पुस्तक परिचय
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष पुरस्कार मूळ सोलापूरच्या डॉ. अपूर्वा प्रदीप जोशी यांच्या पुस्तकाला मिळाला आहे. रविवारी, २६ मे रोजी पुण्यातील एस.एम.जोशी सभागृहात त्यांना तो प्रदान केला जाणार आहे. याखेरीज समीर गायकवाड (झांबळ), स्नेहा अवसरीकर (बारीक बारीक आवाज वाढत चाललेत), दीपाली दातार (पैस प्रतिभेचा) यांच्यासह संजय आवटे, प्रा. सुनील विभुते, चित्रकार रविमुकूल, अतुल पेठे , डॉ. केशव देशमुख, श्री. संजय आर्वीकर या व इतर मित्रांनाही गौरवण्यात येणार आहे.
भारतभरातील विविध आर्थिक गुन्हेगारीची पाळंमुळं खणून तिचे अंतरंग उघड करणारं अपूर्वा प्रदीप जोशी यांचं ‘आर्थिक गुन्हेगारीचं अंतरंग : हर्षद ते हिंडनबर्ग’ हे पुस्तक ‘अद्वितीय’ आहे. यामध्ये आर्थिक गुन्हे, गुन्हेगार, गुन्ह्याची उकल, गुन्हेगारांचं मानसशास्त्र, बँकांची कार्यप्रणाली, राजकीय हितसंबंध आणि ताणेबाणे, या सगळ्याचा सर्वसामान्य माणसाच्या जगण्यावर होणारा परिणाम, आपल्या देशाचे भवितव्य, सायबर गुन्हे, ‘स्विफ्ट’सारख्या विविध बँकिंग प्रणाली अशी सगळी एकाचवेळी चक्रावून टाकणारी, तरीही उत्कंठावर्धक माहिती आहे. प्रत्यक्षात घडलेल्या घटनांचे तपशील एखाद्या हेरकथेसारखे गूंगवून टाकतात. अपूर्वा जोशी यांची ‘रिडर फ्रेंडली’ लेखनशैली वाचकाला गुंतवून ठेवते. (शब्दांकन – सुश्रुत कुलकर्णी) ‘सत्यम महाघोटाळा’ आणि रामलिंग राजू हा या पुस्तकाचा मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे. हर्षद मेहताच्या शेअरबाजारातल्या गैरव्यवहारापासून, व्हिडिओकॉन धूत-कोचर घोटाळा ते अगदी अलीकडे हिंडनबर्गचा संस्थापक नेथन अँडरसन याने अदानी ग्रुपवर केलेल्या आरोपांपर्यंत सगळे आर्थिक घोटाळे, त्यांची कार्यपद्धती याविषयी अपूर्वा यांनी रंजक माहिती दिली आहे. प्रत्येक विषयाच्या खोलात जाऊन अभ्यासपूर्ण, तार्किक आणि महत्त्वपूर्ण ऐवज त्यांनी गोळा केला आहे. हर्षद मेहताच्या आधी मुंबई शेअर बाजाराचे आद्य खेळिया शेठ प्रेमचंद रायचंद हे अव्वल सटोडिये कसे होते, त्याची उदाहरणे थक्क करणारी आहेत. बँक ऑफ बाँबेची १८४० मध्ये स्थापना झाली आणि तिच्या संचालक मंडळात प्रेमचंद रायचंद होते. त्यांच्या आईचे नाव होते राजाबाई. मुंबई विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या मनोऱ्याला राजाबाई यांचे नाव देण्यासाठी दोन लाख रूपयांची भक्कम देणगी त्याकाळात दिली. आजही त्या मनोऱ्याला राजाबाई टॉवर म्हणूनच ओळखलं जातं. स्टॉकब्रोकर, बुलियन ट्रेडर, कमॉडिटी ट्रेडर अशी कीर्ती त्यांनी मिळवली होती. बाँबे बँक कशी बुडाली त्याचं साद्यंत वर्णन मूळातून वाचण्यासारखं आहे.
‘रिस्क प्रो’ या कंपनीचे संस्थापक मयूर जोशी यांनी सत्यम घोटाळ्याचा आर्थिक शोध पोलिसांसाठी घेतला. त्याची बारीकसारीक माहिती गोळा करून गुन्हा नेमका कसा घडला आहे हे समजावून सांगितले. फोरेन्सिक ऑडीटर म्हणून मयूर जोशी किती प्रतिभावंत आहेत, याचे दर्शन या पुस्तकात घडते. सत्यम घोटाळ्यात ऑडिटर्सची नेमकी भूमिका कोणती, याविषयी एक प्रकरणच आहे. आर्थिक गुन्हेगारीतील सत्यशोधन ही सोपी गोष्ट नसते. मयूर जोशींनी ते साधलं. त्यांच्या विचक्षण बुद्धिमत्तेमुळे अगदी क्लिष्ट आर्थिक गुन्हा उकलत गेला. अपूर्वा जोशी त्यांच्या सहकारी आहेत. त्यामुळे मयूर यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये त्यांनी उत्तमरीतीने उलगडली आहेत. आर्थिक विश्वातील सृजनशीलता कशी असते, याचे प्रत्यंतर त्यातून येते. रोज ने-आण करण्यासाठी जे वाहन होते, त्याच्या चालकाशी, आंध्र पोलिसातील हवालदार राव याच्याशी संवाद साधून मयूर जोशी यांनी ‘मार्केट इंटलिजन्स’ गोळा केला. आरोपी रामलिंग राजूची शब्दांची उलटापालट करण्याची मानसिकता ध्यानात घेऊन गुन्ह्याचा तपास करणाऱ्या डीआयजींना सगळी केस समजावून सांगितली. सेबी, सीबीआय अशा अनेक संस्थांचा सत्यम घोटाळ्याशी कोणत्या ना कोणत्या प्रकाराने संबंध आलेला होता. फोरेन्सिक ऑडिटला मयूर जोशी यांनी एक वेगळ्या उंचीवर कसे नेऊन ठेवले आहे ते या पुस्तकातून लक्षात येते.
जागतिक बँक, अमेरिकेतील क्रायसिस, लझारस दहशतवादी, नीरव मोदी-मेहूल चोक्सी आणि पीएनबीची फसवणूक, सत्यम-मेटास-मेट्रो ही सगळी प्रकरणे मूळातून वाचण्यासारखी आहेत. आर्थिक घोटाळ्यातील आधुनिक शस्त्रास्त्रे कोणती आहेत हे सांगताना अपूर्वा यांनी सुलभ भाषाशैली वापरली आहे. आर्य चाणक्याची नीती, कौटिल्याचं अर्थशास्त्र आणि पूर्वजांकडे असलेलं शहाणपण याचं विवेचन उद्बोधक आहे. या सगळ्यामधून सर्वसामान्य वाचक आणि नागरिक म्हणून आपण काय शिकणार, काय शिकलं पाहिजे हेही त्यांनी सांगितलं आहे आणि ते म्हणजे नोकरदार असो किंवा गृहिणी, छोटा व्यावसायिक असो वा उद्योगपती, सर्वांनी आपल्या आर्थिक गुंतवणुकीबद्दल जागरूक राहिलं पाहिजे.
राजहंस प्रकाशनाने पुस्तकाची देखणी निर्मिती केली आहे. तृप्ती देशपांडे यांचे मुखपृष्ठ आणि शिरीष सहस्त्रबुद्धे यांचे संपादन वाखाणण्याजोगे आहे.
भारतातील सर्वात लहान वयाच्या सर्टिफाईड फोरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल आणि सर्टिफाईड फ्रॉड्स एक्झामिनर म्हणून अपूर्वा जोशी यांचा लौकिक आहे. गोल्डमन सॅक फाउंडेशन आणि आयआयएम बेंगळूरू यांच्यातर्फे ‘टेन थाउजंड विमेन’ या प्रतिष्ठेच्या जागतिक उपक्रमात सदस्य म्हणून निवड झाली आहे. कॉम्प्युटर हॅकिंग फोरेन्सिक इन्वेस्टिगेटर संघटनेच्या जागतिक सल्लागार समितीवर निवडल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या आपल्या सोलापूरच्या आहेत ही आपल्यासाठी मोठ्या आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे !
- लेखन:रजनीश जोशी, ज्येष्ठ पत्रकार सोलापूर