लातूर
लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील उड्डाणपूल रस्ता नादुरुस्त झाल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. मागील काळात कोरोना संकटामुळे पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हता परंतु आता लातूर शहर महानगपालिकेने गतीने विकास कामे राबविण्यास सुरुवात केली आहे. आज पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार उड्डाणपूल रस्ता दुरुस्तीचा शुभारंभ महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष ॲड किरण जाधव पाटील, मनपा शहर अभियंता नवनाथ केंद्रे यांची उपस्थिती होते.
शहारातील सर्वच भागात विकास कामे जलदगतीने राबविण्यात येत असून नागरी समस्या सोडविण्यासाठी लातूर शहर महानगपालिकेने पुढाकार घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून आज लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील उड्डाणपूल रस्ता दुरुस्ती कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रथमतः खड्डे बुजविण्यात येणार असून दुसऱ्या दिवशी डांबरीकरणाचा पूर्णपणे थर टाकण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे तसेच वाहनांची होणारी कोंडी सुटणार आहे. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी कामाची गुणवत्ता उच्च राहील याची काळजी घेण्याच्या सूचना बांधकाम विभागास केल्या. लातूर शहर महानगपालिकेने हाती घेतलेल्या कामाबद्दल परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.