‘मधमाशी’पालनातून ‘मध’निर्मितीत मोठी झेप
हिंपळनेरच्या दीनकर पाटलांद्वारे यशस्वी उद्योग : सरकारद्वारे पुरस्काराने दखल
परभणी,दि.04(प्रतिनिधी) :
चाकूर तालुक्यातील हिंपळनेर या छोट्याशा गावातील अल्पभूधारक दीनकर पाटील यांनी मधमाशी पालनातून उद्योजकतेची दृष्टी ठेवून, विस्तारकक्षा रुंदावून व्यवसायिक मध निर्मितीच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.
दरम्यान, दीनकर विठ्ठलराव पाटील यांना राज्याच्या कृषि विभागातर्फे दि. 2 मे रोजी नाशिक मध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मधमाशीपालन उद्योगातील मोठे नाव म्हणून लातूर येथील दिनकर पाटील संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित आहेत. चाकूर तालुक्यातील हिंपळनेर (जि. लातूर) या गावात पाटील यांचे मोठे कुटूंब आहे. शेतकरी कुटूंबात जन्मलेले आणि वाणिज्य पदवीधर असणारे पाटील यांना यातून हिश्श्यास केवळ 4 एक्कर कोरडवाहू जमीन मिळाली. परंतु, या शेतजमीनीवर कुटूंबाचा उदरनिर्वाह शक्य नाही, हे ओळखून पाटील यांनी नविन मार्ग शोधण्याचा संकल्प केला. मूळातच तांत्रिक शिक्षण नसल्याने नोकरीचा मार्ग अवघड होता. कुठलाही उद्योग करावयाचा असल्यास त्याला भांडवलाची गरज लागते, अशाच विचारात असताना महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ लातूर येथील विकास अधिकारी श्री एम. एन. दराडे यांची भेट झाली. त्यांनी मधमाशीपालनाची तांत्रीक माहिती दिली. त्यानुसार तांत्रिक प्रशिक्षण घेतलेल्या पाटील यांनी मंडळाकडून पाच पेट्या घेऊन सन 2005 साली प्रत्यक्ष व्यवसायात पदार्पण केले. पाटील यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या चाकूर येथील कृषी विषयक मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
त्या पाठोपाठ वर्षभर सातेरी (एपिस इंडिका) या जातीच्या मधमाशा पाळल्या, पण त्यात अनेक अडचणी आल्याने फारसे उत्पन्न हाती लागले नाही. परंतु ते निराश न होता त्या काळात त्यांनी त्या संबंधीचे वाचन, तज्ज्ञांशी चर्चा करून पुणे, परभणी इत्यादी ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घेतले. त्यातून अनुभव वाढत गेल्याने मधमाशी पालनाविषयी गोडी वाढली. मधमाशांचे विविध प्रकार कळू लागले. त्यातून अनुभव वाढत गेला, गोडी वाढली. त्या अनुषंगाने एपिस मेली फेरा ही युरोपातून आयात केलेली, अंधारात राहणारी, जलद वाढणारी, मोठ्या प्रमाणात मध गोळा करणारी, लवकर माणसाळणारी व 30 ते 40 किलो मध देणारी, व्यावसायिकदृष्ट्या परवडणारी व समूहाने पेट्या ठेवून उत्पादन करण्याची कला अवगत केली.
सन 2006-07 साली या जातीच्या पाच पेट्या बेंगलोरच्या व्ही. संतोष या मधमाशी पालकाकडून पंधरा हजार रुपयेने विकत आणल्या. पहिले वर्ष प्रशिक्षणासाठी फिरण्यात, अभ्यास करण्यासाठी त्यांनी भरपूर खर्च झाला. पहिल्या वर्षाचे पूर्ण उत्पन्न प्रशिक्षणामध्ये खर्च झाले. त्यात राणीमाशी, कामकरी माशी, पोळे, मेनपत्रा, मध, यंत्र, हंगाम मार्केट, जीवनक्रम, सवयी अशा बारीक-सारीक बाबींचा अभ्यास करून वसाहती वाढवण्याची कला आत्मसात केली. या व्यवसायात करिअर करायचे ठरवून ते जोमाने कामाला लागले. येथूनच त्यांच्या व्यवसायाला खरी सुरुवात झाली. शेतकरी स्वतःहून परागीकरण करण्यासाठी त्यांना बोलावत होते. तेथे सूर्यफुलासाठी 200 रुपये प्रति पेटी व कांदा बीजोत्पादनासाठी 300 रुपये प्रति पेटी भाडे घेऊन पेटया ठेवू लागले. त्यामुळे शेतकर्यांच्या उत्पादनात 20 ते 25 टक्के हमखास वाढ आढळून आली. या कामाला गती मिळाल्यामुळे त्यांनी इतर तीन मुलांना हा व्यवसाय शिकवला एका पेटीत दहा ते पंधरा हजार कामकरी माशी, एक राणी माशी असते. राणी माशीचा एकदाच नराशी संयोग होतो. राणीमाशी प्रति दिवशी पाच ते दहा हजार अंडी देते. पैदाशीचा गला कालावधी जून ते सप्टेंबरपर्यंत असतो. त्यातून कामकरी माशा मोठ्या प्रमाणात जन्मतात व ऑक्टोबर ते जानेवारी या काळात जास्तीत जास्त मध गोळा करतात.
पाटील प्रत्येक पेटीनुसार मधमाशी, राणीचे वय, खाद्य, राणीचा जन्म अशा गोष्टींची नोंद ठेवतात. मध यंत्राने काढला जातो. त्यामुळे अड्यांना धोका होत नाही व पोळे ही तुटत नाही. सोयाबीन, सूर्यफूल, मका, कोथिंबीर ठेवल्यास मधाचे उत्पादन अधिक मिळते. पोलन म्हणजे माशानी गोळा केलेले खादय लहान मुलासाठी तयार केल्या जाणार्या पोषक खाद्यामध्ये याचा वापर केला जातो. तसेच मधमाशीचे विष सांधेदुखी संधिवात इत्यादी उपचारासाठीच्या औषधात वापरला जातो. पाटील यांचा अनुभव असा आहे की, जितक्या रुपयांचा मध उत्पादित होतो तितक्यात रुपयाचे उत्पन्न मधमाशी विक्रीतून मिळते. पेट्या ठेवलेल्या ठिकाणापासून दोन किलोमीटर त्रिज्येच्या वर्तुळात मधमाशा फिरतात. वर्षाला तीस ते चाळीस किलो मध एका पेटीतून मिळतो. फेब्रुवारी ते जून या कालावधीत फुलांचा हंगाम नसल्याने माशाचे पोषण करण्यासाठी साखरपाणी, गहू, मका, पीठ, कालवून खावे लागते. या कालावधीत चांगले पोषण झाल्यावर जून ते सप्टेंबर या काळात माशांची पैदास चांगली होते. मधमाशा चावू नयेत म्हणून बी वेल ही टोपी वापरली जाते. काढलेला कच्चा मध गौरी नॅचरल फूड्स या त्यांच्या स्वतःच्या कंपनीद्वारे दोन वेळा गाळून तो 18 ते 20 अंश सेल्सिअस ‘रियल हनी’ या या ब्रॅन्डद्वारे पॅकिंग करून विकला जातो.
2016 साली पाटील यांनी चाकूक्ष येथे औद्योगिक वसाहती गौरी नॅचरल फूड्स ही कंपनी स्थापन केली. ‘रियल हनी’ या ब्रॅन्डने आपला दर्जेदार मध बाजारपेठेत उपलब्ध केला. सदयस्थितीत त्याचे लातूरमध्ये सुतमिल रोडवरील ‘पाटील्स रियल हनी शॉप’ या नावाने मधाचे एक आगळेवेगळे असे दुकान आहे. त्यांनी पाटील बी कीपर्स ही संस्था सुरु केली असून बरेच होतकरू तरुण या व्यवसायात येण्यासाठी प्रशिक्षणही घेत आहेत. या संस्थेमार्फत मधाचे वार्षिक 25 से 30 टन उत्पादन घेतले जाते.
सध्या निसर्गातील मधमाशा खूप मोठ्या प्रमाणावर नष्ट झाल्यामुळे शेतकर्याच्या पिकाचे परागीकरण होत नाही. उत्पादकता कमी होते व शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होते. त्यावर उपाय म्हणून ज्या शेतकर्यांना पोलिनेशनची गरज आहे त्यांच्या शेतामध्ये मधमाश्यांच्या पेट्या ठेवून त्यांच्या पिकांचे परागीकरण करण्याचे काम मागील बारा वर्षापासून अविरत चालू आहे. त्यामुळे दरवर्षी शेतकर्यांचे कित्येक लाख रुपयाचे उत्पन्न वाढत आहे. महाराष्ट्रातील नारायणगाव, बारामती, अंबाजोगाई, तुळजापूर, लातूर, नांदेड, जालना इत्यादी ठिकाणी विषयतज्ज्ञ म्हणून दर वर्षी प्रशिक्षण देण्याचे काम अविरत चालू आहे. कृषी विद्यापीठ, राहुरी कृषी विद्यापीठ, लातूर कृषी कॉलेज तसेच दयानंद महाविद्यालय लातूर, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर, शिवाजी महाविद्यालय उदगीर तसेच अनेक संस्थासोबत मधमाशीपालन, त्यांची पैदास, स्थलांतरित उद्योग असे अनेक विषय शिकवण्यासाठी एमओयू करार झाला आहे.
एन एच एम बी ब्रीडर म्हणून मान्यता, सदस्य नॅशनल बी बोर्ड दिल्ली भारत सरकार, मास्टर ट्रेनर सीबीआरटीआय, केव्हीआयसी पुणे, केंद्रपालक खादी ग्रामोद्योग मंडळ महाराष्ट्र राज्य.
पूर्वी मिळालेले पुरस्कार
श्री वसंतराव नाईक प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्र कृषी भूषण पुरस्कार 2014, आयबीएन लोकमत प्रस्तुत जागर बळीराजाचा कृषी सन्मान पुरस्कार 2016, रोटरी क्लब ऑफ चाकूर तर्फे बिल्डर अवॉर्ड 2018, दैनिक एकमत तर्फे उद्योगपती कृतज्ञता सन्मान 2019 व वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार 2017.
दिनकर पाटील :9637135284