माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी मानले आभार
लातूर/प्रतिनिधी ः- देशात नव्याने सुरु झालेल्या वंदे भारत रेल्वेला संपुर्ण जगभरातून मागणी होऊ लागलेली आहे. या रेल्वेसाठी लागणारे कोच लातूर येथील मराठवाडा रेल्वे प्रकल्पातून उत्पादीत होणार असून यासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी शेवटच्या टप्यात आली असल्याचे सांगत आगामी अकरा महिन्यात या प्रकल्पातून वंदे भारत रेल्वे बाहेर पडेल अशी घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. या घोषणेनंतर माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी रेल्वे मंत्री वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे आभार मानले आहेत.
देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला रेल्वे कोच प्रकल्प लातूरात होत आहे. या प्रकल्पाचे काम अतिशय वेगाने सुरु आहे. या प्रकल्पाचे नामकरण मराठवाडा रेल्वे कोच प्रकल्प असे करण्यात आलेले आहे. या प्रकल्पाच्या उभारणीचा आढावा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतलेला आहे. या प्रकल्पातून लवकरच प्रत्यक्ष उत्पादन सुरु करण्यासाठी आवश्यक असणार्या सर्व बाबी जलदगतीने पुर्ण कराव्यात अशा सुचना त्यांनी रेल्वे प्रशासनास दिले आहेत. या कोच प्रकल्पातून देशात नव्याने सुरु झालेल्या वंदे भारत रेल्वेसाठी आवश्यक असणारे कोच तयार करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री वैष्णव यांनी दिलेली आहे. भारतातच तयार होत असलेली ही वंदे भारत रेल्वे संपुर्ण जगाला आकर्षीत करीत आहे. त्यामुळेच या रेल्वेला संपुर्ण जगातून मागणी होऊ लागलेली असून ही रेल्वे इतर देशाना देण्यासाठी भारत सरकारनेही सकारात्मकता दाखविलेली आहे. त्यामुळेच लातूर येथील मराठवाडा रेल्वे कोच प्रकल्पातून वंदे भारत रेल्वेसाठी आवश्यक असणारे कोच तयार करण्यात येणार असून आगामी अकरा महिन्यात मराठवाडा रेल्वे कोच प्रकल्पातून वंदे भारत रेल्वे बाहेर पडेल अशी घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
या प्रकल्पामुळे लातूरसह मराठवाड्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असे सांगून रेल्वे मंत्री वैष्णव यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक असणार्या सर्व यंत्रणा लवकरच उभारल्या जाणार आहेत. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे इतर प्रकल्पही उभारले जाऊन रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सांगितले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केल्याबद्दल माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी त्यांच्यासह रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे आभार व्यक्त करून केंद्र सरकारच्या माध्यमातून लातूरला ही मोठी विकासात्मक भेट मिळत असल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.