यांच्यावर पुस्तक लिहिले त्या सुमित्राताई स्री, ज्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले त्या विद्याताई स्री. त्यामुळे आजच्या कार्यक्रमातून मला स्री शक्तीचा अनुभव मिळतो आहे.
भाषणात व्यंकय्याजी पुढे म्हणाले सुमित्राताई ज्यावेळी लोकसभेच्या अध्यक्ष म्हणून काम करीत होत्या त्याच वेळी मी राज्यसभेचा अध्यक्ष असल्याने आमची अनेक प्रश्नांवर चर्चा व्हायची व त्यातूनच आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर मिळायची.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करतांना ते म्हणाले मतभेद जरूर असावेत पण मनभेद नसावेत. कुठल्याही गोष्टीवर अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चर्चा ही व्हायचाच हवी पण त्यानंतरचा निष्कर्ष सर्वांना मान्य असायलाच हवा, पण सध्या तसं होतांना दिसत नाही ही लोकशाही साठी चांगली गोष्ट नाही. विरोध असावा पण शत्रुत्व नसावे.
त्यांनी मातृभाषेतून शिक्षण घेण्याचे, अनेकांचे अनुभव विदित केले व त्याचे महत्त्व पटवून दिले.
भाषणात ते म्हणाले सुमित्राताई या लागोपाठ 8 वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. इंदोर शहराला त्यांंनी 5 वेळा स्वच्छ शहर हा पुरस्कार मिळवून दिला आहे.
व्यंकय्याजी यांनी त्यांच्या भाषणात हैदराबाद मधील महाराष्ट्रातील लोकांमुळे हे राज्य सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न झाले असे सांगितले. तसेच येथे तीस हून अधिक मराठी संस्था कार्यरत आहेत असे त्यांना समजले असल्याचे सांगितले . त्यातील काही संस्थांचा उल्लेख ही त्यांनी आपल्या भाषणात केला. भाषणाची सुरुवात व शेवट मराठीतून त्यांनी केला हे विशेष उल्लेखनीय गोष्ट.
शैैलजाताई जोशी ,सचिव मराठी साहित्य परिषद तेलंगणा यांनी आभार प्रदर्शन केले.
व्यंकटेश कुलकर्णी व उज्ज्वला धर्म यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाखाणण्यासारखे केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
- अरूण डवलेकर