उदगीर–; ( प्रतिनिधी) –
मुक्ती संग्रामच्या लढ्यातील हत्तीबेट हे किसान दलाचे प्रमुख केंद्र असल्यामुळे या बेटावर मराठवाडा मुक्तीदिनानिमित्त पहिल्यांदाच शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रभारी तहसीलदार प्रकाशराव कोठुळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
देवर्जन येथील थोर स्वातंत्र्य सेनानी कै. गंगाधरराव साकोळकर पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव माजी सरपंच शिवाजीराव साकोळकर होते.
प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी एम.टी. वाघमारे ,मंडळ अधिकारी त्र्यंबकराव मुसळे, तलाठी संतोष पाटील,ग्रामविकास अधिकारी बी. ए. महांडुळे , सह्याद्री देवराई व संस्कृती फौंडेशनचे सुपर्ण जगताप,सीतम सोनवणे भाजपाचे तालुका अध्यक्ष बसवराज रोडगे, पं. स. चे माजी उपसभापती ईश्वर खटके, जि. प. च्या माजी सदस्या कुशावर्ता बेळे ,निवृत्त दूध विकास अधिकारी अशोक खटके, करवंदी चे सरपंच भालेराव जाधव यांची उपस्थिती होती. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य शिवाजीराव साकोळकर, चंद्रप्रकाश खटके,गुणवंत खटके,अशोक साकोळकर यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.प्रास्ताविक व पाहुण्यांचा सत्कार व्ही. एस. कुलकर्णी यांनी केला.
*हत्तीबेट किसान दलाचा अजिंक्य डोंगर—
मराठवाडा मुक्ती संग्रामात रझाकार अन निजामी राजवटी विरुद्ध लढा देणाऱ्या किसान दलातील तरुणांची अख्खी रणनिती हत्तीबेटावरून ठरत होती. स्वातंत्र्य समरात उडी घेतलेल्या या तरुणांचे हत्तीबेट आश्रयस्थानही होते.या तरुणांनी निजाम व रझाकारांना सळो की पळो करून सोडले होते. निझाम सरकारने किसान दलाची संघटना चिरडून टाकण्याचे ठरवले.आटरग्याहून हत्तीबेटाकडे निझामी लष्कराच्या सहा ट्रक निघाल्या.बेटाला वेढा देवून त्यावर चढाई करतानाच किसान दलाच्या जवानांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात निझामाचे ७५शिपाई ठार झाले.कांही काळासाठी युद्धभूमी बनलेले हत्तीबेट हे अजिंक्य ठरले.
*दिवंगत स्वातंत्र्य सैनिकांची स्वप्नपूर्ती ––
मराठवाडा मुक्ती संग्रामात मोलाची भूमिका असलेल्या हत्तीबेट व तोंडचिर च्या रामघाटात शासकीय ध्वजारोहण व्हावे अशी मागणी या किसान दलातील लढा दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांनी २२वर्षापूर्वी केली होती. ही मागणी केलेले स्वातंत्र्य सैनिक आज हयात नाहीत. मात्र ‘लोकमत’ ही मागणी ऐरणीवर घेतली होती.या दिवंगत स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य यांच्या उपस्थितीत हत्तीबेटावर पहिले शासकीय ध्वजारोहण पार पडले. यावेळी या पाल्यांच्या सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी त्र्यंबकराव मुसळे यांनी केले.