24 C
Pune
Monday, December 23, 2024
Homeलेख*मराठवाड्याच्या ध्वजस्तंभास ‘अभंग’ची मानवंदना!*

*मराठवाड्याच्या ध्वजस्तंभास ‘अभंग’ची मानवंदना!*

प्रस्तुत ग्रंथामध्ये लेखक अनंतराव भालेराव यांनी हा ग्रंथ लिहिण्यामागची भूमिका आपल्या प्रस्तावनेच्या माध्यमातून मांडली होती. तसेच पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशन संस्थांतर्फे गोविंदभाई ऑफ आणि राधाकिशन जायस्वाल यांनीही संयुक्तपणे प्रकाशनामागची भूमिका स्पष्ट केली होती. प्रस्तावना आणि पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशकांचे निवेदन या नव्या आवृत्तीतही पुढील पृष्ठांवर उपलब्ध असल्यामुळे नव्या वाचकांना या ग्रंथाचे प्रयोजन त्यातून लक्षात येईल. अनंतराव भालेराव यांनी आपल्या प्रस्तावनेचा समारोप करताना हैदराबादच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासावर पुष्कळ संशोधन होण्याची गरज आहे, असे नमूद केले होते पण त्यांनी लिहिलेल्या या ग्रंथाला ४० वर्ष पूर्ण होत आली तरी त्याबाबतीत लक्षणीय असे काम झाले नाही ही खंत व्यक्त करणे आवश्यक आहे.

नांदेड येथील दर्पण प्रतिष्ठान चे कार्यवाह संजीव कुळकर्णी यांनी, अभंग पुस्तकालयाच्या सहकार्याने मे २०११ मध्ये प्रथम व जुलै २०११ या एकाच वर्षी दुसरी आवृत्ती प्रसिध्द केली. आज या खंडाची एकही प्रत शिल्ल्क नाही.लवकरच या व्दिखंडाची नवीन आवृत्ती प्रस्तावित आहे.

स्वातंत्र्योत्तर काळातील ध्येयवादी मराठी पत्रकारांतील एक अग्रणी आणि मराठवाडा दैनिकाचे माजी संपादक अनंत (अण्णा) भालेराव यांच्या निधनास ३२ वर्षे लोटली आहेत. आजही मराठवाडयातील पत्रकारिता आणि बहुतांश पत्रकारांवर भालेराव आणि ‘मराठवाडा’ च्या पत्रकारितेचा प्रभाव कायम आहे.

अनंतरावांनी संपादक, पत्रकार या नात्याने अनेक विषय, अनेक प्रश्न हाताळले. जेथे जेथे मराठवाडयावर अन्याय झाला तेथे तेथे त्यांची लेखणी पेटून उठली. त्याच वेळी विभागातील अनेक शैक्षणिक, साहित्यिक भूमिकाही त्यांनी समर्थपणे पार पाडली. त्यातून त्यांचा एक चाहता वर्ग तयार झाला. अनंतरावांचे लिखाण, सडेतोड विचार आणि त्यांतील रोखठोक भूमिका स्वातंत्र्योत्तर काळातील दोन पिढयांसमोर आली. त्यातील हजारो वाचक त्यांच्या लिखाणाचे चाहते झाले.

अनंतरावांची जीवनयात्रा १९९१ मध्ये थांबण्यापूर्वी त्यांच्या नावावर आलो याचि कारणासी ( अग्रलेख संग्रह ), पेटलेले दिवस ( हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रमातील आठवणी), पळस गेला कोकणा ( प्रवास वर्णन ), हैदराबाद स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा (चळवळीचा इतिहास ), कावड ( स्तंभलेखातील काही लेख ), स्वामी रामानंद तीर्थ यांचे चरित्र इत्यादी महत्वाची पुस्तकं प्रसिध्द झाली होती. ही सर्व ग्रंथसंपदा १९८४ ते १९९० या पाच वर्षात प्रकाशित झाली होती. ‘मांदियाळी’ हे वाचकप्रिय पुस्तक त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले.

अनंतरावांची बहुतांश ग्रंथसंपदा पुढे मुद्रणबाह्य झाली आणि ‘मराठवाडा’ बंद पडल्यामुळे त्यांचे विचारधन नव्या वाचकांपुढे येऊ शकले नाही. मराठवाडयात आजही विविध संस्थांकडून अनंतराव भालेराव(अण्णा)चीं स्मृती जागविण्यायाठी काही उपक्रम होतात.अशाच संस्थांपैकी नांदेडच्या दर्पण प्रतिष्ठान व अभंग पुस्ताकालयाच्या माध्यमातून अनंत भालेराव यांची प्रकाशित पुस्तके (हैदराबादच्या स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा हा ग्रंथ वगळून ) आणि अनंत भालेरावांनी विविध नियतकालिकांत लिहिलेले महत्त्वाचे पण ग्रंथबध्द न झालेले लेख संकलित करुन ‘ समग्र अनंत भालेराव ‘ हे दोन खंड प्रसिध्द करण्यांत आले.

ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांची ‘दोन कॉलमी उत्कटता’ या मथळयाखालील अभ्यासपूर्ण, विवेचक प्रस्तावना ही या ग्रंथाची जमेची बाजू आहे. अनंतरावांच्या समग्र साहित्याचे विवेचन करताना निशिकांत भालेराव यांनी अनंतरावांचा मुलगा असण्यापेक्षा त्रयस्थ पत्रकाराच्या भूमिकेतून केलेले भाष्य वाचकांना भावते.

‘समग्र अनंत भालेराव’ या व्दिख्ंडातील पहिल्या खंडात अनुक्रमे पेटलेले दिवस, आलो याचि कारणासी, स्वामी रामानंद तीर्थ, पळस गेला कोकणा या पुस्तकांसह संकीर्ण या प्रकरणात अनंतरावांचे काही अप्रकाशित लेख समाविष्ट केले आहेत. अनंत भालेराव यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवणारी माहिती ‘अनंत भालेराव : जीवनपट’ या विभागात समाविष्ट आहे. अनंतरावांनी दैनिक निघण्यापूर्वी पानांची रचना कशी असावी याचे स्वहस्ताक्षरात केलेले प्रोफाईलिंग या खंडाच्या अखेरच्या प्रकरणात दिले आहे. आरंभी काही मोजकीच पण ऐतिहासिक दस्तावेज मूल्य असणारी छायाचित्रे आहेत.

‘समग्र अनंत भालेराव’ या व्दिखंडातील दुस-या खंडात प्रामुख्याने कावड, मांदियाळी या पुस्तकांचा समावेश आहे. संकीर्ण या प्रकरणात अनंतरावांचे अप्रकाशित लेख आहेत. आसावले मन… या प्रकरणात अनंतरावांबद्दल त्यांचे समकालीन व मित्रांनी तसेच मराठवाडा दैनिकातील संपादकीय विभागातील सहकाऱ्यांनी लिहिलेले लेख आहेत.

अनंत भालेराव यांचे अखेरपर्यंत वास्तव्य असणाऱ्या ‘५, सन्मित्र कॉलनी- औरंगाबाद’ या घरास ‘समग्र अनंत भालेराव’ हे व्दिखंड अर्पण करण्यांत आले आहे. प्रारंभीची अर्पणपत्रिका भावपूर्ण आहे.
वृत्तपत्रांच्या इतिहासात मराठवाडा वृत्तपत्राचे स्थान अत्यंत महत्त्वाचे नि मोलाचे आहे.

आरंभी साप्ताहिक, नंतर अर्धसाप्ताहिक असे स्वरूप धारण करणाऱ्या ‘मराठवाडा’चे १९६८ मध्ये दैनिकात रूपांतर झाले. १९७० ते ८० हे दशक म्हणजे ‘मराठवाडा’च्या वाटचालीतील ‘सोनेरी पर्व’ होय. एका प्रादेशिक वृत्तपत्राचा प्रभाव किती जबरदस्त असतो आणि लेखणीची ताकद काय असते, याचा वस्तुपाठ अनंतराव आणि ‘मराठवाडा’ने घालून दिला. एक प्रादेशिक पत्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जनतेच्या हितासाठी किती परखड भूमिका घेऊ शकते, हे अनंतरावांनी त्याकाळात लेखणीतून आणि प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. अनंतरावांचे वृत्तपत्रीय लेखन केवळ प्रादेशिक प्रश्नांपुरते मर्यादित नव्हते. राज्य तसेच देश पातळीवरील घटना घडामोडींवर त्यांनी अत्यंत रोखठोक भाष्य केले. इतकेच नव्हे, तर राज्य व देश पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भात ‘मराठवाडा’ची भूमिका काय, याबद्दल त्यांनी सामान्य वाचक, राज्यकर्तेव राजकीय अभ्यासकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली. प्रादेशिक पातळीवरच्या अन्य कोणत्याही वृत्तपत्राच्या बाबतीत असे घडले नाही. अनंतरावांच्या निधनानंतर गोविंदराव तळवलकर यांनी ‘मराठवाडा’ सारख्या प्रादेशिक पत्राच्या या व्यापक भूमिकेची गौरवपूर्ण नोंद करताना त्याची तुलना ‘मॅन्चेस्टर गार्डियन’शी केली होती. एकेकाळी या पत्राने इंग्लंडमध्येच नव्हे तर बाहेरच्या देशांतही आदराचे स्थान प्राप्त केले होते. अनंतरावांचे कार्यकर्तृत्व आणि जनमानसातील त्यांचे स्थान स्पष्ट करण्यासाठी गोविंदरावांनी दिलेला दाखला म्हणूनच महत्त्वाचा होता.

न्या. चपळगावकर यांच्यामुळे एका ध्येयवादी संपादकाच्या चरित्राचे प्रकाशन करण्याचा मान ‘अभंग’ला मिळाला. या पुस्तकाच्या प्रारंभी न्या.चपळगावकर यांची प्रदीर्घ व अभ्यासपूर्ण प्रस्तावना आहे. पुस्तकाच्या अंतरंगात अनंत भालेराव यांच्या उत्तुंग जीवनाचा व कार्यकतृर्त्वाचा वेध घेण्यांत आला आहे.
अनंतराव भालेराव यांच्या काळातील पत्रकारितेला उजाळा देणारे हे पुस्तक आहे.

‘आज मुख्य प्रवाहात पत्रकारिता करणाऱ्या तरुणांसाठी हे कथन स्वप्नवतही वाटण्याची शक्यता आहे. कारण आता पत्रकारितेचा प्रवास ‘मिशन टू प्रोफेशन टू बिझिनेस’ असा झालेला आहे. अनेक प्रसंगी मालक आणि पत्रकार या दोघांचीही पत्रकारिता ‘पेड’ झालेली स्पष्टच दिसते; बहुसंख्य पत्रकार आणि संपादकही ‘हिज मास्टर्स व्हॉईस’ झाल्याचे विदारक चित्र आहे. त्यामुळे तर अनंतराव भालेराव नावाचा पत्रकारितेतला एकेकाळचा हा महानायक तरुण पिढीला दंतकथाही वाटू शकतो. आभासी टीआरपी मिळवलेले किंवा सहकाऱ्यांच्या खूषमस्कऱ्यांवर मोठे झालेले नव्हे तर, नितळ वर्तन आणि लेखनाने वाचकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवलेले अनंतराव भालेराव यांच्यासारखे संपादक या पत्रकारितेला लाभलेले आहेत, हे नवीन पिढीला समजावे यासाठी केलेला एक प्रयत्न म्हणजे कैवल्यज्ञानी ‘. असे संपादक प्रवीण बर्दापूरकर यांनी आपल्या प्रारंभीच्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

 ज्येष्ठ  पत्रकार अरविंद गोखले यांची वरील पुस्तकास विस्तृत प्रस्तावना आहे. 'कैवल्यज्ञानी' या पुस्तकाचे एकूण चार भाग करण्यात आले आहेत. पहिल्या भागात प्रामुख्याने अनंत भालेराव यांच्या निकट राहिलेले मराठीतील ज्येष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ आणि न्यायमूर्ती नरेन्द्र चपळगावकर यांचे लेख आहेत.

दुसऱ्या भागात अनंत भालेराव यांच्या परिवारातील सदस्यांचे लेख आहेत. संपादक व वडील अशा दोन्ही भूमिकेच्या अनुभवाबाबत अरुण व निशिकांत भालेराव या पुत्रांचा व डॉ.सविता पानट या कन्येचे लेख  आहेत. सानिया भालेराव या नातीचा लेखही या विभागात आहे.

तिस-या विभागात अनंत भालेराव यांचा प्रभाव असणाऱ्या ललित लेखक, विचारवंत,साहित्यिक यांचे लेख आहेत. सदर पुस्तकाचे संपादक प्रविण बर्दापूरकर यांचा लेखही या भागात आहे.

चौथ्या भागात  दैनिक 'मराठवाडा' नावाच्या संस्कारपीठात अनंत भालेराव यांच्या सोबत किंवा त्यांच्या हाताखाली काम केलेल्या पत्रकारांचे त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारे लेख आहेत.

१९७० ते १९८० हे दशक म्हणजे 'मराठवाडा'च्या वाटचालीतील 'सोनेरी पर्व' होते. एका प्रादेशिक वृत्तपत्राचा प्रभाव किती जबरदस्त असतो आणि संपादकाची ताकद काय असते, याचा वस्तुपाठ अनंतराव आणि 'मराठवाडा' ने घालून दिला. एक प्रादेशिक पत्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जनतेच्या हितासाठी किती परखड भूमिका घेऊ शकते, हे अनंत भालेरावांनी त्या काळात प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.

पत्रमहर्षि अनंत भालेरावांचे समग्र साहित्य नांदेड येथील अभंग प्रकाशनास प्रकाशित करण्याची संधी मिळाली हा आम्ही बहुमान समजतो. भालेराव परिवाराने आमच्यावर  विश्वास दाखविला. त्यांचे ऋण शब्दातीत आहे.
  • निमा कुळकर्णी
  • मो.नं.- ९९२३५९२२४७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]