*’मराठवाडा मॅरेथॉन लातूर 2023′ मध्ये धावले लातूरकर !*

0
222

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मॅरेथॉनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर, दि. 12( वृत्तसेवा)-: मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या ‘मराठवाडा मॅरेथॉन लातूर 2023’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते तिरंगी फुगे हवेत सोडून नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून मॅरेथॉनला सुरुवात झाली.

सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधकारी गणेश महाडिक, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, नगरपालिका प्रशासनचे उपायुक्त रामदास कोकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, प्रभारी तहसीलदार गणेश सरवदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

‘रन फॉर हुतात्मा, रन फॉर मराठवाडा’ हे घोषवाक्य असलेल्या या मॅरेथॉनमध्ये लातूरकरांनी सहभाग नोंदविला. युवक, खेळाडूंसह विद्यार्थी, महिला, शासकीय अधिकारी व कर्मचारी यावेळी मोठ्या संख्यने उपस्थित होते. मॅरेथॉनपूर्वी आयोजित झुंबा डान्समध्ये सर्व उपस्थितांनी संगीताच्या तालावर आपले कौशल्य दाखविले. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनीही यामध्ये सहभागी होत उपस्थितांचा उत्साह वाढविला.नवीन जिल्हाधिकारी कार्यालयांच्या प्रांगणातून सुरू झालेली ही मॅरेथॉन पीव्हीआर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर मॅरेथॉनचा समारोप झाला.

मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांचे सदैव स्मरण ठेवावे- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

मराठवाडा मुक्तिसंग्रामात अनेकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. या मुक्तिसंग्रामाच्या जाज्वल्य इतिहासाचा आपल्याला अभिमान आहे. हा इतिहास पुढील पिढीला सांगणे आवश्यक आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांचे स्मरण ठेवून त्यांच्या कार्याची जाणीव प्रत्यकाने ठेवावी, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी मॅरेथॉनच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले.

पुष्पा राठोड, आदित्य पवार मॅरेथॉनचे विजेते

जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित ‘मराठवाडा मॅरेथॉन लातूर 2023’मध्ये महिला गटात पुष्पा राठोड आणि पुरुष गटात आदित्य पवार यांनी विजेतपद पटकाविले. तसेच पुरुष गटात ओंकार तेलंगे आणि अजय राठोड यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. महिला गटात श्रावणी जगताप हिने द्वितीय, तर राजनंदिनी सोमवंशी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

जिल्हा क्रीडा संकुल येथे सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, नगरपालिका प्रशासनचे उपायुक्त रामदास कोकरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, रेणापूरच्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, लातूरचे प्रभारी तहसीलदार गणेश सरवदे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरीत करण्यात आले. मॅरेथॉन पूर्ण करणाऱ्यांचाही प्रोत्साहनपर बक्षीस देवून यावेळी सन्मान करण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here