मुंबई ; दि. १६ ( प्रतिनिधी) —मराठी कर्तुत्ववान व्यक्ती देशातच नव्हे तर परदेशात जाऊन आपल्या कार्याने आज यशस्वी झाल्या आहेत त्यामुळे मराठी माणूस मागे नाही तर,आळशी मराठी माणूस मागे असून धाडशी मराठी माणूस जगाच्या विविध भागात जाऊन आपले कर्तृत्व सिद्ध करीत आहे
आणि त्याचबरोबर मराठी भाषेच्या संवर्धनाचेही काम तो करत आहे. अशा व्यक्तींच्या ओळखींतूनच आपल्यात आत्मविश्वास निर्माण होईल असा विश्वास न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ यांनी ठाणे येथे बोलताना व्यक्त केला. ते मेघना साने लिखित ‘मराठी सातासमुद्रापार’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी ज्येष्ठ संपादक, अर्थतज्ज्ञ डॉ उदय निरगुडकर हे होते.
श्री भुजबळ पुढे म्हणाले की, “मराठी सातासमुद्रापार ” या प्रेरणादायी पुस्तकातील यशकथा केवळ पुस्तकापूर्त्याच बंदिस्त न राहता,त्या शॉर्टफिल्म्स च्या माध्यमातून प्रसारित होणे गरजेचे असून त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
दुसऱ्या प्रमुख पाहुण्या कवयित्री प्रा. प्रतिभा सराफ यांनी पुस्तकावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. ‘मराठी सातासमुद्रापार’ या पुस्तकाने कर्तुत्ववान मराठी व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यांच्या मराठी भाषा, गीत, संगीत, कला आणि कार्य तसेच वृत्तीतील बारकावे यात टिपले आहेत. या सकारात्मक लेखांतून मेघना साने यांची परदेशातील मराठी व्यक्ती यांच्याबद्धलची जाण, चौफेर ज्ञान यांची जाणिव होत असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षपदावरून बोलताना ज्येष्ठ संपादक डॉ. उदय निरगुडकर म्हणाले की,
परदेशात मराठी माणूस भेटल्यावर मराठीत बोलतो हाच खरा आनंद. मातृभाषा आपुलकी जपते. आपल्या भाषेत बोलणे ही सांस्कृतिक ओळख होय. नवनिर्मितीची प्रेरणा मातृभाषेतूनच मिळते म्हणून मराठी भाषा टिकली पाहिजे.
लेखिका मेघना साने , आपल्या मनोगतात म्हणाल्या की,परदेशात “गप्पागोष्टी”,”कोवळी उन्हे” हे आपले कार्यक्रम सादर करताना,तेथील व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याने प्रभावित झाल्याने हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुदेश हिंगलासपुरकर म्हणाले की, माणसात वावरत असतानाही लेखकाच्या अंतर्मनात लेखन चालू असते.यातूनच मराठी भाषा आणि संस्कृतीचे इतर देशात जतन कसे केले जाते याची ओळख ‘मराठी सतासमुद्रापार’ या पुस्तकाने करून दिली आहे.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, लेखिका मोनिका ठक्कर, व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे, चित्रकार सतीश भावसार, लेखिका अनुराधा नेरूरकर आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला .
पुस्तकातील काही लेख न्यूज स्टोरी टुडे पोर्टलवर यापूर्वी प्रसिध्द झाले असल्याने पोर्टलच्या सह संपादक अलका भुजबळ यांनी
न्यूज स्टोरी टुडे चा आकर्षक “मग” देऊन लेखिका मेघना साने यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वृत्तनिवेदिका स्नेहा आघारकर यांनी छान केले.
या शानदार कार्यक्रमास आकाशवाणीचे निवृत्त सहायक संचालक भूपेंद्र मिस्त्री, कोमसाप मुंबई उपनगरचे माजी अध्यक्ष शिवाजी गावडे,कवी कमलाकर राऊत, चित्रकार रामदास खरे, कवी विकास भावे यांच्यासह अनेक मान्यवर ,साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.