“मॉर्निंग वॉक…!!”
भाग – ५
प्रत्येकाच्या स्वत:च्या अशा कांही खास आवडी-निवडी, सवयी असतात आणि त्याला तशीच कारणे देखील असतात त्यामुळे त्याला चूक किंवा बरोबर अशी लेबलं लावण्याची आवश्यकता नसते…..!
लवकर उठून घाईघाईने “मॉर्निंग वॉक” च्या नांवाखाली कुठल्या तरी पार्कला अथवा मैदानाला गर्दीतून वाट काढत धापा टाकीत ‘ब्रिस्क वॉकींग” करून शरीर तंदुरस्त ठेवण्यापेक्षा शांतपणे एखाद्या निर्जन रस्त्यावरून रमत गमत लांबवर चालत आजूबाजूचा सगळा परिसर , झाडे, झुडपे, माणसे निरखत चालण्यात किंवा एखाद्या तळ्याकाठी, नदीकाठी जाऊन पक्षी प्राण्यांच्या हालचाली स्वस्थपणे बसून बघण्यांत मिळणारा आनंद हा मला माझ्या मनाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने जास्त महत्वाचा वाटतो. कदाचित मला माझ्या शारीरिक तंदुरुस्ती पेक्षा मानसिक तंदुरुस्ती जास्त महत्वाची वाटत असावी…! आता कोणाला हा आळशीपणा लपविण्याचा प्रयत्न वाटत असेल तर त्याला माझी कांही हरकत नाही.
निरव शांततेला मग ती कुठल्याही वेळेची असो, त्या त्या वेळेप्रमाणे एक विशिष्ट रूप असतं, एक मूड देखील असतो….! दिवसभराचा गजबजलेला, अगदी वाहता रस्ता मध्यरात्र उलटल्या नंतर निवांत झाला की अगदी वेगळाच भासतो….ओळीने सारख्या अंतरावर उभ्या असलेल्या दिव्यांच्या उजेडांत त्या रस्त्याच रूपच पालटून जातं….खूप कष्ट करून चटईवर अंग टाकून गाढ निजलेल्या कष्टकरी माणसासारखा तो रस्ता दिसतो… त्याचा थकलेपणा त्याच्या निद्रेतही जाणवतो….! तोच रस्ता पहाटेच्या अंधारांत वेगळ्याच मूडमध्ये जाणवतो…आता तो थकलेला नसतो…! खूप काम पडल्येत..उठून कामाला लागलच पाहिजे ह्या जाणिवेने लवकर उठून कामाला लागलेल्या गृहिणीच्या देह बोलीसारखी त्याची देहबोली असते….! प्रसन्न गारव्यांत हाताच्या मुठी खिशांत कोंबून शांतपणे चालत राहीलं की हे सगळं जाणवत…अनुभवायला मिळत…!!
संधी मिळाली तर कधी निसर्ग सान्निध्यांतल्या एखाद्या तळ्याकाठी, नदीकांठी किंवा अगदीच कांही नाही तर समुद्राकांठी अशाच कुठल्याही शांत प्रहरी भटकता आलं तर त्यावेळी मिळणारे मानसिक समाधान आणि आनंद विलक्षण ऊर्जादायी असतो….कमीत कमी माणसं आणि जास्तीतजास्त निसर्ग – ह्यांत चंद्र, सूर्य, तारे, झाडे, पाने, फुले, पक्षी, प्राणी सगळे आले – हे आपल्याला आपल्यातल्याच वेगळ्या अशा जाणिवांवर नेतात. त्या वेळेच्या शांततेला एक नि:शब्द नाद असतो, अगदी फक्त आपल्याच कानांत गुंजणारा, थेट मनाच्या गाभाऱ्यात जाऊन घुमणारा, अवघं मन व्यापून शरीर हलकं हलकं करत जाणारा तो नाद एक विलक्षण मन:शांती देतो. आपणच आपल्याला नव्याने पाहाण्याची, जगण्याची साद देतो, ती आपण ऐकायची असते…!! अगदी काव्यात्मक भाषेंत सांगायचे झाले तर रोज थोडी थोडी निरव शांतता तळ हातावर घेऊन पवित्र तीर्थाप्रमाणे प्राशन करायची असते….!!
आज अगदी भल्या पहाटे जाग आली… अगदी टक्क जाग आली….! छान ताजे तवाने वाटत होते….चला, आज तळ्यावरच्या पायवाटेने एखादी चक्कर मारून येऊ या, ह्या विचारांनी तयार झाले ….बाहेर कितपत अंधार आहे हे बघण्यासाठी अंगणात आले, इथून आजूबाजूचा सारा परिसर दिसतो….समोरचं मोकळ आकाश दिसत….!! मावळतीला झुकलेला चांदवा अगदी थेट समोर आला होता…त्याच्या प्रकाशांत कठड्याची नक्षीदार सावली अंगणात पडली होती….. शुक्राची चांदणी लुकलुकत होती ..आणि तीच ती हवीशी वाटणारी नादमय शांतता साऱ्या आसमंतात पसरली होती…..अगदी नकळतपणे तिथेच अंगावर शाल लपेटून झूल्यावर बसून राहिले…..डोळे मिटून घेतल्यावर सुद्धा, डोळ्यासमोर चंद्रप्रकाश जाणवत होता…..थंडीत किती तरी वेळ पहाटेच्या चांदण्यांत डुलत राहिले…. एका निरामय आनंददायी जाणिवेत डुंबत राहिले….!! किलबिलत पक्षांचा एक थवा अगदी जवळून उडत गेला…डोळे उघडले तर उजाडत होते, अरुणोदयाची लाली हळुहळू सर्वत्र पसरत होती, आपल्या प्रकाशाचा सारा पसारा आटोपून चंद्र अस्ताला चालला होता…..!!
आज घरांतल्या घरांत, बसल्याजागीच माझा “मॉर्निंग वॉक” पुरा झाला होता….!! आणि त्याबरोबरच लिखाणाला भराभर हात सुद्धा चालतं होता.🥰
मला खात्री आहे आपणां सर्वांना आजचा विषय, अनुभव नक्कीच आवडेल.
प्रा.जयंती देशमुख, अकोला