मधुर भांडारकर यांच्या सर्किट मध्ये मधुची मधुर गाणी
लातूर ( माध्यम वृत्तसेवा ) –मराठवाडा ही जशी संतांची कर्मभूमी तशीच कलावंतांची खाण म्हणूनही ओळखली जाते. आज पर्यंत मराठवाड्यातील अनेक कलावंतांनी विविध कला प्रकारात संपूर्ण जगभर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. याच मराठवाड्यातील बोरगावकर घराणे म्हणजे गेल्या सहा पिढ्यांपासून संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठी अत्यंत तळमळीने कार्यरत असणारे घराणे.
याच घराण्यातील बनारस घराण्याचे तबलावादक व अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांची पुतणी मधुवंती बोरगावकर हिने प्रथमच मराठी सिने जगतात पार्श्वगायिका म्हणून पदार्पण केले आहे. या घराण्यातील सांगितिक वारसा प्रथम सुरू करणारे संगीत महर्षी बाबा बोरगावकर यांनी आपल्या मराठवाड्यामध्ये शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. लातूरमध्ये ज्या वेळी शास्त्रीय गायनाची मैफल असायची, त्या वेळी तंबोरा बाहेरगावाहून आणावा लागत असे. अशा काळात लातूरमध्ये संगीत महर्षी बाबा बोरगावकर यांनी शास्त्रीय संगीताचा प्रसार व प्रचार होण्यासाठी स्वत: बानूबाई करीम खाँ (अब्दुल करीम खाँ यांच्या पत्नी) यांच्या मार्गदर्शनानुसार लातूरमध्ये शास्त्रीय संगीत विद्यालय सुरू केलं. काही काळातच संगीतक्षेत्रातले अनेक दिग्गज कलावंत संगीत विद्यालयात येऊ लागले. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, प्रभा अत्रे, कीर्ती शिलेदार, जयमाला शिलेदार, जगदीश खेबुडकर यांच्यासह अनेक दिग्गज कलावंतांनी विद्यालयाच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली होती.
असा सांगीतिक कौटुंबिक वारसा लाभल्यामुळं लहानपणापासून शास्त्रीय संगीताचे संस्कार मधुवंतीवर घरातूनच घडत गेले. वडील आणि गुरू पंडित सूरमणी बाबूराव बोरगावकर यांनी शास्त्रीय संगीताची तालीम दिली, तर पणजोबा, तसंच आजोबा गोविंदराव बोरगावकर न चुकता रोज रियाजाचा तास घ्यायचे. वडिलांकडून शास्त्रीय गायनाचं व संवादिनीचं शिक्षण मिळालं, तर काका पंडित तालमणी राम बोरगावकर तबलावादक असल्यामुळं तालवाद्याचं शिक्षण त्यांच्याकडून लहानपणीच मिळालं. असा समृद्ध वारसा लाभल्यामुळे मधुवंती कलावंत म्हणून बहरत गेली. सरस्वती संगीत महाविद्यालयाच्या रूपाने अनेक युवा कलावंत या मातीमध्ये निर्माण केले. याच घराण्यातील चौथ्या पिढीचं नेतृत्व करणारी युवा आश्वासक गायिका मधुवंती बोरगावकरने त्यानंतर उच्च शिक्षणासाठी जगविख्यात गायिका गाणं सरस्वती पंडिता किशोरीताई आमोणकर यांच्याकडे तालीम घेतली. किशोरीताई नेहमीच म्हणायच्या : ‘‘आकार हा कोणत्याही गायकाला कॉपी करणारा नसावा, तर तो आकार निखळ, शुद्ध असला पाहिजे. शिवाय, तयारीपेक्षाही जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे गायकाकडून रागाचा, बंदिशीचा भाव जपला जाणं. तो जपला जायला हवा.’’असे समृद्ध विचार स्वतः अंगी करून आपल्या शिष्यांमध्ये बसवणाऱ्या गाणं सरस्वती किशोरीताईंच्या मार्गदर्शनामुळे मधुबन तिचं गाणं अधिक खुलत गेलं.शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा चालवणाऱ्या मधुवंतीने उपशास्त्रीय प्रकारातही आपला स्वतंत्र ठसा निर्माण केलेला आहे.
रियालिटी शोच्या माध्यमातून मधूचा चाहता वर्गही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे. स्वरांवरची मजबूत पकड ,भावनाप्रधान गायकी आणि लयकारीयुक्त तादात्म्य जपणारी आलाप तानांची बरसात ही मधुवंतीच्या गाण्याची बलस्थान आहेत. जिद्द चिकाटी आणि बोरगावकर घराण्याची लाभलेली वैभवशाली परंपरा यामुळे मधुसह गाणं अधिकाधिक खुलत गेलं. शास्त्रीय गायनाचा आपला वारसा जपत असतानाच मधुवंती सिने पार्श्वगायिका म्हणून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. सात एप्रिल ला मधुचा पहिला चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
समाजातील दाहक वास्तव आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा हातखंडा असलेले दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या सर्किट या सिनेमांमध्ये मधुवंतीने पार्श्वगायन केलेले आहे. या सिनेमांमध्ये मधुवंती सोबतच सुप्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम अवधूत गुप्ते बेला शेंडे यांचीही सुमधुर गाणी आहेत. अप्रतिम कथानका सोबतच सर्किट हा चित्रपट सुमधुर गाण्यांमुळे रसिकांना नक्कीच आवडेल यात काही शंकाच नाही. मधुवंतीच्या रूपाने आपल्या मराठवाड्याला आणखी एक पार्श्वगायिका लाभतेय हा मराठवाड्यासाठी सन्मानच आहे. मधुवंतीचे विविध संगीत संमेलनामधून संपूर्ण महाराष्ट्रभर शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताच्या प्रचार प्रसारासाठी कार्यक्रम सातत्याने चालूच असतात आता सिनेसृष्टीत पदार्पण केल्यामुळे मराठी सिने रसिकांना मधुवंतीच्या गाण्याचा सिनेमागृहातही आस्वाद घेता येणार आहे. मधुवंतीच्या भावी सांकेतिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!