17.2 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeसाहित्य*मराठी :अभिजात दर्जा मिळाला. पुढे काय ?*

*मराठी :अभिजात दर्जा मिळाला. पुढे काय ?*

प्रासंगिक

माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेहि पैजासी जिंके….’ असं मराठी भाषेचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी केलं आहे. अशा या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ,ही गेल्या कित्येक वर्षांपासून असलेली मराठी माणसाची रास्त मागणी अखेर भारत सरकारने नुकतीच मान्य केल्याबद्दल सरकारचे मनःपूर्वक आभार.

ही मागणी मान्य झाल्याने नेमके काय फायदे होणार आहेत, तसेच मराठी भाषेला वैश्विक भाषा करण्यासाठी शासनाने,विविध संस्था आणि आपण काय केले पाहिजे, याचा उहापोह या लेखात करण्यात आला आहे.

भारत सरकारने मराठी बरोबरच पाली, प्राकृत, आसामी व बंगाली या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय ३ऑक्टोबर २०२४ रोजी जाहीर केला.

भारत सरकारने यापूर्वी २००४ मध्ये तमिळ, २००५ मध्ये संस्कृत,२००८ मध्ये कन्नड आणि तेलुगू , २०१३ मध्ये मल्याळम आणि २०१४ मध्ये ओडिया या प्रमाणे या भाषाना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

तेव्हा पासूनच २००० वर्षांपूर्वीचा इतिहास असलेल्या मराठी भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यासाठी
महाराष्ट्र शासनाने प्रा रंगनाथ पठारे समिती स्थापन केली होती.

अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी चार निकष लावले जातात .

१) संबंधित भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान १५००-२००० वर्षे प्राचीन असावा.

२) या भाषेतील प्राचीन साहित्य हे महत्वाचे, मौल्यवान असावे.

३) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.

४) प्राचीन भाषेचे स्वरुप हे सध्याच्या भाषेपासून वेगळे असावे.

आता भारत सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे.या शिवाय अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने पुढील प्रमाणे फायदे होतील.

१)अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.

२) अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येतं.

३) प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला,यातच
मराठी माणसाने खुश न राहता
मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारात जास्तीतजास्त वापर कसा वाढेल,केवळ महाराष्ट्रातील दोन मराठी माणसेच एकमेकांशी मराठीत न बोलता जगभरातील मराठी माणसे एकमेकांशी मराठीत बोलतील हे पाहिले पाहिजे, मराठी शाळा वाचविण्याबरोबरच त्यांचा दर्जा सतत कसा वाढता राहील या साठी सातत्याने प्रयत्न झाले पाहिजेत, आज प्रसार माध्यमातूनही शुध्द मराठी हद्दपार होत चालली आहे,तर तसे होऊ नये म्हणून पूर्वी जसे मुद्रित शोधक होते तसे तरी आता नव्याने भरती केले पाहिजेत, किंवा प्रत्येक माध्यमकर्मीने शुध्द मराठी लिहिण्याकडे,बोलण्याकडे कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे, मराठीतील साहित्य हे केवळ इंग्रजीच नव्हे तर इतर भारतीय ,परकीय भाषांमध्ये मोठ्या प्रमाणात अनुवादित झाले पाहिजे, संगणकातील सर्व सॉफ्टवेअर मराठीत असले पाहिजेत, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले मराठी भाषेचे विद्यापीठ जलद गतीने पुढे गेले पाहिजे अशा या सर्व बाबींचा समावेश करून महाराष्ट्र शासनाने आणि मराठी भाषा, साहित्य, संस्कृती,विविध संस्था,व्यक्ती अशा सर्वांनी राजकीय मतभेद टाळून एकदिलाने मराठी भाषेचे नवे धोरण त्वरीत तयार करून त्याची तितक्याच ताकदीने,कालबध्द रित्या अंमलबजावणी होईल,असे पाहिले पाहिजे.

शेवटी मराठी भाषा ही भारतात चौथ्या तर जागतिक क्रमवारीत एकोणिसाव्या क्रमांकावर आहे,याचा अभिमान बाळगून ती खरोखरच जागतिक भाषा होईल,यासाठी आपण सर्व कटिबध्द होऊ या.


लेखन:देवेंद्र भुजबळ
☎️9869484800

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]