38 C
Pune
Thursday, April 24, 2025
Homeलेख*मराठवाडा मुक्ती लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बळ*

*मराठवाडा मुक्ती लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बळ*

मराठवाडा मुक्ती गाथा ( भाग -8 )

लेखमाला

निजामशाही संपविण्यासाठी सर्व समाज एकवटल्याचे आपण मागच्या लेखात पाहिले. आर्य समाज अत्यंत निर्णायक भूमिका घेऊन या लढ्यात सर्व सामर्थ्यांसह उतरला होताच. निजामाकडून मुद्दाम हा लढा कमकुवत व्हावा म्हणून अनेक चाली खेळल्या गेल्या त्यात ‘पश्त आक्वाम’ या नावाची संघटना निर्माण करून त्या संघटनेला खतपाणी दिले. या संघटनेत कांही तेलंगणा मधल्या दलित नेत्यांना हाताशी धरून चाल खेळली गेली.पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी योग्य वेळी यात हस्तक्षेप करून त्यांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचा स्वातंत्र्य संग्रामाला पूर्ण पाठिंबा दिला होता. नांदेडला शेड्युल्ड कास्ट फेडरेशन आणि पश्त आक्वामच्या कार्यकत्यामध्ये जोरदार संघर्ष झाल्याची नोंद आहे. दलितांचे आणखी एक भारतीय स्तरावरील नेते पी. एन. राजभोज यांनीही सिकंदराबाद येथे जाहीर सभा घेऊन हैदराबाद मुक्ती संग्रामाला पाठिंबा दिला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हैदराबाद मुक्ती संग्रामाबाबत विचार अगदी स्पष्ट होते. संस्थानातील जनतेला आवाहन केले की, त्यांनी भारतीय संघराज्यात सामील व्हावे. हैदराबाद संस्थान स्वतंत्र म्हणजे भारताच्या विभाजनाची सुरुवात ठरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश अधिसत्ता याची चिकित्सा केली आहे. 17 जून, 1947 रोजी आपल्या विस्तृत निवेदनात त्यांनी संस्थानिक स्वतंत्र राहू शकत नाहीत असे सिद्ध करून दाखविले होते.
हैदराबाद आणि भारत यांची भौगोलिक एकता अविभाज्य आहे. ती हैदराबाद संस्थानाला नष्ट करू देता कामा नये. निझाम हा शत्रू आहे, त्याची बाजू घेऊ नका, असे डॉ. आंबेडकरांनी दि. 27 नोव्हेंबर, 1947 रोजी जाहीरपणे घोषित केले होते. भारतात सामील होण्यास नकार देणाऱ्या निझामाला काहीही सहानुभूती दाखवण्याची गरज नाही. निझाम हा भारताचा शत्रू आहे, म्हणून अनुसूचित जातींमधील एकाही माणसाने निझामाची बाजू घेऊ नये असे आवाहन केले होते.


वंदे-मातरम् विद्यार्थी चळवळ :-
हैद्राबाद संस्थांनात शिक्षण संस्थांमध्ये वंदे्मातरम् गीत म्हणण्यास बंदी होती. मुक्ती लढ्याचे पडसाद विद्यार्थ्यांच्या मनावर उमटू नयेत, म्हणून निजाम सरकार प्रयत्नशील होते. इ.स. 1938 हे वर्ष प्रतिकाराचे वर्ष होते. विद्यार्थी वर्गाच्या मनात असंतोष खदखदत होता. उस्मानिया विद्यापीठात वरंगल, गुलबर्गा व औरंगाबाद येथे इंटरमिजिएट कॉलेजेस होती. औरंगाबाद कॉलेजमध्ये विद्यार्थी बैचेन होते. गोविंदभाई श्रॉफ विद्यार्थ्यांना चिथावणी देतात म्हणून त्यांना नोकरीतून काढण्यात आले. 14 नोव्हेंबर, 1938 रोजी विद्यार्थ्यांनी वसतिगृहामध्ये ‘वंदेमातरम्’ म्हणण्यास प्रारंभ केला. त्यावर सरकारने बंदी आणली. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी ऐकायला तयार नव्हते. 16 नोव्हेंबर, 1938 रोजी विद्यार्थ्यांनी अन्नत्याग सत्याग्रह केला. 18 नोव्हेंबर, 1938 रोजी विद्यार्थ्यांची या प्रश्नावर रितसर बैठक झाली आणि 30 नोव्हेंबर, 1938 रोजी विद्यार्थ्यांनी संप पुकारला. या घटनेचे पडसाद हैदराबादमध्येही उमटले. विद्यार्थ्यांना गणवेशाची सक्ती करण्यात आली. त्यास देखील विद्यार्थ्यांनी प्रखर विरोध केला. शेवटी वंदे्मातरम् प्रश्नावर बेमुदत संप पुकारला. एकूण 1 हजार 200 विद्यार्थी संपावर गेले. केवळ औरंगाबाद शहरात 300 विद्यार्थी वंदेमातरम् चळवळीत उतरले होते. वंदे्मातरम् आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आले. विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडीत झाले. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू टी. जे. केदार यांनी उदार अंत:करणाने उस्मानिया विद्यापीठातील काढून टाकलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. मराठवाड्यातील शालेय विद्यार्थ्यांची येवला, खामगाव व अहमदनगर येथे सोय करण्यात आली. त्रिपुरा कांग्रेस अधिवेशनात वंदेमातरम् चळवळीस पाठिंबा देण्यात आला. नेताजी सुभाषचंद्र बोस व पं. जवाहरलाल नेहरू यांनी तरुणांच्या या उठावाला पाठिंबा दिला होता.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या या अभूतपूर्व लढ्यामुळे हैदराबाद संस्थांनात पुढे जी आंदोलने झाली, त्यासाठी राजकीय कार्यकर्ते व नेते वंदेमातरम् चळवळीतून मोठ्या प्रमाणात मिळाले. वंदेमातरम् चळवळीने विद्यार्थी विश्वात फार मोठी जागृती घडवून आणली. 1938 ते 1948 पर्यंतचा काळ हा मुक्ती संग्रामाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळात सर्व आघाड्यांवर बहुतेक वंदेमातरम् चळवळीतील तरुण कार्यकर्ते होते. हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामात आणि मराठवाडा मुक्ती संग्रामात विद्यार्थी व युवाशक्तीने वंदेमातरम् चळवळीच्या माध्यमातून जे अभूतपूर्व चैतन्य दाखवले , ते प्रशंसनीयच मानले पाहिजे…!!

क्रमशः

@युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]