32.1 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeजनसंपर्क*मराठी पत्रकार परिषद पत्रकारांसाठी एक कोटींचा निधी उभारणार, एस.एम.देशमुखांची मोठी घोषणा*

*मराठी पत्रकार परिषद पत्रकारांसाठी एक कोटींचा निधी उभारणार, एस.एम.देशमुखांची मोठी घोषणा*

मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची पुण्यात उत्साहात बैठक

पुणे : ( विशेष प्रतिनिधी) –‘कोरोना काळानंतर अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच कोरोनानंतर पत्रकारांची आर्थिक परिस्थिती चिंतनाचा विषय झाला आहे. आरोग्यासह इतर प्रश्नांसाठी अनेकदा पत्रकारांना मदतीची गरज भासते. अशावेळी प्रत्येकवेळी आपण पत्रकारांना मदत करू शकू, अशी परिस्थिती नसते. त्यामुळे आता पत्रकारांनी स्वतःसाठी काही तरी करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुसार आता लवकरच गरजवंत पत्रकारांसाठी पत्रकारांकडून मदत निधी उभारण्याचा अनोखा उपक्रम मराठी पत्रकार परिषदेच्या मार्फत हाती घेण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी पत्रकार परिषद पत्रकारांसाठी एक कोटींचा निधी उभारणार आहे’ अशी घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे.
याप्रसंगी परिषदेचे मुख्य विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, राज्य सरचिटणीस मन्सुरभाई शेख, पुणे विभागीय सचिव नाना कांबळे आदींची व्यासपीठावर उपस्थित होती.


याप्रसंगी राज्य सरकारच्या अधिस्विकृती समितीवर नियुक्त झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या १६ सदस्यांचा, तसेच मराठी पत्रकार परिषदेचे विविध मेळावे, उपक्रम यशस्वी करणाऱ्या जिल्हा संघांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला मुंबई, पुणे, गडचिरोली, भंडारा, नागपूर, धुळे, अमरावती, बीड, लातूर, जळगाव, जालना, परभणी, नगर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, यवतमाळ, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड यासह ३६ जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
‘राज्यभरामध्ये कोणत्याही पत्रकाराला अडचणीच्या काळात जेव्हा मदतीची गरज भासते, तेव्हा प्रत्येकवेळी मराठी पत्रकार परिषद स्वतः पुढाकार घेत त्याला मदत करण्याचा प्रयत्न करीत असते. पत्रकारांसाठी असलेल्या पेन्शन योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील जास्तीतजास्त पत्रकारांना मिळावा, यासाठी परिषदचे पदाधिकारी प्रयत्न करीतच असतात. पण त्यापेक्षाही आता पत्रकारांनी स्वतःसाठी काही तरी करण्याची गरज निर्माण झाली असून त्यामधूनच ‘पत्रकारांसाठी मदत निधी’ उपक्रम सुरू करण्यात येत आहे,’ असे सांगून एस.एम.देशमुख पुढे म्हणाले, ‘पत्रकारांसाठी उभारण्यात येणाऱ्या या मदत निधीमध्ये आपण मराठी पत्रकार परिषदेसंबंधी असलेल्या प्रत्येक पत्रकाराला एक हजार रुपये निधी देण्याची विनंती करणार आहोत. हा निधी ऑनलाइन स्वरुपात थेट अकाउंटमध्ये जमा करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. अशा निधीतून किमान एक करोड रुपये जमा करण्यात येतील, व त्यामाध्यमातून वर्षाला मिळणाऱ्या ७ ते ८ लाख रुपये व्याजातून किमान २० ते २५ पत्रकारांना मदत करण्याचे नियोजन आहे. या उपक्रमासाठी मराठी पत्रकार परिषद स्वतः पाच लाख रुपये जमा करीत आहे. बीड जिल्हा पत्रकार संघाने सुद्धा एक लाख रुपये जमा करण्याची तयारी दाखवली आहे. मी स्वतः अकरा हजार रुपये देणार आहे. प्रत्येक जिल्हा संघाने किमान ३ लाख रुपये व तालुका संघांनी किमान १ लाख रुपये जमा करावेत, अशी अपेक्षा आहे. हे पैसे जमा झाल्यानंतर त्यासंबंधीचे व्यवहार अतिशय पारदर्शी राहतील. एका क्लिकवर सर्वांना मदत निधीबाबत माहिती मिळेल, यादृष्टीने ही योजना राबवण्यात येणार असून त्यासाठी लवकरच एक तज्ज्ञ कमिटी नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे जे पत्रकार एक हजार रुपयांचा मदत निधी देतील, त्यांनाच या निधीमधून मदत दिली जाणार आहे. प्रत्येक पत्रकाराला वाटले पाहिजे की, हा आपल्या हक्काचा पैसा आहे, त्यामुळेच या योजनेत प्रत्येक पत्रकाराला सहभागी होता यावे, यादृष्टीने तिचे नियोजन करण्यात आले आहे,’ असेही देशमुख म्हणाले.


‘आगामी काळात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती अधिक सक्षम करण्याची गरज आहे. सध्या मराठी पत्रकार परिषदेचा डिजिटल मिडिया विभाग सुद्धा चांगले काम करीत आहे. या माध्यमातून १६ जिल्ह्यामध्ये डिजिटल मिडियाच्या शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. डिजिटल मिडियाचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे त्यासाठी प्रयत्नशील आहेत. आगामी काळात डिजिटल मिडियाला सोबत घेऊनच आपल्याला काम करावे लागणार आहे,’ असेही ते देशमुख यांनी सांगितले.
मुख्य विश्वस्त किरण नाईक म्हणाले, ‘मराठी पत्रकार परिषद ही संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक दोन ते तीन महिन्यात बैठक घेण्याची गरज आहे. परिषदेची चळवळ ही महाराष्ट्रभर वाढवण्यावर आगामी काळात भर देण्याची गरज असून त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रयत्न करावेत. जिल्हा व तालुका संघ हे सक्षम करावे लागणार असून त्यादृष्टीने काम सुरू करावे. परिषदेच्या राज्य कार्यकारिणीकडून जे काही उपक्रम राबवण्यात येतील, ज्या काही सूचना जिल्हा व तालुका पातळीला येतील, त्या सूचनांची, उपक्रमांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर करावी. त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने पुढाकार घ्यावा. पत्रकारांनी संघटीत झाल्यानंतर त्यांची ताकद खूपच मोठी असते, हे नेहमी दिसून आले आहे. तुम्ही संघटीत राहा, आम्ही २४ तास तुमच्या सोबत आहोत. तुमच्या मदतीसाठी पुढाकार घेऊ,’ अशी ग्वाही नाईक यांनी दिली.
प्रास्ताविक करताना अध्यक्ष शरद पाबळे यांनी सांगितले की, ‘अधिस्विकृती समितीमध्ये सर्वात जास्त नावे मराठी पत्रकार परिषदेची आहेत, ही अभिमानाची बाब आहे. राज्यात सर्वात मोठे नेटवर्क परिषदेचे आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. आपल्या परिषदेमध्ये योग्य व्यक्तीला योग्य वेळी संधी देण्याचे काम केले जाते. परिषदेने आपल्याला काय दिले, यापेक्षा आपण परिषदेला काय देतो, याचा विचार प्रत्येक पदाधिकाऱ्याने करणे महत्त्वाचे आहे. परिषद नेहमीच योग्य व्यक्तीला, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला संधी देत असते.’
कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर म्हणाले की, ‘परिषदेचा एक कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत मी काम करीत आलो आहे. परिषदेने खूप काही दिलं आहे. आपण चांगल्या संस्थेसोबत जोडले गेलो आहोत, याचा अभिमान बाळगला पाहिजे. परिषदेसाठी जास्तीतजास्त चांगल काम कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करा.’
याप्रसंगी राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत विविध विषयांवर मत मांडताना चर्चेमध्ये सहभाग घेतला. राज्यभरातील पदाधिकाऱ्यांकडून आलेल्या सूचनांची योग्य दखल घेतली जाईल, असे बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सुरभाई शेख यांनी सांगितले. सूत्रसंचालन परिषदेच्या उपाध्यक्षा जान्हवी पाटील यांनी केले तर पुणे जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर यांनी आभार मानले.
……………


महाराष्ट्रात २५ तरुणांची टीम तयार करणार

‘मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात तरुण पत्रकारांची एक टीम तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून परिषदेची दुसरी फळी तयार करण्याचे काम सुद्धा होईल. ही टीम म्हणजे परिषदेची एक देखरेख करणारी यंत्रणा असणार आहे. प्रत्येक जिल्ह्याने या टीमसाठी नावे सूचवण्याची गरज आहे. ही टीम तयार झाल्यानंतर त्यांना ट्रेनिंग देण्याचे काम परिषदेतील ज्येष्ठ मंडळी करतील. जेणेकरून परिषदेचे काम सध्या सुरू आहे त्यापेक्षा चांगले करण्यासाठी ही टीम यशस्वी होईल,’ असेही एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले.
…..

संदीप कुलकर्णी व भरत निगडे यांची निवड

मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी संदीप कुलकर्णी व सह राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी भरत निगडे यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा यावेळी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशुमख यांनी केली. देशमुख म्हणाले, ‘परिषदेचा प्रसिद्धी विभाग अतिशय सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. यापूर्वी परिषदेच्या राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी अनिल महाजन हे काम पाहत होते. परंतु त्यांना आता औरंगाबाद विभाग अधिस्विकृती समितीवर संधी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य प्रसिद्धीप्रमुख पद रिक्त झाले होते. आता या पदावर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून संदीप कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात येत आहे. तर, सह राज्य प्रसिद्धीप्रमुख म्हणून भरत निगडे यांची नियुक्ती करण्यात येत आहे.’
…..

अधिस्विकृती समितीवर निवड झालेल्या मान्यवरांचा सन्मान

राज्य अधिस्वीकृती समितीवर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, महिला उपाध्यक्षा जान्हवी पाटील यांची नियुक्ती नुकतीच झाली. तर, विभागीय अधिस्वीकृती समित्यांमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या दिपक केतके (मुंबई विभाग), अनिल महाजन (औरंगाबाद विभाग), विजयकुमार जोशी (लातुर विभाग), हर्षद पाटील (कोकण विभाग), विजयसिंह होलम (नाशिक विभाग), गजानन नाईक (कोल्हापूर विभाग), राजेंद्र काळे (अमरावती विभाग), अविनाश भांडेकर (नागपूर विभाग), हरिष पाटणे व चंद्रसेन जाधव (पुणे विभाग), संजय पितळे (ठाणे), या ११ जणांची नियुक्ती झाली आहे. यासर्वांचा सन्मान बैठकीमध्ये करण्यात आला. याशिवाय मुंबई येथील पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी केल्याबद्दल मराठी पत्रकार परिषद मुंबई, कर्जत (जि.अहमदनगर) येथील राज्यस्तरीय तालुकाध्यक्ष मेळावा यशस्वी केल्याबद्दल मराठी पत्रकार परिषद, अहमदनगर जिल्हा, बीड येथील पत्रकार मेळावा यशस्वी केल्याबद्दल मराठी पत्रकार परिषद, बीड जिल्हा यांचाही सन्मान करण्यात आला.
………….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]