………………………………..
राज्यपालांचे मराठवाडा जनता विकास परिषदेला आश्वासन
…………………………………..
लातूर :
राज्याच्या समतोल विकासाच्या अनुषंगाने मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या पुनर्स्थापनेसंदर्भात राज्य शासनाला योग्य निर्देश देण्याचे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी येथे दिले.
राज्यपालांच्या मराठवाडा दौऱ्यादरम्यान लातूर येथे मराठवाडा जनता विकास परिषदेच्या लातूर महानगर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय विश्रामगृहावर त्यांची भेट घेऊन उपरोक्त मागणीचे निवेदन त्यांना दिले. त्यावेळी ते बोलत होते. शिष्टमंडळात मजविप लातूर महानगर शाखेचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, केंद्रीय उपाध्यक्ष डाॅ. सोमनाथ रोडे , कोषाध्यक्ष ईश्वरचंद्र बाहेती यांचा समावेश होता. ‘ हो जाएगा ‘ अशा निःसंदिग्ध शब्दांत राज्यपालांनी यावेळी शिष्टमंडळाला आश्वासित केले.
गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्र शासनाने मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ दिलेली नाही. मागील ठाकरे सरकारने मंडळाच्या पुनर्स्थापनेची फक्त घोषणाच केली. तथापि, अद्यापपावेतो या अनुषंगाने शासकीय परिपत्रक निघालेले नाही. येत्या 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृतमहोत्सव संपन्न होत आहे. त्यापूर्वी उपरोक्त जी.आर. न निघाल्यास मराठवाडा जनता विकास परिषदेला आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदनावर मजविपचे केंद्रीय अध्यक्ष माजी खा.
डाॅ. व्यंकटेश काब्दे, प्राचार्य डाॅ.जीवन देसाई, ॲड. भारत साबदे, जयप्रकाश दगडे , ईश्वरचंद्र बाहेती, प्रा. विनोद चव्हाण, उपाध्यक्षा श्रीमती शुभदा रेड्डी यांची नावे आहेत.