लेखमाला भाग :१
भेटी लागे जीवा
लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील सुपुत्र व सध्या माहिती संचालक गणेश रामदासीयांनी प्रत्यक्ष वारीमध्ये सहभागी होऊन शेअर केलेल्या मागील तीन वारींमधील अनुभवावर आधारित लेखमाला माध्यम
वाचकासाठी प्रसिद्ध करीत आहोत – संपादक
वारकरी आणि पंढरीचे नातेच असे घट्ट आहे की,एकदा का वारीची आणि विठ्ठल नामाची त्याला गोडी लागली की मग त्याला वारीत चालण्याचे कष्टही गोड वाटू लागतात.या नात्याची पूर्तता होणारच याची चाहूल दिवेघाट ओलांडला की लागते आणि नातेपुते गाठले की खात्रीच पटते.काल नातेपुते आणि आज वेळापूर पार करून आता आमची वारी उद्या सकाळीच वाखरी जवळ करेल.एकदा का वाखरी तळ गाठला की पंढरपूरात आपला प्रवेशच होतो आणि मग विठूमाऊलीच्या दर्शनाची अगदी आस लागून राहते.रात्रीचाही दिवस होतो.
पहिल्या-दुस-या वेळेस वारी पूर्ण करायला आम्हाला ८-९ दिवस लागायचेच पण यावेळेस समुहात उत्साही वारक-यांची भर पडलीय आणि संख्येने जरा मोठाही बनलाय.त्यामुळे यावेळेस साडेसात दिवसातच सुमारे अडीचशे किलोमीटर कापले गेले.माऊलींची पालखी वाल्हे ओलांडून लोणंद गाठण्याआधीच आमचे विठूमाऊलीचे दर्शन घडून आम्ही पंढरपूरातून बाहेर पडलेलो असतो. यावर्षी सर्वात छोटा दहा वर्षाखालचा वारकरी चि.शिव पाटील आणि वयाची ऐंशी गाठत असलेले तरूण वारकरी गोविंद जामखेडकर आहेत.त्यात महिलावर्ग शेवटच्या दिवशी अखेरचे ८-१० किमी चालण्यास व दर्शनास सोबत करायचा,पण यावेळेस चौघा भगिनींनी वारी संपूर्ण चालायचीच असा निर्धार केलेला आहे.माझ्या या आधीच्या दोन्ही वारीमध्ये मला उजव्या पायाने बराच त्रास दिला तेव्हा अगदी गाडीच्या हेडलॅम्पच्या प्रकाशात चालणे,चालता चालता नाश्ता उरकणे,दुपारची विश्रांती टाळणे असे बरेच काही मार्ग अवलंबले होते.माझी वारी पूर्ण व्हावी यासाठी स्वतः विठूमाऊली आणि दत्त महाराजांनी काय काय नाही केले.असे कित्येक अनुभव प्रत्येक विठ्ठल भक्ताला येतच राहतात.यातील दोन अनुभव आठवताच आजही अंगावर रोमांच येतात आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहतात.ती अनुभूती होतीच तशी उच्च कोटीची.
त्याचे असे झाले की पहिल्या दिवशी आळंदी ते पुणे चालल्यानंतर विश्रांतीच्या जागी रात्री एसीने आपला प्रताप दाखवला आणि सकाळी उजव्या पायाची नस नुसती आखडलीच नाही तर एकावर एक चढली.पहाटे भैरव ओढा ते फुरसुंगी करून पुढे दिवेघाटाच्या पायथ्याला नाश्त्याला आम्ही जेव्हा थांबलो तेव्हा पाय चांगलाच सुजला होता. रिलॅक्सेशनचे निरनिराळे व्यायाम करत कसेबसे स्वतःला घाट चढण्यास सज्ज केले.सोबत विवेक गर्गे होताच.त्याचे शंभरी पार वजनाने गुडघे आधीच बोलत होते.आम्ही घाटातील अर्धे अंतर कसेबसे पार करेपर्यंत इतर सारे घाट संपवून सासवडकडे निघाल्याचे दिसत होते.अन्यथा विवेकची सकाळ ११ नंतर होणारी इथे आम्हाला ४-४.३०लाच उठायचे असायचे.तो म्हणाला मी आता एक झोप काढल्या शिवाय पुढे चालूच शकत नाही.मी पण थकवा आणि वेदनांनी पूर्णतः एग्झाॅस्ट झालो होतो.त्यामुळे घाटाच्या संरक्षक भिंतीवर बसून नसांना तेल/व्हॅलिनी मलम चोळत मनाची तयारी करीत होतो.मात्र असे जाणवत होते की आपण आता पुढे फार काही चालू शकणार नाही.
मनात विठ्ठलाचा धावा चालूच होता.क्षमा मागून माघारी पुण्यास परतावे असा विचार डोक्यात घोळत होते.घाटातून खालून वाहने येत होती व चढ चढून पुढे जात होती.मी जिथे बसलो होतो तिथून मागे खोल दरी,दूरवर पसरलेले पुणे,तळाला 'मस्तानी' तलाव दिसत होता आणि समोर ऊंच हिरवाकंच शालू नेसलेला उभा पहाड.विवेकच्या सोबत मग मी पण पाठ टेकवली पण आपण वारी पूर्ण करू शकणार नाही हे बोचणारे शल्य कुठे डोळा लागू देत होते!
इतक्यात वाहनांच्या गर्दीतून वाट काढत एक कुत्रे माझ्याजवळ घोटाळू लागले.विवेक "तो तुझ्या सोबत आहे माझी झोप होईपर्यंत" असे सांगून घोरू लागला.मी आपला एकटा दूरवरची घाटाची वळणं न्याहाळत सचिंत बसलेला.श्वानराज सारखे माझ्या नजरेस रोखून बघत बसलेले.माझाही त्याच्याशी मूकसंवाद सुरू झाला.इतक्यात तो जागचा उठून पुढे लंगडत चालू लागला,तेव्हा लक्षात आले हा एका पायाने लंगडा आहे.तो जणू मला सुचवत होता,"बघ मी एका पायाने अधू असतानाही लंगडत चालतोय,तू अजून धडधाकट तर आहेस,पाय नुसता सुजलाच आहे ना! ऊठ आणि चाल माझ्यासोबत".मी कट्ट्यावरून उतरलो आणि हळू हळू उजवा पाय अक्षरशः खेचत चालायला सुरूवात केली.तो चालताना सारखा सारखा वळणांवर मागे वळून माझ्याकडे बघायचाही,येतो की नाही ते पाहण्यास.त्याच्यात व माझ्यात एकप्रकारे स्पर्धाच लागली कधी तो पुढे,कधी मी.असे करता करता एका वळणावर तो मागे पडला,मी वळण संपताच सहज पुढे नजर टाकली,तर घाट संपताना उजव्या बाजूस उंचावर पाय-यांचे एक मंदिर दिसले.म्हटले चला आता आपण तिथे पायरीवर विसावा घेऊन विवेकची वाट पहावी.भराभर पाय ओढत मंदिराच्या पायरीवर बसकण मारली.मंदिर कशाचे हे पाहण्याचे अवसानही उरले नव्हते एवढा गळून गेलो होतो.चला दत्तमहाराजांनी सोबतीची व्यवस्थासुद्धा योजकतेने लंगडा श्वान पाठवूनच लावली असे मनास वाटले आणि म्हणून मागे वळणापर्यंत नजर टाकली तर श्वान महाराज कुठेच दिसत नव्हते.उलट विवेक चढ चढून येताना दिसला.त्याला मागे कुठे वाटेत आपल्याला भेटलेले कुत्रे दिसले का असे विचारले तर तो म्हणाला "तुम्ही दोघेच तर पुढे आलात चालत.मला कुठे दिसलाही नाही आणि लंगड्या पायाने तो खाली दरीत उतरेल किवा कडा चढेल असेही नाही".असो त्या बिचा-याने लंगडत लंगडत पूर्ण घाट चढण्याची मला उर्जा दिली म्हणून आलो बाबा घाट चढून असे म्हणत मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत आम्ही आलो तेव्हा बघतो तर काय! मंदीरात दत्तमहाराजांची प्रसन्न सुबक मूर्ती.इथे दत्त महाराज आणि विठ्ठल रखुमाई भेटतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. गुरूमहाराजांना आणि माऊलीस चक्क लोटांगण घातले.आम्हा दोघांच्याही डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले.आम्हाला खात्रीच पटली,आपली ही वारी व्हावी गुरू-माऊलींचीच इच्छा आहे असे म्हणत मी व विवेक वेगाने पुढे मार्गस्थ झालो.पायात नवा उत्साह संचारला.पुढे मग जेजुरी-वाल्हे क्राॅस करेपर्यंत पायाने विशेष त्रास नाही दिला.
मला आलेला दुसरा अनुभव तर आणखी रोमांचकारी पण त्याचे वर्णन नंतर येईल.आता विश्रांती.सकाळी वाखरी गाठायचीय.चंद्रभागेस जाऊन आल्यानंतर नामदेव पायरीस नमन करायचेय आणि मग थेट विठूमाऊली.तिच्या चरणांची आस लागून आहे!
भेटीलागीं जीवा लागलीसे आर्त ! पाहे रात्रींदिवस वाट तुझी !!……….
……तुका म्हणे मज लागलीसे भूक
धावुनीं श्रीमुख दावीं देवा!!
लेखन : गणेश रामदासी
माहिती संचालक